gulshan-kumar

गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी(Gulshan Kumar Murder Case) अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट या मारेकऱ्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने(High Court Decision In Gulshan Kumar Murder Case) गुरुवारी नकार दिला आणि सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधातील आव्हान खंडपीठाने फेटाळून लावले.

  मुंबईः टी-सीरीज कंपनीचे मालक आणि ‘कॅसेटकिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी(Gulshan Kumar Murder Case) अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट या मारेकऱ्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने(High Court Decision In Gulshan Kumar Murder Case) गुरुवारी नकार दिला आणि सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधातील आव्हान खंडपीठाने फेटाळून लावले.

  शिक्षेदरम्यान मिळालेली पॅरोल तोडून पळून जाऊन आपला आरोपी जर गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवत असेल तर आरोपी कोणत्याही माफीच्या लायक नाही असे निरीक्षण खंडपीठाने जारी केलेल्या आदेशात नोंदवले.

  सदर प्रकरणात एप्रिल २००२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एल तहिलयानी यांनी आपला निकाल जाहीर करताना १९ पैकी १८ आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले होते. तर गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या अब्दुल रौफला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याविरोधात ऱौफने उच्च न्यायालयात आव्हान देत अपिल दाखल केले होते. तर अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी उच्च न्यायालयाच्या न्या. साधना जाधव आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला.

  या निर्णयानुसार अब्दुल रौफ दाऊद मर्चंटला गुलशन कुमार यांच्या हत्येच्या शिक्षेत कोणताही दिलासा देण्यास खंडपीठाने नकार दिला. तरीही त्याचे अपिल अंशतः मान्य करत आयपीसी कलमं ३९२(मोठ्या प्रमाणात चोरी), ३९७(लूट करणे) रद्द केली. मात्र, आयपीसी कलम ३०२(हत्या) आणि अन्य कठोर कलमांखालील शिक्षा कायम ठेवली. शिक्षेदरम्यान मिळालेली पॅरोल तोडून २००९ मध्ये रौफ पळून गेला होता. त्यानंतर त्याला साल २०१६ मध्ये पुन्हा अटक करण्यात आली होती. ही बाजू ग्राह्य धरत आरोपी कोणत्याही माफीच्या लायक नाही असे निरीक्षण खंडपीठाने आपल्या आदेशात नोंदवले.

  दुसरीकडे,  अन्य निर्दोष आरोपी अब्दुल मर्चंटविरोधातील राज्य सरकारने केलेले अपील खंडपीठाने अंशत: मान्य केले. या आरोपीलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून आठवड्याभरात मुंबई सत्र न्यायालयात अथवा अंधेरीतील डी.एन. नगर पोलिसांकडे शरण येण्याचे तसेच आपला पासपोर्टही जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुराव्यांअभावी निर्दोश मुक्त केलेल्या आरोपींमध्ये ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांचाही समावेश आहे. तौरानी यांनाही दिलासा देत खंडपीठाने त्याचं निर्दोषत्व कायम ठेवत त्यांच्याविरोधातील राज्य सरकारचे अपील फेटाळून लावले.

  काय आहे प्रकरण ?
  जुहू येथील जीत नगर परिसरातील शीव मंदिराबाहेर १२ ऑगस्ट १९९७ रोजी गुलशन कुमार यांची तीन मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या तब्बल १६ गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार प्रसिद्ध गायक नदीम अख्तर सैफी या घटनेनंतर इंग्लंडला पसार झाला. नदीमवर गुलशन कुमार यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी ऑक्टोबर १९९७ मध्ये ‘टिप्स’ या प्रतिस्पर्धी कंपनीचे मालक रमेश तौरानी यांना हत्येच्या कटात समील असल्याच्या आरोपाखाली अटक केली. तौरानी यांनी कुमार यांच्या मारेकऱ्यांना २५ लाख रूपये दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक असलेला आणि प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रौफला जानेवारी २००१ मध्ये भारत बांग्लादेश सीमेवर बीएसएफच्या उपस्थितीत मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवले. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोलकाता अटक केली होती.

  सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी
  नोव्हेंबर १९९७ मध्येच मुंबई पोलिसांनी याप्रकरणी ४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. ज्यात एकूण २६ जणांना आरोपी बनविण्यात आले यापैकी एकूण पंधरा जणांना अटक करण्यात आली. अटक झालेल्या आरोपींपैकी मोहम्मद अली शेख माफीचा साक्षीदार बनला आणि त्यामुळेच या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर जून २००१ मध्ये मुंबई सत्र न्यायालयात या खटल्याला सुरूवात झाली. एप्रिल २००२ मध्ये न्यायाधीश एम.एल तहिलयानी यांनी याप्रकरणी आपला निकाल देत अब्दुल रौफला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.