गेट वे ऑफ इंडियावर ‘मुंबई डायरीज’ चा ट्रेलर प्रदर्शित!

कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी आदी कलाकार आहेत.

    अमेझॉन प्राईम व्हिडिओ नं २६/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या आगामी काल्पनिक वैद्यकीय नाट्य असलेल्या ‘मुंबई डायरीज २६/११’ या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित केला. गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात, डॉक्टर्स आणि पोलिस कर्मचारी यांच्यासारख्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या शौर्य, निष्ठा आणि निस्वार्थी बलिदानाप्रती आदरांजली वाहण्यात आली.

    महाराष्ट्राचे पर्यावरण आणि शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमेझॉन इंडिया ओरिजिनलच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक निखिल अडवाणी, निर्माते आणि मालिकेतील कलाकार यांच्या सहउपस्थितीत मुंबईच्या अत्यावश्यक सेवेतील नायकांच्या अमूल्य बलिदानाच्या स्मृती जागवणारा ‘साहस को सलाम’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ‘मुंबई डायरीज २६/११’ हा शो ९ सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे.

    निखिल अडवाणी दिग्दर्शित हा शो, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या अप्रकाशित कथा सादर करणार आहे. यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी आदी कलाकार आहेत.