नवी व्यक्तिरेखा..नवं आव्हान, ‘गैरी’मध्ये दिसणार ‘बेधडक’ नम्रता!

लॅाकडाऊनपूर्वीच तयार झालेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं नम्रतानं 'नवराष्ट्र'शी खास बातचित केली.

  कधी ग्लॅमरस, तर कधी थेट आदिवासी व्यक्तिरेखा साकारण्याचं आव्हान स्वीकारणारी नम्रता गायकवाड आपल्या आगामी चित्रपटांमुळं पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली आहे. ‘झरी’ या मराठी चित्रपटामध्ये आदिवासी मुलीची भूमिका साकारलेल्या नम्रतानं ‘गैरी’ या आगामी सिनेमात पुन्हा एकदा नव्या व्यक्तिरेखेचं आव्हान स्वीकारलं आहे. लॅाकडाऊनपूर्वीच तयार झालेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं नम्रतानं ‘नवराष्ट्र’शी खास बातचित केली.

  ‘स्वराज्य’, ‘विजय असो’, ‘झरी’, ‘माझी तपस्या’, ‘बेधडक’ या मराठी चित्रपटांसोबतच ‘आयल जीवीचीरुप्पुंडू’ या दक्षिणात्य चित्रपटात अभिनय केलेल्या नम्रताचा ‘गैरी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘बेधडक’ या चित्रपटामुळे नम्रताला ‘गैरी’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. याबाबत नम्रता म्हणाली की, मी दिग्दर्शक संतोष मांजरेकरांच्या ‘बेधडक’मध्ये काम केलं आहे. त्या चित्रपटाचं जेव्हा प्रमोशन सुरू झालं, तेव्हा पांडुरंग जाधव यांनी माझा लुक पाहिला. त्यांनी ‘बेधडक’ चित्रपटही पाहिला. त्यातील माझं काम त्यांना आवडल्यानं त्यांनी मला सोशल मीडियावर कॅान्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आम्ही अशा प्रकारचा चित्रपट करत असल्याचं त्यांनी सांगितलं, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅप्रोच झाल्यानं मी थोडीशी संभ्रमात होते आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर मला सिनेमॅटोग्राफरनंही कॅाल केला आणि सोशल मीडियावर संपर्क साधल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही भेटलो. स्क्रीप्ट आणि माझं कॅरेक्टर ऐकल्यावर ‘गैरी’मध्ये काम करण्यासाठी होकार दिला.

  ‘गैरी’मधील भूमिकेच्या वेगळेपणाबाबत नम्रता म्हणाली की, आजवर मी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गैरी’मध्ये मला पुन्हा एकदा कॅालेजगर्ल साकारण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटापूर्वीही मी ‘बेधडक’मध्ये कॅालेज गर्ल साकारली असली तरी, यातील भूमिका काहीशी वेगळी आहे. या चित्रपटाचा विषय सामाजिक असल्यानं मी साकारलेल्या व्यक्तिरेखाही त्याला न्याय देणारी आहे. तिथे स्पोर्टस प्लेअर होते, पण ‘गैरी’मध्ये साधी, सरळ, सोज्वळ मुलगी आहे. मयुरेश पेमनं साकारलेल्या नायकाला बळ देणारी आहे. त्याच्या लढ्याशी एकरूप होऊन पाठिंबा देते. तो एका अशा समाजातून आलेला आहे, जिथे शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नाही. खूप हुषार असल्यानं तो जेव्हा शहरात येऊन महाविद्यालयात दाखल होतो, तेव्हा त्याला तो न्यूनगंड असतो. त्यावेळी मी साकारलेली स्वरा प्रोत्साहन देते. जिथे तो खचून जातो तिथे त्याला खंबीरपणे साथ देते. त्याला जे ध्येय गाठायचं असतं त्यासाठीही ती प्रेरणादायी ठरते. कारण तिनेही आयुष्यात खूप सहन केलेलं असतं. तिच्या आई-वडीलांचं अपघाती निधन झालेलं असतं.

