संवादाने होत आहे रे…, वाचा ‘जून’ मराठी चित्रपटाचं परिक्षण आणि ठरवा चित्रपट बघायचा की नाही!

सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या नवोदित दिग्दर्शकांनी नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांना मुख्य भूमिकेत घेऊन सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा विषय काहीशा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं धाडस केलं आहे.

    आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आहे. कोणाला थांबायला वेळ नाही. इतकंच काय तर कोणाला बोलायलाही वेळ नाही. त्यामुळं आयुष्यातून संवादाची निवृत्ती होत असून, विसंवादाची उत्पत्ती होऊ लागली आहे. याचा परिणाम थेट मानसिक आरोग्यावर होऊ लागला आहे. नातेसंबंध दुरावत आहेत. यातून वेळीच सावरायचं असेल तर त्यावर संवाद हाच एकमेव उपाय असल्याचं आज बरेच जाणकार सांगत आहेत. हाच धागा पकडून बनवलेला ‘जून’ हा मराठी चित्रपट प्लॅनेट मराठी या नव्या ओटीटीवर रसिकांच्या भेटीला आला आहे. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या नवोदित दिग्दर्शकांनी नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांना मुख्य भूमिकेत घेऊन सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा विषय काहीशा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं धाडस केलं आहे.


    ही कथा आहे औरंगाबादमध्ये राहणाऱ्या नीलची (सिद्धार्थ मेनन). त्याचे बाबा (किरण करमरकर) कर्ज काढून त्याला पुण्यात इंजिनीयरींगसाठी पाठवतात, पण तिथे फेल होऊन नील पुन्हा औरंगाबादमध्ये येतो. परत आल्यापासून नील काहीसा विक्षिप्त वागू लागतो. स्वत:ला इजा करून घेणं, सोसायटीतील गाड्यांवर स्क्रॅचेस ओढणं, गर्लफ्रेंडशी तुसडेपणानं वागणं असे प्रकार करत असतो. त्याच सोसायटीत नेहा (नेहा पेंडसे) नावाची काहीशी फॅारवर्ड विचारांची तरुण स्त्री रहायला येते. दोघांच्या पहिल्याच भेटीची सुरुवात गैरसमजानं होते, पण नंतर गैरसमज दूर होऊन दोघांची मैत्री होते. ही नेहा दुसरी तिसरी कुणी नसून नीलच्याच अतिशय जवळच्या अभिदादाची (जितेंद्र जोशी) पत्नी असते. अभिला सोडून नेहा का आलीय? हे कोणालाच समजत नसतं आणि नील असा का वागतो? याचं उत्तरही कोणाकडे नसतं. दोघांची मैत्री झाल्यानंतर हळूहळू या प्रश्नांची उत्तरं मिळतात. अखेरीस सर्वांच्याच मनातील किल्मिषं दूर होतात आणि दोघांच्याही मनावर नवतुषारांची बरसात होते.
    चित्रपटाचा विषय खूप चांगला असून, सद्य परिस्थितीला अनुरुप आहे. वेळीच संवाद साधला गेला तर कितीतरी नाती तुटणार नाही, तर ती सांधली जातील आणि भविष्यात अधिकच घट्ट होतील. हा विचार या चित्रपटाद्वारे मांडताना त्याला चाकोरीबद्ध मराठी चित्रपटांपेक्षा काहीशी वेगळी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही दृश्य विचलीत करणारी असल्यानंच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हणता येईल. त्या वेळेची मानसिक स्थिती दर्शवण्यासाठी ती दृश्यं समर्पक असली तरी अंगावर येतात. तरीही ते दाखवण्याचं धाडस सुहृद-वैभव या जोडीनं केलं आहे. वैचारीक जुगलबंदी छान जमली आहे. कमी लांबीच्या चित्रपटात जे सांगायचं आहे ते दिग्दर्शकांनी कोणतेही आढेवेढे न घेता थेट सांगितलं आहे. शाल्मली खोलगडेचा संगीत देण्याचा पहिला प्रयत्नही मनाला भावतो. ग्लोबल विचारसरणीतून दिलेला संगीताचा बाज विषयाला पूरक वाटतो.
    नेहा पेंडसे बऱ्याच दिवसांनी मराठीत दिसतेय. तिनं साकारलेली नेहा आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळी आहे. या व्यक्तिरेखेनं नेहामधील अभिनेत्रीचे वेगळे पैलू समोर आणले आहेत. सिद्धार्थ मेनननं पुन्हा एकदा आपली अभिनयक्षमता सिद्ध केली आहे. प्रथमदर्शनी ही जोडी वाटत असली तरी चित्रपटात मात्र वेगळी चित्र पहायला मिळतं. दोघांनीही एकमेकांना पोषक अभिनय करत उत्तम साथ दिली आहे. किरण करमरकरांनी बाबांच्या भूमिकेत सुरेख काम केलं आहे. निलेश दिवेकरनं साकारलेला जैसवालही चांगला आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांनी मिळून ‘जून’सारखा वेगळ्या धाटणीचा बनवलेला चित्रपट एकदा तरी पहायला हवा.