गाथा खुळ्या दिलाची!

कधीतरी - कुठेतरी मांडलेली एखादी छोटीशी कल्पना साकार करण्यासाठी त्यांचे सहकारी पुढे सरसावतात. आणि साकार होतं 'गाथा खुळ्या दिलाची!'

  -संजय डहाळे

  काही रंगकर्मींचं जीणं हे जरी रसिकांच्या दरबारी यशस्वी, आनंददायी वाटलं तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्यांना शोकांतिकेला सामोरं जावं लागतं. नियतीशी संघर्ष करताना दुर्दैवानं अपयश पदरी येतं. त्यातून त्यांना काळाआड जाणं भाग पडतं… मग त्यांची गैरहजेरी साऱ्यांनाच चटका लावून जाणारी ठरते. त्यांनी कधीतरी – कुठेतरी मांडलेली एखादी छोटीशी कल्पना साकार करण्यासाठी त्यांचे सहकारी पुढे सरसावतात. आणि साकार होतं ‘गाथा खुळ्या दिलाची!’

  असंच काहीसं झालंय ते जेष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या संदर्भात. त्यांची प्रदीर्घ काळ साथसोबत करणारे संगीत दिग्दर्शक दत्ता थिटे आणि मित्रांनी दिलीपजींना आवडणारं त्यांचं एक स्वरचित गाणं निवडलं. हे गाणं उभ्या जगापुढे कधीतरी यावं, अशी इच्छा दिलीपजींची होती आणि त्यांच्या ४ मे रोजी स्मृतिदिनी गजलीचा बाज असलेलं गाणं प्रदर्शित झालं. निवडक मित्र परिवारासह त्यांच्या स्मृतिदिनी आपल्या लाडक्या दिग्दर्शक मित्राला अनोखी अशी भावपूर्ण व स्वरांची साथ देत आदरांजली अर्पण केली.

  तीस वर्षे बँक ऑफ बडोदात नोकरी करणारे दिलीप कोल्हटकर यांच्यासोबत दत्ता थिटे एक सहकारी होते. दिलीपजींच्या उमेदवारीच्या काळात त्यांच्या एकांकिकांना त्यांनी संगीत दिलं. बँकेतील नोकरी आणि नाटकातील कामगिरी ही एकाच वेळी सुरू होती. आंतरबँक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यापासून ते अगदी व्यावसायिक – प्रायोगिक रंगभूमी आणि चित्रपटापर्यंतचा एक ताकदीचा दिग्दर्शक म्हणून दिलीपजींचा प्रवास झाला. बारा वेळा ‘नाट्यदर्पण’चा पुरस्कार आणि चारवेळा राज्य नाट्य स्पर्धेचं विजेतेपद त्यांना मिळालं. या प्रवासात त्यांच्या बँकेतला ‘कंपू’ आपल्या सहकारी कर्मचाऱ्याकडं रंगभूमीवरला एक गगनभेदी दिपस्तंभ म्हणून बघत होता. मुंबई ते पुणे या प्रवासात अनेकदा गप्पा-टप्पा, ताल-सूर याने दिलीपजीं सोबत मैफलच जमायची त्या साऱ्या नाट्यपूर्ण आठवणींना या स्मृतिदिनी उजाळा मिळाला.

  ‘गाथा खुळ्या दिलाची!’ची पार्श्वभूमी. त्यासाठी थेट ३० वर्षापूर्वी जावं लागेल. शायरीकार वा. वा. पाटणकर यांच्या शायरींवर आधारित एकांकिका दिलीपजींनी बँकेसाठी केली. काव्य हा प्रकार त्यांच्या आवडीचा. रंगमंचावरल्या शब्दांवर त्यांचं प्रेमच. या आंतरबँकस्पर्धेतल्या एकांकिकेनं त्यांना त्यावेळी अक्षरशः भारावूनच सोडलं. पुढे एक व्हिडीओ फिल्मही त्यावर त्यांनी तयार केली. त्यातील काव्य हे दिलीपजींच्या मनात कायम आठवणी ताजी करायचा. ‘दोस्त, यावर एक चांगलं गाणं करायला पाहिजे!’ अशी इच्छा त्यांनी आपले मित्र दत्ता थिटे यांच्याकडे गप्पांच्या ओघात कधीतरी मांडली होती, पण कामाच्या रहाटगाडग्यात ती विस्मृतीत गेल्यागत. प्रगती झाली नाही.

  योगायोगानं दिलीपजींनी स्वतः पुर्नलेखन केलेल्या काव्याची रचना हाती मिळाली आणि दत्ता थिटे त्यांच्यातला संगीतकार नव्या दमात जागा झाला. त्यागराज खाडीलकर यांचे स्वर मिळविले. श्रीपाद थिटे यांनी निर्मितीची बाजू सांभाळली. आकाराला आलं एक सुरेल भावगीत! जे स्मृतिदिनी पुण्यात सादर झालं. शिवाय युट्युबवरही पोहचलं. दिलीपजींच्या चाहत्या मित्रांनी देश-विदेशातून त्यातून आदरांजली अर्पण केली.

  या निमित्तानं एक दर्जेदार रंगइतिहास नजरेपुढं आला. त्यांच्या अनेक नाटकांनी नाट्यसृष्टीला बहार आणली होती. नाटकांच्या नुसत्या नावांवर जरी नजर फिरवली तर त्याची प्रचिती येते. ‘आई रिटायर होतेय’, ‘आसू आणि हसू’, ‘गोडगुलाबी’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चिरंजीव आईस’, ‘छावा’, ‘कवडीचुंबक’, ‘दीपस्तंभ’, ‘मोरूची मावशी’, ‘ययाती’, ‘राजाचा खेळ’, ‘सोनचाफा’ अशी एकापेक्षा एक सरस नाटकं. ‘ताईच्या बांगड्या’, ‘शेजारी – शेजारी’ या चित्रपटांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं, पण ते रमले नाटकातच. प्रत्येक नाट्यकृती आणि त्याला त्यांनी दिलेली ट्रीटमेंट ही नाट्य अभ्यासकांच्या दृष्टीनं विचार करायला लावणारी होती. रसिकांनी या त्याच्या तिसऱ्या स्मृतिदिनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

  रंगधर्मी दिलीप कोल्हटकर हे दिग्दर्शक, अभिनेते, प्रकाशयोजनाकार म्हणून जगापुढे प्रकाशात आले होते, पण हळवा कोपरा असणारा यांच्यातला कवी निवडक मित्रांसोबत कायम असायचा हेच दिसून आलं.

  …………………………

  गाथा खुळ्या दिलाची

  गीत – कै. दिलीप कोल्हटकर

  स्वर – त्यागराज खाडीलकर

  संगीत – दत्ता थिटे

  निर्मिती – श्रीपाद थिटे

  संयोजन – बँक ऑफ बडोदा मित्रपरिवार