ऐसी लागी लगन…’ नंतर भजन सम्राट अनुप जलोटा घेऊन आलेत ‘मोहब्बत किसी के साथ…’!

'मोहब्बत किसी के साथ...'या अल्बमचं प्रकाशन करण्यात आलं. याचं औचित्य साधत अनुप जलोटांनी 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  भजन सम्राट म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अनुप जलोटा यांनी नेहमीच भजनांच्या माध्यमातून रसिकांना आनंद दिला आहे. आता ते संगीतप्रेमींसाठी गजलरूपी नजराणा घेऊन आले आहेत. ‘मोहब्बत किसी के साथ…’ या अल्बममध्ये त्यांनी दिपा जोशी या नवोदित गायिकेला ब्रेक दिला आहे. अनुपजींच्या शिवाजी पार्कमधील घरी एका छोटेखानी कार्यक्रमात अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीत या अल्बमचं प्रकाशन करण्यात आलं. याचं औचित्य साधत अनुप जलोटांनी ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  अनुप जलोटा हे नाव उच्चारताच आजही ‘ऐसी लागी लगन…’ हे त्यांचं अजरामर भजन आठवतं. भजनासोबतच इतरही काव्यप्रकारांच्या माध्यमातून संगीताची सेवा करणारे अनुपजी नेहमीच आपल्यासोबत नवनवीन गायकांना ब्रेक देत असतात. ‘मोहब्बत किसी के साथ…’ या अल्बममध्ये त्यांनी नवी दिल्लीत राहणाऱ्या दीपा जोशींना ब्रेक दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, मी आज कोणत्याही आघाडीच्या गायिकेसोबत अल्बम बनवू शकतो. श्रेया घोषाल असो, वा अलका आज्ञिक कोणालाही घेऊन अल्बम बनवू शकलो, पण देवानं आज त्यांना खूप नाव दिलं आहे. त्या स्थिरस्थावर आहेत. त्यामुळं ज्यांना लाइमलाईटमध्ये येण्याची गरज आहे त्यांना संधी देत असतो. याद्वारे नवनवीन प्रतिभा जगासमोर आणण्याचं काम करत असतो. देव त्यांना नाव देतो आणि मला त्यातून समाधान मिळतं. मी जेव्हा नवीन गायकांना संधी देतो, तेव्हा सर्व प्रथम त्यांना प्रशिक्षण देतो. त्यासाठी थोडा वेळ लागतो. ट्रेनिंग पूर्ण झाली की, अल्बमच्या माध्यमातून त्यांना लाँच करतो. काही मित्रांच्या माध्यमातून दीपा जोशी यांच्याशी ओळख झाली. भेट झाल्यावर मी त्यांना काहीतरी ऐकवायला सांगितलं. त्यांचं गाणं ऐकल्यानंतर थोडी ट्रेनिंग देण्याची गरज वाटली. ट्रेनिंग दिल्यानंतर अल्बम बनवूया असं सांगितलं. त्यांना गाण्यातील बारकावे शिकवले. त्यांनीही ते मनापासून आत्मसात केले. आज त्याचा रिझल्ट आपल्याला या अल्बमच्या माध्यमातून पहायला मिळत आहे.

  ‘मोहब्बत किसी के साथ…’ या अल्बमच्या वैशिष्ट्याबाबत अनुपजी म्हणाले की, मी जरी भजन सम्राट म्हणून ओळखलो जात असलो तरी या अल्बममध्ये मात्र रसिकांना गझल ऐकायला मिळेल. ‘नफरत किसी के साथ, मोहब्बत किसी के साथ. ये कश्मकश भी खत्म हुई जिंदगी के साथ…’ अशी ही गझल आहे. कारण जीवन संपतं तेव्हा सर्व गोष्टी संपून जातात. सर्व किंतु, परंतु, सर्व समस्या संपतात. जोपर्यत जीवन असेपर्यंत कष्ट आहेत. त्यानंतर सर्व संपतं. हा मेसेज या गझलद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. याचं संगीतही मीच केलं आहे. व्हिडीओ खूप छान बनला असून, जे पाहतील त्यांना नक्कीच आवडेल असा आहे. हा व्हिडीओ घरीच शूट करण्यात आला आहे. मी जास्तीत जास्त काम घरीच करतो. घरीच रियाज, मुलांना शिकवतो आणि व्हिडीओही करतो. कारण घरी जागा आहे. आज कोव्हिडच्या वातावरणात बाहेर जाऊन शूट करायला भीती वाटते. व्हिडीओचा रिझल्ट चांगला आहे. घरी टेरेसवर हिरवंगार वातावरण असल्यानं खंडाळ्यात शूट केल्यासारखा फील येतो.

