‘जॅाबलेस’मध्ये पुष्करचा इन्व्हेस्टिगेशनचा खेळ

'जॅाबलेस' या आगामी मराठी वेब सिरीजमध्ये पुष्कर एका इन्व्हस्टिगेटींग आॅफिसरच्या भूमिकेत आहेत. या वेब सिरीजचं औचित्य साधत पुष्करनं 'नवराष्ट्र'सोबत गप्पा मारल्या.

  एखाद्या छोट्याशा भूमिकेतही आपल्या शैलीत रंग भरण्यात पटाईत असलेला पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात समोर येणार आहे. ‘जॅाबलेस’ या आगामी मराठी वेब सिरीजमध्ये पुष्कर एका इन्व्हस्टिगेटींग आॅफिसरच्या भूमिकेत आहेत. या वेब सिरीजचं औचित्य साधत पुष्करनं ‘नवराष्ट्र’सोबत गप्पा मारल्या.

  लवकरच प्लॅनेट मराठीवर प्रसारीत होणाऱ्या ‘जॅाबलेस’ या वेब सिरीजबाबत पुष्कर म्हणाला की, या वेब सिरीजला जरी कोव्हिड सिच्युएशनची पार्श्वभूमी असली तरी हा विषय तसा नाही. एखादी व्यक्तीवर जर नजरचुकीमुळं किंवा घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळं त्यांच्यावर काही बालंट येत असेल आणि तो जॅाबलेस होत असेल तर परिस्थितीनं आणलेल्या त्या वेळेचा सामना करताना योग्य निर्णय घेण्याची खूप गरज असते. ते योग्य निर्णय त्याच्याकडून घेतले जातात की नाही. त्या निर्णयाला तो स्वत: कसा सामोरा  जातो. ते यात पहायला मिळेल. अनेकांवर जॅाबलेस होण्याची वेळ येते, पण त्या परिस्थितीमध्ये लोकं वेगवेगळ्या प्रकारे उभं राहण्याचा प्रयत्न करतात. या वेब सिरीजचं मुख्य कॅरेक्टर असलेला विराज पाठक जॅाबलेस झाल्यावर काय करतो? उद्भवलेल्या परिस्थितीला तो कसा सामोरा जातो? त्यातून काही गुन्हे घडत जातात. त्यात तो किती सामील असतो. या सर्वांमध्ये त्यालाही प्रश्न पडतात की जॅाबलेस होण्याची परिस्थितीही हा देखील माझ्यासोबत सुरू असलेल्या खेळाचाच भाग आहे का? हा खेळ आपल्यासोबत कोण खेळतंय? त्यानंतर समजतं की विराज पाठक हे केवळ प्यादं आहे. त्यामागं कोणा भलत्याच व्यक्तीचा हात आहे. अखेरीस हा हातही खरा नाही. त्या हाताला धरून प्यादं हलवलं जातंय. याचा अर्थ मूळ हात आणखी कोणाचा तरी आहे. जे पुढच्या सीझनमध्ये कदाचित प्रेक्षकांच्या लक्षात येईल.

  ‘जॅाबलेस’मध्ये अभिनय करण्याबाबत पुष्कर म्हणाला की, खरं तर माझ्याकडे ही गोष्ट प्लॅनेट मराठीचं काँटेंट बघणारा म्हणून आली होती. मला ती आवडली. अमित बैचे, हरीश दुधाडे आणि निरंजन पत्की आपल्या टीमसोबत भेटायला आला होता. निरंजनला मी खूप अगोदरपासून ओळखतो. निरंजनची दिग्दर्शनशैली ठाऊक असल्यानं तो या गोष्टीला योग्य न्याय देऊ शकेल याची खात्री होती. यात मी कामही करणार नव्हतो. मी जो रोल साकारलाय तो हरिश करणार होता, पण त्याच्याकडं दुसरं काम आल्यानं त्यानं मला गळ घातली. माझ्याकडे प्लॅनेट मराठीची खूप मोठी जबाबदारी असल्यानं मी अगोदर नकार दिला होता. माझ्या काँटेंट टीमनं खूप साथ दिली. अमित भंडारी, राजेश पाठक, सुमित बोधनकर यांनी पाठींबा दिल्यानं अखेर मी हा रोल करण्याचा निर्णय घेतला. निरंजन आपल्या विचारांच्या बाबतीत ठाम असल्याचं या वेब सिरीजमध्ये काम करताना जाणवलं. यातलं रहस्य किती गडद करायचं, फ्लॅशबॅक कसा दाखवायचा, पुढच्या गोष्टी किती उलगडायच्या, पुढल्या एपिसोडमध्ये काय घडणार हे बघण्याची उत्कंठा कशी राखायची, त्यासाठी काय करायचं हे त्यानं शूटिंग सुरू करण्यापूर्वीच लक्षात घेतलं होतं.

  इन्व्हेस्टिगेटींग आॅफीसर
  यात मी वाय झेड पगारे नावाच्या इन्व्हेस्टीगेटींग आॅफिसरची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा अत्यंत प्रामाणिक, पैसे न खाणारा आणि कठोर निर्णय घेणारा आहे. याबाबतीत तो कोणाचीही हयगय करत नाही. त्याला जी माहिती मिळते किंवा सुगावा लागतो, त्याचा अनुभव आणि त्याचं इन्स्टिंक्ट त्याला सांगतं त्यानुसार गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हा या कॅरेक्टरचा स्वभाव आहे. हा एका विशिष्ट शैलीत बोलतो. बोलण्याच्या पद्धतीप्रमाणे त्याची विचार करण्याची शैलीही विशिष्ट आहे. हे ट्रेलरमध्ये लक्षात आलं असेल. हा नगरमधील असल्यानं तिथली भाषा बोलतो. थोडा विचित्र विचार करणारा हा इन्व्हेस्टिगेटींग आॅफिसर आहे.

