प्रेक्षकांसाठी ‘या’ मराठी वाहिनीची अनोखी भक्तीमय भेट!

महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या वारीची परंपरा जपण्यासाठी तसेच भक्तीचे अतूट बंध निर्माण करणाऱ्या पंढरपूरच्या आनंदवारी सोहळ्याची अनुभूती भक्तांना मिळावी यासाठी ‘वारी तुमच्या दारी’हा अनोखा उपक्रम शेमारू मराठीबाणा वाहिनीने योजिला आहे.

  पंढरीची वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढ महिन्याची सुरुवात झाली की, सगळ्यांनाच पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात. ही वारी जीवन कृतार्थतेचा मार्ग दाखवते. कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला खंड पडला आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष वारी करणे शक्य होणार नसले तरी विठूरायांच्या भक्तांची भक्तीची ओढ जराही कमी झालेली नाही. वारकऱ्यांची वारी थांबली तरी भक्तीची परंपरांगत वहिवाट मात्र थांबलेली नाही त्यासाठीच भक्ती आणि मनोरंजनाचा आगळा मेळ साधत शेमारू मराठीबाणा वाहिनी भक्तांसाठी विठ्ठल भेटीचा मार्ग अधिक प्रशस्त करणार आहे. वारकऱ्यांसाठी विट्ठल धावुनिया आला, दारोदारी रंगेल अनोखा सोहळा! या उक्तीप्रमाणे भक्ती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून माऊली विशेष कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन शेमारू मराठीबाणा वाहिनीतर्फे करण्यात येणार आहे. ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’, ‘वारी तुमच्या दारी’, भक्तीगीत रचना अशा तीन अनोख्या संकल्पनांच्या सादरीकरणातून विठूमाऊलीचे हे विशेष उपक्रम वेगवेगळ्या माध्यमांतून रंगणार आहेत.

  कीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने कीर्तन करत जनजागृती केली आहे. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या ‘आषाढवारी विशेष’ कीर्तन मालिकेतंर्गत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रंगणार आहे. ह.भ.प. उत्तम महाराज बडे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. सौ. संगीताताई येनपुरे चोपडे, ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर, ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्रीजी आदि नामवंत कीर्तनकार रविवार ४ जुलैपासून दररोज सायंकाळी ६ वा. आपले कीर्तन सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज चिरपुटकर करणार आहे.

  महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या वारीची परंपरा जपण्यासाठी तसेच भक्तीचे अतूट बंध निर्माण करणाऱ्या पंढरपूरच्या आनंदवारी सोहळ्याची अनुभूती भक्तांना मिळावी यासाठी ‘वारी तुमच्या दारी’हा अनोखा उपक्रम शेमारू मराठीबाणा वाहिनीने योजिला आहे. शेमारू मराठीबाणा या आपल्या  नावाला जागत आजवर वेगेवगळे उपक्रम राबवणाऱ्या या वाहिनीचा‘वारी तुमच्या दारी’ हा उपक्रम ही असाच अनोखा आहे. एका चित्ररथाला पंढरपूरच्या मंदिराचे स्वरूप देत हा चित्ररथ वेगवेगळ्या शहरांत जाऊन तिथल्या भक्तांसाठी भक्तीद्वार खुले करणार आहे. ५ जुलैपासून  पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधल्या ११ शहरांतून  हा चित्ररथ फिरणार आहे. वारकऱ्यांच्या साथीने भजन, कीर्तन, नामगजर, हरिपाठ, भारूड या सगळ्या अध्यात्माच्या भक्तिखेळाचे दर्शन घडविले जाणार आहे. ९ दिवस प्रत्येक शहरांत वारीचा भक्ती सोहळाच रंगणार आहे. फलटणपासून सुरु झालेल्या या सोहळ्याची सांगता पंढरपूरात होणार आहे. यात सहभागी विठ्ठलभक्तांसाठी खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वारकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.

  ‘लेकराला जशी एकच आई, तशी वारकऱ्याला एकच माऊली… तो म्हणजे विठ्ठल’. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या अनेकांना भक्तीगीते स्फुरली आहेत. विठ्ठल आणि भक्तांच्या अभंग आणि चिरंतन नात्याला अधोरेखित करण्यासाठी अनोख्या भक्तीगीत रचनेची संधी देखील भक्तांना शेमारू मराठीबाणा वाहिनीतर्फे देण्यात येणार आहे. वाहिनी व वाहिनीच्या सोशल माध्यमातून हा आगळावेगळा उपक्रम राबविला जाणार आहे. भक्तीगीताच्या पहिल्या दोन ओळी शेमारू मराठीबाणा या वाहिनीतर्फे दिल्या जातील. त्याला अनुसरून गीताच्या पुढच्या दोन ओळी तयार करायच्या असून उत्कृष्ट ओळींची निवड करून शेमारू मराठीबाणा वाहिनीतर्फे भक्तीगीताची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाधिक सहभाग नोंदवण्याचे आवाहन वाहिनीने केले आहे.

  हे सर्व उपक्रम करोनाचे सर्व नियम पाळून केले जाणार असल्याचे वाहिनीने स्पष्ट केलं आहे. सध्याच्या कठीण काळात प्रत्येकाला जगण्याची ऊर्जा मिळावी, आनंदाचे काही क्षण लाभावे यासाठी मनोरंजनाच्या यज्ञात, ‘माऊली विशेष’ कार्यक्रमाचे आगळेवेगळे पुष्प अर्पण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे शेमारू मराठीबाणा वाहिनीने सांगितले. मनोरंजनाच्या व अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून या वारीची अनुभूती घेण्यासाठी तुम्ही ही कपाळी गंध लावून या वारीत सहभागी व्हा आणि या आगळ्या वेगळ्या संकल्पनांचा आस्वाद नक्की घ्या.  

  वारीचे ‘चैतन्य’ व ‘अनुभूती’ नव्या स्वरुपात अनुभवण्यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनी अवश्य पहा तसेच वाहिनीचे फेसबुक इंस्टाग्राम पेज नक्की फोलो करा.