‘सा रे ग म प..’मधील निवेदनावरून बोलणाऱ्यांना मृण्मयीने दिलं सडेतोड उत्तर म्हणाली…

पाचही परिक्षकांच्या शैलीवर तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीच्या शैलीची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल झालेत. असं असतानाच मृण्मयीने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

    ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’चे नवीन पर्व काही दिवसांपूर्वीच सुरू झालं आहे. या पर्वात ‘सा रे ग म लिटिल चॅम्प’च्या पर्वामधून प्रसिद्धी मिळवलेल्या पंचरत्नांना परिक्षकांच्या खुर्चीत बसवण्यात आलं आहे. या पर्वामध्ये लिटिल चॅम्प्सच्या गाण्याचं परिक्षण करण्याची जबाबदारी रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे. पाचही परिक्षकांच्या शैलीवर तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीच्या शैलीची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल झालेत. असं असतानाच मृण्मयीने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

    सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीला पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अनेकांनी यासंदर्भातील मिम्सही शेअर केलेत. अनेकजण सोशल नेटवर्किंगवरुन मृण्मयी सूत्रसंचालन करताना ओव्हर अ‍ॅक्टींग करते अशी टीका केलीय. मृण्मयीच्या अशाच एका पोस्टवर एका चाहत्याने सा रे ग म प लिटिल चॅम्पसंदर्भातील कमेंट केली. ‘समोर बसलेले जज आणि अँकर खूपदा वा वा ओरडतात याला ओव्हर अ‍ॅक्टींग म्हणायची का?,’ असं या चाहत्याने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करुन म्हटलं. या कमेंटवर मृण्मयीने सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?,” असा प्रश्न मृण्मयीने तिला ट्रोल करु पाहणाऱ्या या व्यक्तीला केलाय.

    ही मालिका सुरु झाल्यापासून सोशल नेटवर्किंगवर पंचरत्नांना खूपच ट्रोल केलं जात आहे. रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर मिम्स व्हाय़रल झालेत. रोहित अवधूत गुप्तेची नक्कल करतो तर कार्तिकी गायकवाड सतत गाण्यांनंतर रडत असल्याने तिला मराठीतील नेहा कक्कर म्हटल्याचे मिम्स व्हायरल झालेत. त्याचप्रमाणे आर्या आंबेकरला पाहण्यासाठी तरुण पोरं हा शो पाहतात आणि प्रथमेश लघाटे हा महेश काळेंची कॉपी करतो असं म्हणणारे मिम्सही व्हायरल झालेत.