अभिजितच्या संगीतानं सजली सावरकरांची ज्वलंत सत्यकथा!

सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांची ज्वलंत सत्यकथा पोवाड्याच्या माध्यमातून मांडताना आलेल्या अडचणींचा पाढा अभिजीतनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना वाचून दाखवला.

  आपल्या तल्लख बुद्धीच्या बळावर ब्रिटिशांशी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकररूपी भारतभूच्या सुपुत्राची जयंती कालच साजरी करण्यात आली. आजही सावरकर आणि त्यांची विचारधारा योग्य पद्धतीनं तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच विचारानं प्रेरीत होऊन ज्येष्ठ कवयित्री सुमनताई फडके यांच्या लेखणीतून अवतरलेला पोवाडा रसिकांच्या भेटीला आला आहे. गायक-संगीतकार अभिजित जोशीनं या पोवाड्याची निर्मिती केली असून, त्यात अभिनयही केला आहे. सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांची ज्वलंत सत्यकथा पोवाड्याच्या माध्यमातून मांडताना आलेल्या अडचणींचा पाढा अभिजितनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना वाचून दाखवला.

  स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित असलेला हा पोवाडा ९४ वर्षीय कवयित्री सुमनताई फडके यांच्या लेखणीतून अवतरला आहे. त्यांनी लिहिलेली काही गाणी मी यापूर्वीही कंपोझ केली आहेत. त्या स्वत: सावरकरप्रेमी असून, त्यांचं बालपण सावरकरांसोबत गेलं आहे. सावरकरांच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात पाहिल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात सावरकरांवर खूप खालच्पा पातळीवर जाऊन आरोप करण्यात आले होते. सावरकर काय होते ते पाहिलेल्या लोकांना हे असह्य झालं. त्यातून सुमनताईंनी सावरकरांवर ज्वलंत लिखाण सुरू केलं. त्या म्हणाल्या की, माझे डोळे मिटण्याआधी यावर काय करता येईल ते बघ. माझ्यावर अचानक एक मोठी जबाबदारी आली. कोणताही प्रोजेक्ट करताना फायनान्स खूप महत्त्वाचा ठरतो. तो नव्हता. सुधीर फडकेंनी (बाबूजी) जेव्हा सावरकरांवर जेव्हा सिनेमा केला होता, तेव्हा बाबूजींच्या दादरच्या घरामध्ये सर्व प्लॅनिंग व्हायचं. त्या चित्रपटासाठी जेव्हा पैशांची तरतूद करण्याची वेळ आली, तेव्हा सुमनताईंनी स्वत:च्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून बाबूजींच्या हातावर ठेवले आणि हे विकून सिनेमा बनवा असं त्यांनी सांगितलं होतं.

  हा पोवाडा गौरव चाटीच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आला आहे. याच्या प्रक्रियेबाबत अभिजित म्हणाला की, आम्ही गौरव चाटीच्या आवाजात आॅडीओ तयार केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या रणजीत सावरकर आणि मंजिरी मराठे यांना ऐकवला. पोवाडा ऐकून ते भारावून गेले, पण फक्त आॅडीओ बनवून उपयोगाचं नसल्याचं ते म्हणाले. कारण सावरकर आणि त्यांची विचारधारा खूप गहन आहे. त्यांचे विचार सहजासहजी सर्वसामान्यांना समजत नाहीत. ते लोकांपर्यंत पोहोचवावे लागतात. सावरकरांचं साहित्य प्रकांड ज्ञानी लोकांपर्यंतच मर्यादित राहिलं आहे. त्यामुळं व्हिडीओच्या रूपात हा पोवाडा यायला हवा असा विचार पुढे आला. सावरकर स्मारकाकडून आम्हाला काही लोकांचे नंबर्स मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून पैसे उभे राहिले. देश-विदेशातून मदत आली. यासाठी राजकीय लोकांची मदत घ्यायची नाही, असा सुमनताईंचाच अट्टाहास होता. मूळ उद्देश बाजूला राहता कामा नये हा हेतू होता. यासाठी नागपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक, पुणे, मुंबईमध्ये शूटिंग करण्याचं प्लॅनिंग केलं. बँकेत काम करणाऱ्या अमोल तेलपांडेची सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी निवड केली. काही काळानंतर सावरकरांना अर्धवट टक्कल पडलं होतं. तो लुक येण्यासाठी अमोलनं अर्ध टक्कलही केलं. हा प्रोजेक्ट करणं सोपं काम नव्हतं. सर्वांच्याच मेहनतीतून हा आकाराला आला.

