‘रावण लीला’ मध्ये झळकणार प्रतिक गांधी!

प्रतिकची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ आॅक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.

    ‘स्कॅम १९९२’ या गाजलेल्या वेब सिरीजद्वारे वन नाईट स्टार बनलेला प्रतिक गांधी सध्या चांगलाच चर्चेत आहे. एका मोठ्या वेब शोमध्ये आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखवणाऱ्या प्रतिकची ‘रावण लीला’ आता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पेन स्टुडिओजनं नुकतीच आपल्या ‘रावण लीला’ या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे.

    डॅा. जयंतीलाल गडा यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा लेखनासोबतच दिग्दर्शनही हार्दिक गज्जर यांनी केलं आहे. प्रतिकची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ आॅक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच मेकर्सच्या वतीनं रिलीज करण्यात आलं आहे. या मोठ्या चित्रपटाद्वारे प्रतिकचं धडाकेबाज बॅालिवूड पदार्पण होणार आहे.

    या चित्रपटात प्रतिक पूर्णत: वेगळ्या रूपात दिसणार आहे. यात प्रेक्षकांना लव्ह स्टोरीसोबतच ड्रामाही पहायला मिळेल. यात प्रतिकच्या जोडीला एन्द्रीता राय, अंकुर भाटीया, कृष्णा सिंग बिष्ट, राजेंद्र गुप्ता, भाग्यश्री मोटे, श्रेयस लोवलेकर, अनिल रस्तोगी, फ्लोरा सैनी, गोविंद मिश्रा आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.