निखिलचा ‘रावसाहेब’ प्लॅनेट मराठीच्या प्लॅटफॉर्मवर!

याचं लेखन निखिलनं प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे यांच्या साथीनं केलं आहे. पोस्टर पाहता हा चित्रपट वन्यजीवनावर आधारित असल्याचं दिसतं.

    मराठीतील पहिलं ओटीटी असलेलं ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांसाठी नवनवीन वेबसिरीज, वेबफिल्म, चित्रपट घेऊन येत आहे. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. लेखक, दिग्दर्शक निर्माता निखिल महाजनच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ‘रावसाहेब’ या आगामी चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. अक्षय बर्दापूरकर व प्लॅनेट मराठी एस. एस. प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिलनं केलं असून, हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    याचं लेखन निखिलनं प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे यांच्या साथीनं केलं आहे. पोस्टर पाहता हा चित्रपट वन्यजीवनावर आधारित असल्याचं दिसतं. याची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी आणि निखिल यांनी केली आहे. चित्रपटाविषयी निखिल म्हणाला की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘रावसाहेब’चं टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, यापेक्षा मोठी भेटवस्तू असूच शकत नाही.

    या चित्रपटामुळं पुन्हा एकदा या सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळणं खूप मोलाचं आहे. या चित्रपटाविषयी मी आत्ताच काही सांगणार नाही. मात्र हा विषयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की.