  नफरत विरुद्ध मोहब्बत!
  या वेळी बाहेर नफरत आणि मोहब्बत असा दोन्ही प्रकारचा माहोल आहे. आपण कोरोनाला नफरत करतोय आणि जीवनावर प्रेम करत आहोत. हेच सार या अल्बममध्येही आहे. आजही मी गायलेलं ‘ऐसी लागी लगन…’ हे भजन लोकांना चांगलंच स्मरणात आहे. ‘मोहब्बत किसी के साथ…’द्वारे गझल हा प्रकार रसिकांसमोर आणला आहे. दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ते भजन होतं, ही गझल आहे. दोन्ही काव्य मोठ्या प्रेमानं गायली आहेत. ते भजन ज्या भक्तीभावानं गायलं, तितक्याच प्रेमानं ही गझलही गायली आहे. प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे केली गेली तर ती मनाला भावते. कोव्हिडच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आज तुमच्याकडे असलेल्या वेळेचा वापर स्वत:ला सुदृढ बनवण्यासाठी करा. योगाभ्यास, प्राणायाम, जलनीती करा. लसूण, च्यवनप्राश, सीताफळ चूर्ण, व्हिटॅमिन सी असलेल्या वस्तूंचं सेवन करा. जेणेकरून तुमच्या अंगी कोरोनाशी लढण्याची शक्ती येईल आणि कोणताही व्हायरस तुम्हाला टच करू शकणार नाही. मी स्वत:ला असंच तयार केल्यानं कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळालं आहे.

  दीड वर्षांनी कॅान्सर्ट
  आणखी चार आर्टिस्टना मी लवकरच इंट्रोड्युस करणार आहे. माझ्याकडे शिकणारे सत्यम आनंद खूप चांगले गातात. फिजीमध्ये राहणाऱ्या सुमित टप्पूसोबत अल्बम करणार आहे. ‘सत्य साईबाबा’ या चित्रपटासाठीही त्याचं एक गाणं रेकॅार्ड केलं होतं. त्यालाही संधी देणार आहे. मुलं-मुली दोन्ही प्रकारचे विद्यार्थी माझ्याकडे शिक्षण घेत असतात. सर्वांना जगासमोर येण्याचा समान अधिकार असल्यानं सर्वांना चान्स देतो. दीड वर्षांपासून कोणतीही कॅान्सर्ट केलेली नाही. दीड वर्षांपासून मी सेलफोनला गाणं ऐकवलं आणि त्या माध्यमातून सगळीकडं आॅनलाईन पोहोचलो, पण आता हळूहळू कार्यक्रम सुरू होऊ लागले आहेत. १५ तारखेला हैदराबादमध्ये पहिला प्रोग्राम होणार आहे. कोरोनामुळं झालेल्या लॅाकडाऊननंतर ही पहिली कॅान्सर्ट होणार आहे. लॅाकडाऊनच्या काळात झूमद्वारे आपल्या विद्यार्थ्यांच्या टचमध्ये राहिलो. त्यांना गायनाचे धडे दिले.

