एनसीबीने क्षितीजला ब्लकमेल केले आणि.., वकिलाचा हायकोर्टात आरोप

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसादला ब्लॅकमेल केले आणि त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, असे सांगतानाच क्षितीजला ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे, असा आरोप मानेशिंदे यांनी केला आहे. शिवाय, या प्रकरणात निर्माता करण जोहरसह अन्य काही लोकांची नावे घेण्यासाठी त्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावाही मानेशिंदे यांनी केला आहे.

 मुंबई: बॉलिवूड (Bollywood)  ड्रग्ज प्रकरणात (Drugs case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) (NCB) गेल्या आठवड्यात धर्मा प्रोडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसादला (Kshitij Prasad)  अटक केली असून तो सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. अशातच, प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसादला ब्लॅकमेल केले आणि त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, असे सांगतानाच क्षितीजला ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे, असा आरोप मानेशिंदे यांनी केला आहे. शिवाय, या प्रकरणात निर्माता करण जोहरसह अन्य काही लोकांची नावे घेण्यासाठी त्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावाही मानेशिंदे यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी वाईट वागणूक दिली

क्षितीज प्रसादवर चौकशीदरम्यान करण जोहर आणि त्यांचे टॉप एक्सीक्युटिव्ह यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र, प्रसादने त्यांचे ऐकले नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी क्षितीजला वाईट वागणूक दिली. समीर वानखेडे क्षितीजला म्हणाले, जर तू ऐकले नाही, तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि वानखेडेंनी क्षितीजला आपल्या खुर्चीच्या जवळ जमिनीवर बसायला सांगितले. त्यांनी त्याच्या चेहऱ्याजवळ आपला शूज असलेला पाय नेला आणि म्हणाले की, तुझी खरी लायकी हीच आहे. वानखेडे यांच्या या वागणुकीवर त्यावेळी तेथील दुसरे अधिकारी हसत होते, असे मानशिंदे यांनी कोर्टाला सांगितले.

कुणालाही क्लीन चिट नाही

एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना यांनी रविवारी मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बॉलिवूड सेलेब्सची चौकशी, पुरावे, निवेदने आणि अटक यावर चर्चा झाली. अस्थाना यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी असल्याचे सांगत सर्वप्रथम पुराव्यांचा आढावा घेण्याची सूचना केली. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने आतापर्यंत ज्या सेलिब्रिटींची चौकशी केली आहे, त्यांच्यापैकी कुणालाही सध्या क्लीन चिट दिली नाही. याव्यतिरिक्त, 20 हाय-प्रोफाइल ड्रग पेडलर्स तपास एजन्सीच्या रडारवर आहेत. डेटाचा बॅकअप घेण्यासाठी श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत.

करण जोहरचा पार्टी व्हिडिओ खरा

एनसीबीच्या बैठकीत करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हीडिओवरही चर्चा झाली. व्हीडिओचा फॉरेन्सिक अहवाल तपास यंत्रणेला प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून समजते आणि त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की व्हीडिओ खरा असून त्यात छेडछाड केली गेली नाही.