एमबीएनंतर अभिनयासाठी ‘फिरस्त्या’ बनला हरीश, वाचा खोऱ्यानं पुरस्कार ओढणाऱ्या या चित्रपटाबद्दल!

'फिरस्त्या'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा हरीश बावस्कर हा कलाकार सध्या चर्चेत आहे. 'फिरस्त्या'च्या निमित्तानं हरीशनं एमबीएनंतर अभिनयासाठी केलेल्या फिरस्तीची कथा 'नवराष्ट्र'सोबत शेअर केली.

  चंदेरी दुयिनेचा एक अलिखीत नियम आहे. इथं जो कठोर मेहनत घेतो तोच यशस्वी होतो. मग त्यानं अभिनयाचं किंवा दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेणं, न घेणं ही इथं गोष्ट दुय्यम ठरते. रसिकही अशा कलाकार-तंत्रज्ञांना डोक्यावर घेत असल्याची बरीच उदाहरणं आपण पाहिली आहेत. नगरचा असाच एक कलाकार मागील दोन वर्षांपासून मुंबईत तग धरून आहे. स्वत:ला व्यावसायिक नट म्हणून सिद्ध करण्यासाठी या बहाद्दरानं एमबीए केल्यानंतर मिळालेल्या नोकरीला रामराम ठोकत अभिनयाला सलाम केला आहे. दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘फिरस्त्या’ हा पहिला वहिला चित्रपट सध्या देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये खोऱ्यानं पुरस्कार ओढत आहे. याच ‘फिरस्त्या’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा हरीश बारस्कर हा कलाकार सध्या चर्चेत आहे. ‘फिरस्त्या’च्या निमित्तानं हरीशनं एमबीएनंतर अभिनयासाठी केलेल्या फिरस्तीची कथा ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केली.

  अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या बऱ्याच कलाकारांनी आजवर स्वत:ला सिद्ध करत नावलौकीक मिळवला आहे. अशा कलाकारांपैकीच एक असलेला हरीश बारस्कर हा मूळचा अहमदनगरमधील सावेडी गावचा आहे. वडील सरकारी नोकरी आणि घरची शेती असलेल्या हरीशनं एमबीएनंतर अभिनय करण्याचा निर्णय घेतला. याबाबत हरीश म्हणाला की, मी जरी गावाकडचा असलो तरी पुणे विद्यापीठातून एमबीए केलं आहे. याच बेसवर पुण्यात नोकरी करत होतो, पण अभिनयाबाबतची आवड गप्प बसू देत नव्हती. हौशी कलाकार म्हणून काम करत असताना नोकरी नकोशी वाटत होती. नोकरीत मन रमत नव्हतं. त्यामुळं अभिनेता म्हणूनच काम करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर नाटकाचा ग्रुप पुढे नेण्याचाच प्रयत्न सुरू केला. हरीशची भूमिका असलेल्या ‘फिरस्त्या’ या चित्रपटानं जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतेच स्वीडनमध्ये या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्ट फेस्टिव्हलमध्येही ‘फिरस्त्या’ची निवड झाली आहे. आतापर्यंत एकूण २३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर ‘फिरस्त्या’नं आपलं नाव कोरलं आहे.

  मूळचा अहमदनगरमधील असलेला हरीश मागील १५ वर्षांपासून थिएटरमध्ये काम करतोय. निर्मिती रंगमंच या ग्रुपच्या माध्यमातून काही नाटकं रंगभूमीवर आली आहेत. यापैकी त्याचं ‘खटारा’ हे नाटक स्पर्धेमध्ये गाजलं आहे. व्यावसायिक कलाकार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून हरीश मुंबईत स्थायिक झाला आहे. अभिनयातील आपल्या आजवरच्या प्रवासाबाबत हरीश म्हणाला की, मी अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. सुरुवातीला हौशी कलाकार म्हणूनच काम करत होतो. एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा आणि व्यावसायिक नाटकं असा प्रवास सुरू होता. २०१७ मध्ये ‘खटारा’ या नाटकासाठी अभिनयाचं रौप्य पदक मिळाल्यानंतर बऱ्याच मित्रांनी मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. मुंबईमध्ये आल्यानंतर ‘एक होती राजकन्या’, ‘विठू माऊली’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकांममध्ये अभिनय केला आहे. २०१५ मध्ये नगरमध्ये असतानाच ‘घुमा’ चित्रपटात काम केल्याचा फायदा मालिका मिळवण्यासाठी झाला. मुंबईत आल्यावर ‘अरुणा’, ‘ट्रीपलसीट’, ‘गिरदाब’, ‘सावित्रीयायण’, ‘चेपस’ हे चित्रपट केले आहेत. ३५ हून अधिक शॅार्टफिल्म्स केल्या आहेत. आता मात्र ललित कला केंद्र किंवा एनएसडी यांसारख्या संस्थांमधून शिक्षण घेतलं असतं तर आणखी जास्त फायदा झाला असता असं वाटतं.