  … यासाठी घरी केवळ पद्मश्री आहे
  आम्ही कलेच्या स्वत:ला समर्पित केलं आहे. त्यामुळं आम्ही गाणं गाताना ब्रम्हानंदी टाळी लागते आणि तल्लीन होतो. जे याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहतात त्यांना तो आनंद मिळत नाही. माझं संगीत ऐकून लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण होते ही ईश्वराची कृपा आहे. जे काम करतो ते मोठ्या श्रद्धेनं आणि मनापासून करतो. स्वत:ला एक सर्वसाधारण व्यक्ती मानून कलेची सेवा करतो. आपण काहीतरी अॅचिव्ह केलं असल्याचं मनात ठेवून कधीच काही करत नाही. त्यामुळंच मी घरी कोणतीही ट्रॅाफी घेऊन येत नाही. आजवर मला जवळपास २०-२५हजार टॅाफीज मिळाल्या असतील, पण घरात एकही नाही. केवळ पद्मश्री ठेवला आहे. कारण हा पुरस्कार सरकारनं दिला असून, मी सरकारचा आदर करतो. ट्रॅाफी घरात ठेवत नाही. कारण इथं मी एक सर्वसामान्य माणूस आहे. स्टेजवर चढतो तेव्हा तिथे अॅचिव्हमेंट लक्षात ठेवतो. इथं कलेचा मान राखायचा असल्याची जाणीव असते. त्यामुळं मंचावर गेल्यावर आपला मुकूट धारण करतो आणि मंचावर खाली उतरताच मुकूट काढून ठेवतो. हेच मला आजच्या पिढीला सांगायचंय.

  जसलीन आजही माझ्याकडे शिकतेय
  माझं ‘बिग बॅास’मध्ये जाणं लोकांना आश्चर्यचकीत करणारं होतंच. त्यानुसार हे कसे काय त्या घरात पोहोचले? हा प्रश्न सर्वांना पडलाच. खरं सांगायचं तर मी ‘बिग बॅास’चं शुद्धीकरण करण्यासाठी तिथे गेलो होतो. तिथेही मी तसाच होतो, जसा बाहेर असतो. तिथे मला कोणीच काहीही विचित्र करताना पाहिलं नाही. तिथेही मी योगा केला, रिहर्सल केली, संगीतातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला. घरातून जेव्हा बाहेर आलो, जेव्हा ती कॅान्ट्रोव्हर्सी ऐकली तेव्हा सांगितलं की, मी लवकरच जसलीन मथारूचं कन्यादान करणार आहे. त्यामुळं सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. तो एक शो होता. त्यामुळं त्याचा आनंद उपभोगा. त्यातून कोणाचीही कशाही प्रकारची इमेज बनवू नका. जसलीन आजही माझ्याकडे संगीत शिकायला येते. खूप चांगली मुलगी आहे. ती खूप चांगली गायिका असल्याचं लोकांनाही तिच्याबद्दल सांगतो. ‘वो मेरी स्टुडंट है’ हा चित्रपट जसलीनसोबत केला आहे. तिच्या वडीलांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ओटीटीवर पहायला मिळतेय.

  लोकसंगीताकडून गझलकडे…
  दीपा जोशींबाबत सांगायचं तर त्यांना बालपणापासून गायनाची आवड आहे. क्लासिकल आणि लाईक म्युझिकही शिकल्या आहेत. मूळच्या लखनऊमधील असलेल्या दीपा यांनी विनोद चॅटर्जी यांच्याकडे गायनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. आजवरच्या प्रवासाबाबत त्या म्हणाल्या की, मी आॅल इंडीया रेडिओवर कॅाम्पिअरींग करतात. प्रेझेंटरही आहेत आणि प्रोग्राम्सही करतात. व्हाईसओव्हरचं कामही करते. क्लासिकलमध्ये विशरद केलं आहे. घरी आईला गायनाची आवड आहे. आता अनुपजींसोबत गझलच्या माध्यमातून मोठा ब्रेक मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला आल्यावर अनुपजींची भेट झाली. त्यांनी अनुग्रह दिला आणि आता त्यांच्यासोबत गझल करण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत मी कुमौदी, गढवाली लोकसंगीत, लग्नगीत वगैरे गायले आहे, पण गझल पहिल्यांदाच गायली आहे. वेद प्रकाश मलिक यांनी ही गझल लिहीली आहे. यातील प्रत्येक शब्दात वेगळा अर्थ दडला आहे. विवेक प्रकाश म्युझिक अॅरेंजर आहेत, प्रभाकर शुक्लांनी व्हिडीओ एडीटर म्हणून काम पाहिलं आहे.