आता वाद नाही आशीर्वाद : प्रल्हाद कुडतरकर

पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या साक्षीनं पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या मालिकेत पांडू नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रल्हादनं 'नवराष्ट्र'शी साधलेला हा संवाद.

  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेनं आपल्या तीन भागांच्या आजवरच्या प्रवासात बऱ्याच कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. यासोबतच झी मराठी वाहिनीवरील या मालिकेनं अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकरचीही नवी ओळख निर्माण केली आहे. लॅाकडाऊनमुळं शूट बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले’ सध्या प्रसारीत होत नसली तरी, लवकरच शूट सुरू होऊन पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या साक्षीनं पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या मालिकेत पांडू नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रल्हादनं ‘नवराष्ट्र’शी साधलेला हा संवाद.

  गिरणगाव आणि कोकण या दोन ठिकाणांचा पगडा असलेला प्रल्हाद परेलमधील भोईवाड्यात लहानाचा मोठा झाला आहे. सध्या सायनला राहणाऱ्या प्रल्हादला एमडी कॅालेजच्या व्यासपीठानं घडवलं. मूळचा कणकवलीमधील तोंडवली गावचा रहिवासी असलेल्या प्रल्हादनं ‘का रे दुरावा’, ‘गाव गाता गजाली’, ‘जागे मोहन प्यारे’, ‘१०० डेज’, ‘आभास हा’, ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकांचं लेखन केलं आहे. एमडी कॅालेजमधून अॅक्टर, लेखक दिग्दर्शक म्हणून एकांकीका केल्या आहेत. २०१५ मध्ये केलेल्या ‘एक बाकी एकाकी’ या प्रायोगिक नाटकाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी झी गौरव पुरस्कार मिळाला होता. ‘वीर दौडले सातच’ हे नाटक केलं होतं. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेनं प्रल्हादला प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळवून दिलं आहे. याबाबत तो म्हणाला की, आम्ही करतानाच काहीतरी चांगलं आणि वेगळं करण्याचा विचार केला. लोकप्रियता मिळेल किंवा नाही याचा विचार केलाच नव्हता. काहीतरी क्रिएटीव्ह काम करायचं हा आमच्या टीमसोबतच वाहिनीचाही प्रयत्न होता. जे केलं ते इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीचं झाल्यानं त्याला लोकप्रियता मिळाली.

  ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग येण्याबाबत प्रल्हाद म्हणाला की, पहिला भाग झाल्यावर दुसरा भाग डोक्यात नव्हता. झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी दुसऱ्या भागाची संकल्पना सुचवली. यात प्रिक्वेलला वाव मिळाला. दुसरा भाग संपतानाही तिसऱ्या भागाबाबत विचार केला नव्हता, पण एकंदरच प्रेक्षकांचा रिस्पाँस पाहता तिसरा भाग आपोआपच आला. कारण तेव्हा प्रेक्षकांनी मालिका उचलून धरली होती. दुसरा भाग संपता संपताच तिस्या भागाबाबत विचारणा सुरू झाली होती. या आधीही मालवणी मालिका आल्या, पण ‘रात्रीस खेळ चाले’ कौटुंबिक गोष्ट घेऊन आली. कोकणात अशा खूप गजाली असतात. आपण त्या कुठे ना कुठे ऐकलेल्या असतात. कोकणातल्या माणसांच्या स्वभावांची सांगड घालून ही मालिका आल्यानं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आपल्या घरातील वाटलं. हे या मालिकेचं श्रेय आहे. या मालिकेत नायक-नायिका नाहीत. कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये पांडू, माई आणि सुसल्यासारखी कॅरेक्टर्स असतात. ही सर्व कॅरेक्टर्स लोकांसोबत कुठेतरी कनेक्ट झाल्यामुळेच आपलेपणा वाटला. मालिकेबाबत खूप पूर्वी वाद झाला होता, पण तीन भाग आल्यानंतर आता वाद नव्हे, तर आशीर्वाद आहेत.

  … जेव्हा एखादी भूमिका कलाकाराला निवडते
  एखादी भूमिका एखाद्या कलाकाराला निवडते ते चुकीचं नाही. माधव अभ्यंकरांच्या नशीबात होतं म्हणून त्यांना अण्णा नाईकांची भूमिका मिळाली, पण पुढे त्यांनी मेहनतीनं ती शिखरावर पोहोचवली. नशीब आणि मेहनत या दोन्ही गोष्टींमुळं ते शक्य झालं. अभ्यंकर हे पुण्याचे आहेत. त्यांचा तसा मालवणीशी काही संबंध नव्हता, पण सतत मालवणी ऐकणं, मालवणी नाटक पहाणं, मालवणीसाठी मेहनत घेणं, अभिनयातील वेगवेगळे कंगोरे दाखवणं यातून अण्णा नाईक अत्यंत सुरेखरीत्या प्रेक्षकांसमोर येत गेले आणि लोकप्रियही झाले. त्यामुळं भूमिकेनं एखाद्या कलाकाराला निवडणं आणि कलाकारानं त्या भूमिकेचं सोनं करणं या दोन्ही गोष्टी या मालिकेत घडलेल्या आहेत. अपूर्वा नेमळेकरनं साकारलेल्या शेवंताच्या बाबतीतही मी हेच म्हणेन. शेवंताचं कास्टिंग करताना बऱ्याच आॅडीशन्स घेतल्या. त्यातून अपूर्वा फायनल झाली. त्यामुळं शेवंता तिच्या नशीबातच होती.

  भाग्याचं भाग्य आणि पांडूचं गूढ
  स्टोरीमध्ये एक वेगळं कॅरेक्टर इन करायचं ठरल्यानंतर ते कोण साकारणार हा प्रश्न होता. यासाठी मराठी आणि मल्याळम बोलणारी तरुणी हवी होती. भाग्या नायरनं थिएटर केलं आहे. एकांकीकांमध्ये काम केलं आहे. मराठी आणि मल्याळम या दोन्ही भाषांचा बॅलन्स साधणं तिला नीट जमत आहे. अशा प्रकारचे आर्टिस्ट मिळणं कठीण असतं. माझा मित्र बॅाबीनं ‘सुंदरी’ नावाची एकांकीका बनवली होती. त्यात भाग्याचा अभिनय पाहिल्यानं ती हे कॅरेक्टर करू शकेल असं वाटलं. पांडूबद्दल सांगायचं तर असं कॅरेक्टर गावोगावी पहायला मिळतं. स्वत: कोकणातील असल्यानं हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. पांडूचं कॅरेक्टर थोडंसं रहस्यमय आहे. तो अंदाज कसे देतोय याचंही उत्तर लवकरच उलगडेल. हे आता सांगण्यापेक्षा गोष्टीतूनच उलगडलेलं योग्य होईल.

  प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार
  लवकरच मालिकेचं शूट सुरू होईल. त्यानंतर लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कोकणात सध्या भयंकर पाऊस सुरू असल्यानं पावसाचा व्यत्यय आहेच, पण ‘रात्रीस खेळ चाले’ शक्य तितक्या लवकर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची इच्छा आहे. तिसऱ्या पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळं लोकांना बरेच प्रश्न पडले असतील त्यांची उत्तरं पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. कथानक अधिकाधीक गूढ होत जाईल. ज्या अण्णा आणि शेवंताला लोकांनी डोक्यावर घेतलं ते आता भूतांमध्ये सामील झाले आहेत. ते नेमकं काय करणार आहेत? वाड्याची वाटणी होईल का? वाडा विकला जाईल का? या प्रश्नांची उत्तरं रंजकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.