sushant-singh-rajput

अंमली पदार्थ पेडलर अनुज केशवानीकडे(Keshwani) सापडलेल्या ड्रग्सचे पुन्हा वजन करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने (एनडीपीएस) अमली पदार्थ विरोधी पथका(एनसीबी) (NCB) ला दिले. त्यानिर्णयाला एसीबीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

    मुंबई: सुशांतसिंह राजपूतच्या(Sushantsing Rajput) आत्महत्येनंतर अटक करण्यात आलेल्या अंमली पदार्थ पेडलर अनुज केशवानीकडे(Keshwani) सापडलेल्या ड्रग्सचे पुन्हा वजन करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने (एनडीपीएस) अमली पदार्थ विरोधी पथका(एनसीबी) (NCB) ला दिले. त्यानिर्णयाला एसीबीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

    मागील वर्षी १४ जून रोजी सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर समोर आलेल्या अंमली पदार्थाच्या कनेक्शनमुळे एनसीबीने अनेक ड्रग्स पेडलरला अटक केली त्यात गतवर्षी सप्टेंबरमध्ये अनुज केशवानीलाही अटक करण्यात आली होती.

    याप्रकरणी अनूजकडून एकूण ५८५ ग्रॅॅम चरस, २७०.१२ ग्रॅम गांजा, ३.६ ग्रॅम टीएचसी आणि ०.६२ ग्रॅम एलएसडी एनसीबीने जप्त केले असल्याचे पंचनाम्यात म्हटले होते. त्यावर आक्षेप घेत केशवानी यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात सांगितले की, ०.६२ ग्रॅमच्या द्रव्यरुपी असलेल्या एलएसडीसोबत ब्लॉट पेपरच्या वजनाचाही समावेश आहे. त्यामुळे रासायनिक विश्लेषण अहवालात एलएसडी आणि ब्लॉट पेपपरच्या वजनाचा वेगवेगळा उल्लेख नसल्याचा दावाही केशवानी यांच्या वकिलांनी केला. त्याची दखल घेत विशेष न्यायालयाने ३० एप्रिल रोजी ब्लॉट पेपरशिवाय एलएसडीचे पुन्हा वजन करण्यासाठी एनसीबीला गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायवैद्कीय प्रयोगशाळेत पाठविण्याचे आदेश दिले. त्याविरोधात एनसीबीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सोमवारी न्या. अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    ब्लॉट पेपरचे वजनही या अहवालात येणं गरजेचं होते. कारण ‘नार्कोटिक्स’ या शब्दामध्ये अमली पदार्थ आणि त्याच्या सेवनाची सामग्री या दोघांचाही अंतर्भाव होतो. म्हणून एलएसडीबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये एलएसडीच्या मुख्य वजनाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. एलएसडी हा द्रव रुपात असल्याने तो ब्लॉटिंग पेपर अथवा जिलेटिनसदृश्य पेपरमध्ये सेवन केला जातो. त्यामुळे एलएसडीच्या वजानसोबत ‘त्या’ पेपरचेही वजन करणे आवश्यक आहे. अशी माहिती एनसीबीच्यावतीने वकील श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयाला दिली आणि विशेष न्यायालयाने दिलेले आदेश रद्दबातल करून स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

    त्यावर विशेष न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार एलएसडी ड्रग्सचे पुन्हा वजन केल्यास एनसीबीला कोणताही पूर्वग्रह असू नये, कारण, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने एलएसडी ड्रग्सचा पुन्हा वजन करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे केशवानी यांच्यावतीने बाजू मांडताना वकील तारीक सय्यद आणि गायत्री गोखले यांनी सांगितले. त्यावर विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश एनसीबीला देत खंडपीठाने सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली.