अहिल्याबाईंची २९६वी जयंतीनिमित्ताने अदितीनं सांगितला भूमिकेचा खास अनुभव!

अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला होता. येत्या ३१ मे रोजी अहिल्याबाईंची २९६वी जयंती आहे. याचं औचित्य साधत बाल अहिल्याबाईंच्या रूपात त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अदितीनं 'नवराष्ट्र'शी एक्सक्लुझीव्ह बातचीत केली.

  सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर सुरू असलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही हिंदी मालिका आज सर्वार्थानं लक्षणीय ठरत असून, घराघरात पाहिली जात आहे. या हिंदी मालिकेतील मराठमोळे कलाकार रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यात टायटल रोल साकारणारी बालकलाकार अदिती जलतरे वन नाईट स्टार बनली असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अदिती साकारत असलेल्या अहिल्याबाईंचे आज घरोघरी गोडवे गायले जात आहेत. अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला होता. येत्या ३१ मे रोजी अहिल्याबाईंची २९६वी जयंती आहे. याचं औचित्य साधत बाल अहिल्याबाईंच्या रूपात त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अदितीनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत केली.

  पुण्यातील सी. एम. इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावी इयत्तेमध्ये शिकणारी अदिती ‘सबसे बडा कलाकार’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून सर्वप्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर ‘मेरे साईं’, ‘रूप – मर्द का नया स्वरूप’ या हिंदी मालिकांसोबतच अदितीनं ‘सिंधू’ या मराठी मालिकेत केलेल्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं. याच पुण्याईच्या बळावर अदिती साकारत असलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही सिरीयलही रसिकांना आवडत आहे. अदितीचे वडील सिव्हील इंजीनियर, तर आई गृहिणी आहे. बालवयातच अभिनयाकडे वळण्याबाबत अदिती म्हणाली की, सहा-सात वर्षांची असल्यापासून माझ्या मनात अभिनयाची ओढ निर्माण झाली. आई-बाबांनी मला एका रिअॅलीटी शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारलं. त्यासाठी मी होकार दिला. त्यानंतर आणखी एक रिअॅलिटी शो केल्यानंतर आॅडीशन्ससाठी विचारणा होऊ लागली. पुन्हा आई-बाबांनी आॅडीशन्स करशील का? असं विचारलं. त्यांनी कधीच फोर्स केला नाही. मी आॅडीशन्स पाठवल्या आणि मलाही अभिनयाची गोडी लागली. टीव्हीवर जेव्हा अॅड किंवा सिरीयल्स बघायचे तेव्हा मलाही यात काम करायचं असल्याचं वाटत होतं. यासाठी कायम आॅडीशन्स देऊ लागले आणि खूप मेहनत केली. त्यानंतर मला ‘मेरे साईं’ आणि ‘सिंधू’ या मालिका मिळाल्या. लॅाकडाऊनमध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्या’ ही मालिका मिळाली.

  अहिल्याबाईंची व्यक्तिरेखा साकारण्याबाबत अदिती म्हणाली की, मला अहिल्याबाईंबाबत जास्त डिटेलमध्ये माहित नव्हतं. थोडंफार वाचलं होतं, थोडं ऐकलं होतं की त्या एक महान राणी होत्या. त्यांनी खूप समाजसेवा केल्याचं थोडक्यात ठाऊक होतं. त्यांनी मंदिरं बांधली, समाजसेवा केली, घाट बांधले इतकं माहित होतं, पण जेव्हा मी वर्कशॅाप केलं तेव्हा त्यांच्याबद्दल प्रॅापर माहिती मिळाली. माझा वर्कशॅापचा पहिला दिवस होता, तेव्हा आमचे डायरेक्टरसर सर्वांना सांगत होते. मी त्यांना अहिल्याबाबत विचारलं. त्यांनी सांगितलं की ती एक इनोसन्ट मुलगी असल्यानं तितक्याच इनोसन्टली प्रश्न विचारत असे. त्या काळात बालविवाह व्हायचे, विधवांना मुंडण करावं लागायचं यांसारख्या जाचक रूढी परंपरांबाबत त्या प्रश्न विचारायच्या. त्याबाबत माहिती घ्यायच्या. प्रश्नांवर प्रश्न विचारण्याबाबत त्यांनी सांगितलं. आठ-नऊ वर्षांच्या मुलांच्या आवाजात एक वेगळा इनोसन्स असतो, तसाच बालपणातील अहिल्याबाईंच्या आवाजातही होता. त्यांचा आवाज, त्यांची बॅाडी लँग्वेज, त्या कशा रहायच्या, अगोदर त्या गावी रहायच्या, मग महालात आल्या, त्यानंतर त्यांना आपलं राहणीमान कसं बदलावं लागलं, गावी त्या एकदम मोकळेपणाने रहायच्या, महालात आल्यावर त्यांच्यावर बंधनं आली, धावायचं नाही, असं वागायचं, तसं वागायचं हे सगळं मला सादर करावं लागलं. दिग्दर्शक जॅक्सन सेठी यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. क्रिएटीव्ह प्रोड्युसर तुषार भारद्वाज यांनीही खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळं सिरीयल छान बनण्यासाठी मदत झाली.