  फिल्मी स्टाइलनं घडल्या गोष्टी

  सावरकर जिथे जिथे गेले होते, तिथे तिथे शूट करण्याचा आमचा विचार होता. सावरकर जेव्हा विदर्भात किंवा नागपूरला जायचे, तेव्हा तिथल्या एका वाड्यात हमखास थांबायचे. तिथे शूट करण्यासाठी परवानगी घेतली, पण शूट करणार त्याच्या आदल्या रात्री आमचं सर्व सामान वाड्याच्या बाहेर काढण्यात आलं होतं. नेमकं काय झालं समजलं नाही. ही गोष्ट जेव्हा शेफ विष्णू मनोहरांना समजली, तेव्हा त्यांनी फोन केला आणि आपलं घर शूटिंगसाठी उपलब्ध करून दिलं. तिथं आम्ही लंडनमधील, तसेच इतर काही शॅाट्स शूट केले. आम्ही सावरकरांवर गाणं बनवत असल्याचं बुटीन यांच्या आजीला समजलं, तेव्हा त्यांनी स्वत:हून सांगितलं की सावरकर जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा आमच्याकडे यायचे. त्यामुळं तिथं काही शूट करता आलं तर ती आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल असं त्या म्हणाल्या. तो वाडा सावरकरांच्या वाड्यासारखाच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज रघुजीराजे भासले यांनीही मदत केली.

  अंदमानमधील थरारक अनुभव
  सावरकरांवरील कलाकृतीला अंदमानशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही. तो त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे, पण तिथं सर्व टीम घेऊन जाणं शक्य नव्हतं. तिथं जायचं ठरलं, पण पैशांची वानवा होती. मनीषा मराठे यांनी पुढाकार घेत आमचा विमानानं जाण्या-येण्याचा खर्च केला. तिथं शूट करण्यासाठी डिफेन्सची परवानगी घ्यावी लागते. सेल्युलर जेल आणि सावरकरांच्या सेलमध्ये शूट करायचं होतं, पण तिथं शूट करता येऊ शकत नसल्याचं आम्हाला तिथं गेल्यावर समजलं. तिथल्या प्रमुख रशिदा इकबाल यांनीही शूट करता येणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं. कारण त्यावेळी काही कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती भेट देणार असल्यानं जेलला जणू सैन्याच्या छावणीचं स्वरूप आलं होतं. आमचा हिरमोड झाला. अचानक काहीतरी चमत्कार घडला आणि रशिदा यांनी फोन करून शूट करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे पाच वाजता सावरकरांची कोठडी, फाशीघर आणि संपूर्ण सेल्युलर जेलमध्ये जिथे जिथे सावरकरांचा वावर होता तिथे तिथे शूट केलं. शूटसाठी त्या खास ड्युटीच्या वेळेपूर्वी उपस्थित राहिल्या होत्या.

  उचलली जीभ लावली टाळ्याला…

  सावरकरांच्या सर्व संस्थांमध्ये स्क्रीनवर हा पोवाडा दाखवण्यात आला. मागच्या वर्षी सुमनताईंनी हा पोवाडा लिहीला असून, अल्ट्रावर रिलीज झाला आहे. यात मी संगीत दिलं आहे. निर्मिती आणि अभिनयही केला आहे. माझ्यासह गायक गौरव चाटीवर हा पोवाडा चित्रीत करण्यात आला आहे. दिग्दर्शन आणि संकलन जागेश्वर ढोबळेनं केलं आहे. आदित्य राजगोपालन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. यात आसावरी रामेकर यांनीही काम केलं आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण प्रोजेक्ट तयार केला. या पोवाड्याच्या निमित्तानं मला जनतेला इतकंच सांगायचंय की, काहीही विचार न करता कुठल्याही थोर पुरुषाची अवहेलना करता कामा नये. त्यांच्याबाबत स्वत: अभ्यास करा आणि बोला. मग ते महात्मा गांधी असोत, वा सावरकर… या व्यक्ती साधारण नाहीत. प्रचंड ताकदीच्या असल्यानंच त्यांच्या मागं प्रचंड जनसमुदाय होता. त्यांची विचारसरणी, कामाची पद्धत जरी वेगळी असली तरी उद्देश एकच होता. तो होता देशाचं स्वातंत्र्य…