गणपती सजावटीतल्या ‘त्या’ चुकीनंतर प्रवीण तरडेंनी मागितली माफी

कोरोनाचे संकट असले तरी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.  सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकारणी आणि सेलिब्रिटींनीही आपापल्या घरी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुस्तक गणपती अशी थीम ठेऊन आपल्या घरी गणपतीची सजावट केली. मात्र या सजावटीमध्ये झालेल्या एका चुकीमुळे प्रवीण तरडेंवर टीका झाली आणि त्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण तरडे यांनी पुस्तक गणपती या संकल्पनेवर गणपतीची आरास केली होती. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला. पण तो पाहून अनेक जण त्यांच्यावर संतापले. कारण प्रवीण तरडे यांनी मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती. त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर प्रवीण तरडेंनी लगेच आपली पोस्ट डिलीट केली आणि माफी मागणारा एक व्हिडिओ पोस्ट केला.

मी खूप सामाजिक भावना जपणारा आहे. याआधी कधी चूक झालेली नाही आणि होणार नाही. जगभरातल्या दलित बांधवांची मी माफी मागतो, असे प्रवीण तरडे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.