  मल्हाररावरूपी राजेशची शिकवण
  राजेशसरांकडून मी खूप गोष्टी शिकतेय. त्यांच्या बऱ्याच गोष्टी मी नोटीस केल्या आहेत. मला स्क्रीप्ट घेतल्यावर एक-दोनदा वाचावी लागते. डायलॅाग्ज लर्न करावे लागतात. मी त्यांचं पाहिलं की, स्क्रीप्ट हातात आल्यावर एक-दोनदा वाचल्यावर त्यांचं लर्न होऊन जातं. मग त्यांना सेटवर कधीही स्क्रीप्टची गरज भासत नाही. त्यांच्या आवाजाचंही निरीक्षण केलं. नॅार्मली ते कसे बोलतात, स्क्रीनवर कसे बोलतात, आपल्या आवाजामध्ये केवढा वेगवेगळा बदल करतात या गोष्टीही नोटीस केल्या आणि खूप काही गोष्टी शिकल्या आहेत. अॅक्टर म्हणून मला ते खूप आवडतात. आमचे काही सीन्स करताना रिडींग झाल्यावर ते नेहमी सांगतात की हे अशा मूडमध्ये घे, हा डायलॅाग या मूडमध्ये घ्यायला हवा, या डायलॅागचा हा मूड असेल असं सांगतात. राजेशसरांप्रमाणे मला अक्षय कुमारसर, परेश रावलजी, अमिताभसर, काजोलजी, अजयसर खूप आवडतात.

  भारतीय इतिहासातील सुवर्णपान
  आपण हिस्ट्री वाचतो. आपल्या शाळेमध्ये बाहेरच्या देशांमधील हिस्ट्री शिवकतात, पण मुख्य म्हणजे आपला भारतीय इतिहास खूप छान आहे. तो जाणून घ्यायला हवा. आता मी अहि्ल्याबाईंचा रोल करत असल्यानं त्यांच्याबद्दल समजतंय. त्या काय होत्या याची जाणीव होतेय. त्यामुळं मी मुलांना सांगेन की प्लीज तुम्ही ही सिरीयल बघा. खूप प्रेरणादायी सिरीयल आहे. त्या काळात लोकं कशा प्रकारे स्ट्रगल करायचे. जाचक चालीरीतींचा किती मोठा पगडा आपल्या समाज व्यवस्थेवर होता. याची जाणीव होईल. सध्या मालिकेत अहिल्याबाईंच्या शिक्षणाचा ट्रॅक सुरू आहे. त्यांना शिकायचं आहे. त्या शिकण्याचा हट्ट करत आहेत. त्यांची शिकण्याची इच्छा पूर्ण होणार की नाही हे समजणार आहे. हे सर्व पाहण्याजोगं आहे.

  ‘अहिल्या’नंतर घेणार ब्रेक
  हि सिरीयल संपल्यानंतर मी स्टडी आणि स्पोर्टकडे लक्ष देईन. सध्या स्कूल अटेंड करू शकत नसल्यानं नंतर त्यावर फोकस करेन. मला क्रिकेट खेळायला आवडतं. फुटबॅाल आणि बॅडमिंटन खेळण्याचीही आवड आहे. मला जिम्नॅशियम जॅाईन करायचं आहे. अगोदर जिम्नॅशियमचे क्लासेस करायचे, पण सिरीयल सुरू झाल्यापासून सर्व अॅक्टिव्हीटीज बंद झाल्या. मार्शल आर्ट आणि कराटे शिकायचं आहे. त्यामुळं सिरीयल झाल्यावर ब्रेक घेऊन याकडे जास्त लक्ष देईन. शिक्षणामध्ये मला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे. स्पेशली बायोमध्ये रुची आहे. अद्याप नीटसं काही ठरवलेलं नाही, पण मला सायन्सबाबत वाचायला आवडतं.

  मी मुलांना सांगेन की…
  नॅार्मली आपण जेव्हा शाळेत जातो किंवा आपल्या ट्युशन्स असतात तेव्हा आपण खूप बिझी असतो. त्यावेळी आपण आपल्या आई-बाबांना वेळ देऊ शकत नाही. ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही. तर मी त्यांना असं सांगेन की, आज आपण सर्वजण लॅाकडाऊनमुळे घरी आहोत. आपलं शिक्षणही सुरूच आहे. आता तुम्ही तुमच्या आई-बाबांना वेळ द्या. आईची हेल्प करा. तिची हेल्प केली तर आईलाही खूप बरं वाटेल. मालिकेत आता पुढे खूप काही छान पहायला मिळणार आहे. सध्या आम्ही खूप चांगले ट्रॅक्स शूट करतोय. त्यामुळं ‘पुण्यश्लोक अहिल्या’ बघत रहा आणि असाच सपोर्ट करत रहा.