गोड मायरासोबत प्रार्थनाची ‘रेशीमगाठ’!

मालिकेत प्रार्थनाची परीसोबत बांधलेली 'रेशीमगाठ' रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेच्या निमित्तानं प्रार्थनानं 'नवराष्ट्र'सोबत विशेष संवाद साधला.

  आजवर चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजन करणारी प्रार्थना बेहेरे आता छोट्या पडद्याच्या माध्यमातून रसिकांवर मोहिनी घालत आहे. झी मराठीवरील ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थनाच्या जोडीला श्रेयस तळपदे हा हिंदीतही मराठीचा झेंडा यशस्वीपणे फडकवणारा अभिनेता आहे, पण या मालिकेत प्रार्थनाची परीसोबत बांधलेली ‘रेशीमगाठ’ रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेच्या निमित्तानं प्रार्थनानं ‘नवराष्ट्र’सोबत विशेष संवाद साधला.

  ‘मितवा’, ‘कॅाफी आणि बरंच काही’, ‘व्हॅाट्सअप लग्न’, ‘ती अँड ती’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या प्रार्थनानं आता छोट्या पडद्यावरही एंट्री केली आहे. या निर्णयामागची कारण सांगताना प्रार्थना म्हणाला की, टेलिव्हीजनवर येण्यासाठी आणि ‘तुझी माझी रेशीमगाठ’ ही मालिका स्वीकारण्यामागे बरीच कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे मागील दोन वर्षांच्या कोव्हिडच्या काळात माझ्या फिल्म्स रिलीज होत नव्हत्या. त्यामुळं मी माझ्या आॅडीयन्सपासून दूर गेल्याचं जाणवत होतं. फिल्म्स करत नसल्यानं प्रेक्षक मला पाहू शकणार नसल्यानं त्यांच्याशी कनेक्ट होणं हे सर्वात मोठं कारण होतं. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मी जेव्हा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायचे, तेव्हा मला जनरली एकच प्रश्न विचारला जायचा की, तुम्ही कोणती मालिका का करत नाही? तुम्ही कधी मालिकेत दिसाल? असेच प्रश्न मला सगळीकडे विचारले जायचे. महाराष्ट्रातील छोट्या जिल्ह्यांमध्ये आजही थिएटर्स नाहीत. थिएटर्स असली तरी गावातील लोकांना तिथे जाऊन सिनेमा पाहणं कितपत पॅासिबल आहे हा प्रश्नही आहे. अशा वेळी टेलिव्हीजनवरील मालिकाच त्यांचं मनोरंजन करतात. या आॅडीयन्ससाठी आपण टीव्हीवर यायला हवं हे रिअलाईज झालं. झी मराठीसारखा मोठा प्लॅटफॅार्म, श्रेयस तळपदेसारखा मोठा नट सोबत असणं आणि स्टोरीलाईन खूप छान असल्यानं अखेर टेलिव्हीजनवर येण्याचा योग जुळून आला. ‘तुझी माझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रोमोपासूनच आवडायला लागल्यानं रसिकांचे सर्वप्रथम आभार मानते. सुरुवातीच्या काही एपिसोडसमध्येच प्रेक्षकांना ही मालिका इतकी भावली असल्यानं पुढं आम्ही याहीपेक्षा चांगलं काम करू. स्टोरीत पुढेही चांगलंच घडत जाणार असल्यानं ‘तुझी माझी रेशीमगाठ’नंतर प्रेक्षक दुसरं काही बघणारच नाहीत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

  यांना परी घाबरते!
  मायरा वायकूळ या मालिकेत परीची भूमिका साकारत आहे. मला असं सांगितलं गेलं होतं की, मायरा घाऱ्या डोळ्यांच्या मुलींना घाबरते. त्यामुळं अरे बापरे! आता माझं काय होणार? हा प्रश्न मला पडला होता. मी तिला भेटले तेव्हा पहिल्या भेटीपासूनच ती माझ्यासोबत फ्रेंडली झाली. मी तिला विचारलं की, तुला माझ्या डोळ्यांची भीती नाही वाटत का? त्यावर ती म्हणाली की, नो युवर आईज आर व्हेरी प्रीटी… हे तिचं वाक्य ऐकल्यावर माझ्यातील काहीतरी तिला आवडल्याचं समाधान लाभलं. पहिल्या भेटीतच आमची फ्रेंडशिप झाल्यानं पुढील काम सोपं झालं. आता आम्ही महिन्याभरापासून शूट करतोय. मला देखील लहान मुलं आवडतात. तिच्यासोबत जास्तीत जास्त राहून आम्ही रिहर्सल करतो. ती खूप गोड आहे. तिच्यात इनोसन्स खूप आहे. तिला कॅमेरा काय आहे माहित नाही. ती नॅार्मल जशी बोलते तशीच कॅमेऱ्यासमोरही बोलते. त्यामुळं तिची अॅक्टींग नॅचरल वाटते. विदाऊट अॅक्टींग कशी अॅक्टींग करायची हे मी तिच्याकडून शिकतेय.