  ती ५० टक्के माझ्यासारखीच आहे
  कोणालाही मदत करणारी असल्यानं स्वरा थोडीफार माझ्यासारखीही असल्याचं म्हणावं लागेल. ५० टक्के ती माझ्यासारखीच आहे. स्वरा कॅालेजमध्ये शिकत असूनही तिचे विचार प्रगल्भ आहेत. तिच्या आयुष्यात खूप दुर्दैवी घटना घडल्याचं दाखवण्यात आल्यानं ती वयाच्या पुढे जाऊन विचार करते. ही मध्यवर्गीय घरातील आहे. नायक पारधी समाजातील आहे. स्कॅालरशीप मिळाल्यावर तो पुढील शिक्षणासाठी शहरात येतो. या चित्रपटात लव्ह स्टोरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पांडुरंग जाधव यांनी केला आहे. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सिनेमाचं लेखनही त्यांनीच केलं आहे. त्यांच्याच अनुभवातून हा चित्रपट तयार झाला आहे.

  मयुरेश उत्तम सहकलाकार
  मयुरेशसोबत प्रथमच काम केलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॅार्म केल्यानं एकमेकांना ओळखत होतो. या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र काम करण्याची संधी मिळाली. मयुरेश रंगभूमीवरील कलाकार असल्यानं त्याच्यासोबत काम करताना मजा आली. त्याचं टायमिंग अचूक आहे. आमचं एक रोमॅन्टिक गाणं शिवनेरी किल्ल्याजवळ नाणे घाटात शूट करण्यात आलं आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी, नांदेड, मुंबईमध्येही काही सीन्स केले आहेत. आनंद इंगळे, प्रणव रावराणे असे बरेच कलाकार असल्यानं काम करताना धमालही केली. टप्प्याटप्प्यानं शूट पूर्ण झाल्यावर मागच्या वर्षी मार्चमध्ये डबिंगही पूर्ण झालं. मे महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवल्यानं मार्च-एप्रिलमध्ये प्रमोशन करण्याची योजना होती, पण मार्चमध्ये लॅाकडाऊन झाल्यानं सर्व थांबलं. त्यानंतर आता वर्षभर सिनेमागृहंच उघडलेली नाहीत.

  नवोदित दिग्दर्शकासोबतचा उत्तम अनुभव
  दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. पहिलाच चित्रपट असूनही ते ज्या ध्येयानं पछाडलेले होते ते पाहून भारावून गेले होते. सेटवर त्यांचा उत्साह खूप दांडगा होता. सेटवर असताना ते कायम कामात बिझी असायचे. एखादा सीन चांगला कसा होईल याचा अभ्यास करायचे. त्यांचा उत्साह पाहिल्यावर आमचा उत्साहही द्विगुणीत व्हायचा. मराठी चित्रपटांमध्ये बऱ्याचदा एक-दोन ठिकाणीच शूटिंग केलं जातं, पण निर्माते-दिग्दर्शकांचा पहिलाच चित्रपट असूनही नवनवीन लोकेशन्सवर योग्य प्लॅनिंगसह शूट केलं आहे. घाईघाईत काहीही केलं नसल्यानं खूप छान चित्रपट झाला आहे. अमितराजनं या चित्रपटाला संगीत दिलं आहे. ‘चालणं बोलणं…’ या सुरेख गाण्यासह एकूण चार गाणी आहेत.

  एकविसाव्या शतकातही अंधार
  लॅाकडाऊन संपल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन प्रत्येकानं हा चित्रपट पहायला हवा. कारण अजूनही एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रात असे काही समाज आहेत जिथं अद्यापही शिक्षणाला वाव दिला जात नाही. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी मार्ग उपलब्ध नाहीत. त्यांनी जरी शिकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मनातील न्यूनगंड किंवा समाजव्यवस्था त्यांना शिकू देते का? हा महत्त्वाचा प्रश्न या चित्रपटात मांडण्यात आला आहे. त्यांच्या मार्गात बरेच अडथळे येतात. त्यातून मार्ग काढून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल हे या चित्रपटात पहायला मिळेल.