धक धक गर्लच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचं ग्रॅण्ड ओपनिंग!

सुरुवातीपासूनच 'प्लॅनेट मराठी'सोबत अनेक नावाजलेल्या व्यक्ती जोडल्या गेल्या. त्यात आता आपल्या सर्वांची लाडकी माधुरी दीक्षितही 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाली आहे.

    फुलांची सजावट… ढोल ताशांचा गजर… राजेशाही थाट… उत्साहवर्धक वातावरण…. आणि या सगळ्या पारंपरिक सोहळ्यात ‘ती’ची दिमाखदार एंट्री. पण, ‘ती’ कोण असा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडला असेल? जिच्या सदाबहार हास्याने आजही जगभरातील चाहत्यांच्या हृदयाची धक् धक् वाढते अशी आपली मराठी मुलगी माधुरी दीक्षित. निमित्त होतं ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या ॲप लाँचचे. मागील काही महिन्यांपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम देत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘म’ या लोगोची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. आज बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’शी जोडली गेली आहे. या भव्य कार्यक्रमाला ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थपक अक्षय बर्दापूरकर यांच्यासह ‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारातील आणि मराठी मनोरंजन विश्वातील अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचित पाटील, प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, गायत्री दातार, संजय जाधव, सोनाली खरे, सायली संजीव, सुरभी हांडे, निखिल महाजन, दीप्ती देवी, भाग्यश्री मिलिंद, रेशम श्रीवर्धनकर, सुशांत शेलार या तारे-तारकांनी हजेरी लावली होती.

    सुरुवातीपासूनच ‘प्लॅनेट मराठी’सोबत अनेक नावाजलेल्या व्यक्ती जोडल्या गेल्या. त्यात आता आपल्या सर्वांची लाडकी माधुरी दीक्षितही ‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारात सहभागी झाली आहे. यापूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणारा ‘जून’ चित्रपट प्रदर्शित झाला असून यापुढे प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ‘सोप्पं नसतं काही’, ‘हिंग पुस्तक तलवार’, ‘जॉबलेस’, ‘बाप बीप बाप’, आणि ‘परीस’ या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसिरीज आणि काही मनोरंजनात्मक आणि दर्जेदार चित्रपट पाहता येणार आहेत. मनोरंजनाचा हा खजिना वेबसिरीज, वेबफिल्म्स आणि चित्रपटांपुरताच मर्यादित नसून हळूहळू प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या जादुई पोतडीतून नवनवीन कंटेन्ट मिळणार आहे. हा कंटेन्ट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी असून येत्या वर्षभरात तब्बल २४ वेबसिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत. सध्या ४० मराठी चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार असून पुढील तीन महिन्यांत ही संख्या सुमारे तिपट्टीहून अधिक असेल. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती टॉक शो या विभागात असणार आहेत. पारंपरिक संगीतापासून ते आधुनिक संगीतापर्यंत तब्बल २० सांगितिक मैफिलींचा आनंद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. तर आगामी काळात म्युझिक व्हिडिओज, पॅाडकास्ट, कॅराओके, कॉन्सर्ट्स, गेमिफिकेशन असे विविध प्रकार प्रेक्षकांना अनुभवता येतील. हे ॲप प्रेक्षकांना मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषेत वापरता येईल.

    ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ बरोबरच्या या नव्या नात्याबद्दल अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणते, ”जगभरातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केवळ मराठी ॲपची निर्मिती करणे, हे अक्षय बर्दापूरकर आणि त्यांच्या टीमने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्री एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणार आहे. मराठी फिचर फिल्म्स आणि आशयामध्ये खूपच क्षमता आहे, जी अजून जगभरातील प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही. या व्यासपीठामुळे चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीस्कर होणार आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा जो खजिना आणला आहे, तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. या दर्जेदार कंटेन्टला तोड नाही. हा माझा सन्मान आहे, की या सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणे, हा खरोखर अद्भुत अनुभव होता. मी सुद्धा एक अशी मराठी प्रेक्षक आहे, जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी मराठी चित्रपट, वेबसिरीज आवर्जून पाहाते. माझ्या मते, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे असे आहे, ज्याची जगभरातील मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते.”

    प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”आज इतक्या महिन्यांची आमची मेहनत फळाला आली आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून दुग्धशर्करा योग म्हणजे माधुरी दीक्षित सारखी गुणी अभिनेत्री ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या परिवारात सहभागी झाली आहे. त्यामुळे विशेष आनंद आहे आणि यासाठी मी तिचा आभारी आहे. आमच्या या परिवारात अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा सहभाग होत आहे, याहून मोठी गोष्ट कोणती असू शकते? माधुरी दीक्षितबद्दल सांगायचे तर तीन दशकांहून अधिक काळ जिने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले, तिची जादू आजही कायम आहे. माधुरी काही काळ परदेशातही राहिली. मात्र महाराष्ट्राशी तिची नाळ जोडली गेल्याने ती परत मायदेशी परतली. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ही माधुरीसारखेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ लाँचबाबत आनंदही आहे आणि कुठेतरी मनात एक उत्सुकता आहे की, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल? मात्र प्रेक्षकांना दर्जेदार कंटेन्ट देण्याची आमची बांधिलकी आम्ही पूर्णपणे जपणार आहोत.”