  श्रेयसचं कमालीचं कनेक्शन
  मायरासोबत श्रेयस जास्त कनेक्ट आहे. कारण त्यालाही मुलगी असल्यानं त्या दोघांचं नातं खूप वेगळं बनलं आहे. त्याची मुलगीही तीन वर्षांची असल्यानं माझ्याहून जास्त तो कनेक्ट झाला आहे. त्याची आणि तिची फ्रेंडशिप खूप जास्त चांगली आहे. तिला जेव्हा विचारलं की, श्रेयसदादा आणि प्रार्थनाताईमध्ये तुला कोण आवडतं तर तिनं श्रेयसचं नाव घेतलं. श्रेयसला मुलगी असल्यानं त्याला लहान मुलांची सवय आहे. दिग्दर्शक मला सांगतात की तुझ्या डोळ्यांत मातृत्व दिसलं पाहिजे. आता मला ते कळलंय. मला असं वाटतं की, ते दु:ख मला माहित नसलं तरी तिथपर्यंत मी पोहोचू शकतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

  अशी आहे नेहा कामत
  नेहा कामत हे मी साकारत असलेलं कॅरेक्टर खूप साधं भोळं आहे. यंग असतानाच इनफॅक्ट मूल पोटात असतानाच नवरा तिला सोडून गेलाय. तिनंच परीला लहानाचं मोठं केलंय. तीन वर्षे तिला आई-वडील या दोघांचंही प्रेम देत सांभाळलं आहे. त्यामुळं ती जरी अल्लड असली तरी तिला तसं वागून चालणार नाही. तिच्यात मॅच्युरीटी आलीच पाहिजे. समाजाचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. सिंगल मदर म्हणून तिच्याकडं पाहिलं जात आहे. समोर येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करत आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या तिला सांभाळायच्या आहेत. आजवर साकारलेल्या कॅरेक्टर्सपेक्षा हे खूप अवघड आहे.

  फिल्मीचा अनोखा फंडा
  आई मला म्हणाली होती की, आईचं दु:ख तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू आई होशील. माझ्याकडे एक डॅाग आहे. तिचं नाव फिल्मी आहे. ती दीड वर्षांची झालीय. ती माझा जीव आहे. आई मला म्हणते की, तू जेव्हा दिवसभर काम करून घरी येतेस तेव्हा ती तुझ्याकडे ज्या नजरेतून पहाते तेच मुलीचं प्रेम आहे. तेच आई म्हणून तुझं प्रेम असायला हवं. त्यामुळं मी कोणताही सीन करताना फिल्मीला डोळ्यांसमोर ठेवते आणि विचार करते की, ती समोर असती तर मी काय रिअॅक्ट केलं असतं.

  …तरीही तो सेटवरच थांबला
  श्रेयससोबत मी यापूर्वी कधी काम केलं नसल्यानं तो कसा असेल, माझ्याशी नीट बोलेल की नाही, कसा वागेल हे विचार मनात येत होते, पण फर्स्ट डेपासून तो ज्या पद्धतीनं मायरा आणि माझ्यासोबत बोलू लागला ते पाहून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्याची एनर्जी लेव्हल नेहमी खूप हाय असते. आमच्याशी गप्पा मारतो, एकत्र जेवतो, एकत्र चहा-कॅाफी पितो. मध्यंतरी त्याची तब्बेत ठीक नव्हती. त्याचे सीन्स करून त्याला लवकर घरी सोडण्यात येणार होतं. त्याचे क्लोज झाले होते. माझे सीन्स उरले होते. दिग्दर्शक त्याला म्हणाले की हिचे सीन्स आम्ही उद्या काढू. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही निघा. तो म्हणाला की, हिचा खूप छान सूर लागलाय. हाच सूर असला पाहिजे. त्यासाठी मी थांबतो. तुम्ही हिचेही क्लोज काढा. ते ऐकल्यावर त्याच्यातील खऱ्या माणसाचं दर्शन घडलं. मोठे अॅक्टर्स स्वत:चं झाल्यावर निघून जातात. कोणी थांबत नाही. तो थांबला आणि त्यानं मलाही चांगलं परफॅार्म करण्याची तेवढीच संधी दिली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

  त्या स्त्रिया नाहीत का?
  हि स्टोरी सर्व वयोगटातील रसिकांना भावणारी आहे. लहान मुलांना परीचं कॅरेक्टर आवडेल, यंग जनरेशनला यातील लव्ह स्टोरी आवडेल, यातील काही सीन्स भावूक करणारे आहेत. आजच्या पिढीत आपण खूप सिगल मदर्स पहातो. स्वतंत्र राहून आई मुलांना मोठं करत असल्याची बरीच उदाहरणं बघतो. समाजाचा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलणारी ही मालिका आहे. त्यांच्याकडेही आदरानं पाहिलं जाईल. ती सिंगल मदर असली म्हणून काय झालं? ती स्त्री नाही का? तिला जगण्याचा अधिकार नाही का? या सगळ्या गोष्टी इतक्या कनेक्ट होत आहेत की, मलाच माझ्या फ्रेंड्सचे, चाळीसीनंतरच्या स्त्रियांचे खूप मेसेजेस आले. यातील इमोशन्स खूप कनेक्ट होत असल्यानं मालिका पहायला मजा येतेय असं त्यांचं म्हणणं आहे.