  एका गरीब मुलाची फिरस्ती
  ‘फिरस्त्या’ या चित्रपटात खेडेगावातील पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाचा प्रवास आहे. गावांमधील मुलांच्या डोळ्यांमध्येही मोठमोठी स्वप्नं तरळत असतात. या स्वप्नांचा पाठलाग करत जो कठोर मेहनत घेतो आणि येणाऱ्या संकटांचा यशस्वीपणे सामना करतो तोच शिखरावर पोहोचतो असं सांगणारा हा चित्रपट आहे. एखादं मोठं स्वप्नं साकार करण्यासाठी त्या तरुणानं केलेला स्ट्रगल, त्याच्या बरोबरीनं त्याच्या कुटुंबियांचा प्रवास, त्याच्या जीवनात आलेल्या तरुणीच्या भावना अशा वेगवेगळ्या ट्रॅक्सच्या माध्यमातून ‘फिरस्त्या’चं कथानक उलगडत जातं. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी केलं आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाविषयी आवड असल्यानं पहिलाच चित्रपट असूनही भोसले यांचं व्हिजन क्लीयर होतं. स्वप्नाली भोसले यांनी झुंझार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘फिरस्त्या’ची निर्मिती केली आहे. बार्शी, मुंबई, सातारा, दिल्ली, पुणे या ठिकाणी हा चित्रपट शूट झाला आहे. या चित्रपटात मयूरी कापाडणे, अंजली जोगळेकर, आज्ञेश मुडशिंगेकर, श्रावणी अभंग, समर्थ जाधव आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

  शिक्षणाचं महत्त्व पटवणारा बापू
  या चित्रपटात मी स्वप्न पाहणाऱ्या मुलाच्या वडीलांचा रोल केला आहे. याचं नाव बापू आहे. यात समीर परांजपेनं माझ्या मुलाची भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील बार्शी इथं घडणारी ही गोष्ट आहे. बापू शेतकरी आहेच, पण त्यासोबतच इतरही जोडधंदे करून कुटुंबाचं पालणपोषण करत असतो. मोल मजूरही करतो. जे मिळेल ते काम करून त्याला आपल्या मुलांची स्वप्नं साकार करायची आहेत. कुटुंबाची गुजराण करत असतो. आपल्या मुलानं शिकावं अशी वडीलांची खूप इच्छा असते. त्यासाठी हालाखीच्या परिस्थीत दिवस काढूनही तो मुलाला शिकवतो. मुलाचा बालपणीपासूनचा प्रवास यात आहे. लहानपणी ज्या मुलाला शाळा आवडत नसते, बापू त्याला शाळेचं महत्त्व पटवून सांगतो. शाळा शिकणं किती गरजेचं आहे हे समजावून सांगतो. आमच्या बाबतीत जे घडलं ते तुझ्या बाबतीत घडू नये. आम्ही शिकलो नसल्यानं लोकं आम्हाला जनावर समजतात. हे सत्य समजल्यावर त्या मुलाला शिक्षणाची गोडी लागते. ही भटक्या जमातीतल कुटुंबाची कथा नाही, तर एक मुलगा शिक्षणासाठी कशा प्रकारे भटकत असतो त्याचा प्रवास यात आहे.