स्वराज्याच्या इतिहासातील एका अभूतपूर्व लढतीचा दिवस….’पावनखिंडीचा रणसंग्राम’

छत्रपती शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या बलिदानाची गाथा उलगडणारा 'पावनखिंड' चित्रपटाच्या रूपाने लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

    पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी या रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. लढण्याची जिद्द असेल तर प्रचंड फौजफाटा आणि अमाप शस्त्रास्त्रांचा वापर न करतासुद्धा लढाई जिंकता येते याचा प्रत्यय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांची जिद्द पहाताना येतो. याच प्रबळ जिद्दीच्या बळावर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंडीचा लढा अभूतपूर्व पराक्रमाने लढला.

     

    या पराक्रमी दिनाचे औचित्य साधून झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या टीमच्या वतीने या नरवीरांना आणि त्यांच्या हौतात्म्याला हे पोस्टर समर्पित करण्यात आले आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे.

    जुलै महिन्यातील अंधारी रात्र, मुसळधार कोसळणारा पाऊस मशालीच्या उजेडात रस्ता तुडवत मराठी सैन्य गजापूरच्या घोडखिंडीत पोहोचले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी, फुलाजी बंधू आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.