  ओटीटी ही काळाची गरज
  ‘जॅाबलेस’ ही माझी पहिली वेब सिरीज आहे. ओटीटी ही काळाची गरज आहे. कारण आता थिएटरचं भवितव्य काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. नाटक कधी सुरू होणार हे सांगता येत नाही. अर्थात नाटक, सिनेमा आणि ओटीटी ही तिनही भिन्न माध्यमं आहेत. आजवर मराठी सिनेसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांकडं नाटक, सिनेमा आणि मालिका ही तीनच माध्यमं होती. ओटीटीच्या रूपात चौथं माध्यम खुलं झालं आहे. त्यामुळं कामाची संधी निर्माण झाली आहे. लेखक-दिग्दर्शकांना आपलं क्रिएटीव्ह सादर करण्यासाठी आणखी एक व्हर्टिकल मिळालं आहे. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे. कारण आज सर्वांकडे स्मार्टफोन आणि दिवसाला दोन जीबी डेटा आहे. या माध्यमातून ते जसं जगात काय चाललंय हे पाहू शकतात तसं आपल्या आवडत्या कलाकारांच्या सिरीजही पाहू शकतात. त्यामुळं प्रेक्षकांसाठीही ओटीटी स्वागतार्ह आहे. इंडस्ट्रीसाठीसुद्धा ही एक आश्वासक गोष्ट आहे.

  भाषा मराठी, विषय जागतिक
  प्लॅनेट मराठीचा प्रयत्न हाच असेल की, जरी भाषा मराठी बोलली जात असली तरी विषय मात्र जागतिक विषय असावेत. वेगवेगळ्या विषयांवर आधारीत वेब सिरीज आम्ही करत आहोत. ‘जॅाबलेस’, ‘सोपं नसतं काही’, ‘बाप बिप बाप’, ‘परीस’, ‘हिंग पुस्तक तलवार’ या सर्व वेब सिरीज भिन्न विषयांवर आधारीत आहेत. ‘जॅाबलेस’मध्ये मी जरी काम केलं असलं तरी या सर्व वेब सिरीज माझ्यासाठी समान आहेत. प्लॅनेट मराठीचं काँटेंट बघत असल्यानं मला या सर्व दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. वेगवेगळे विषय घेऊन येत असल्यानं त्याची उत्सुकता खूप आहे.

  संकल्पना लगेच उचलून धरली
  आजवर आपल्याकडं एकही मराठी ओटीटी प्लॅटफॅार्म नसल्यानं काहीतरी सुरू करण्याची कल्पना पहिल्या लॅाकडाऊनमध्ये माझ्या डोक्यात आली. त्यानंतर आदित्य ओक आणि काही मित्र मंडळींच्या सहाय्यानं एक प्रपोजल तयार करून ते माझा खूप जुना मित्र असलेल्या अक्षय बर्दापूरकरकडे मांडलं. हि संकल्पना मांडण्यासाठी एक व्हिजनरी माणूस हवा होता तो अक्षयच्या रूपात माझ्यासमोर होता. मला काय म्हणायचं हे त्याला नेमकं समजलं आणि अक्षय व सौम्या वेळेकर यांनी ही संकल्पना लगेच उचलून धरली. मग आम्ही अमोद ओक, अमित भंडारी, जयंती वाघधरे यांना घेऊन टीम तयार केली. प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या सोपवल्या. लॅाकडाऊनच्या काळात दिवस-रात्र एक करत काम केलं. काँटेंट टीमपासून टेक्निकल टीमपर्यंत सर्वांनीच खूप काम केलं. आमची स्वत:ची टेक्नॅालॅाजी तयार केली. ३१ आॅगस्टपासून प्लॅनेट मराठीवर वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत.

  सुव्रतसोबत पहिला अनुभव
  सुव्रत हा एनएसडीतून पासआऊट झालेला अभिनेता आहे. त्याच्या नाटकातील, सिनेमांमधील आणि टेलिव्हीजनवरील कामाबद्दल मला त्याचं नेहमीच कौतुक वाटत होतं. ‘जॅाबलेस’मध्ये आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. त्याच्यासोबत काम करताना जाणवलं की हासुद्धा एक इन्टेन्स अॅक्टर आहे. सुव्रत रिहर्सल्स करण्यावर भर देणारा आहे. यात आम्हा दोघांवर शूट केलेले सीन्स अॅक्शन-रिअॅक्शन्सचे आहेत. अशावेळी सुव्रतसारखा अॅक्टर समोर असला की काम करायला मजा येते. आम्ही रिहर्सल करत असताना आम्ही एकमेकांकडे बघायचो. डायलॅाग्ज बोलताना आपण काय करणार आहोत. चेहऱ्यावरील हावभाव काय असणार आहेत, डोळ्यांद्वारे काय बोलणार आहोत याची आम्ही रिहर्सल करायचो. त्याप्रमाणं आमच्या अॅक्शन-रिअॅक्शन्स खुलत गेल्या आणि आमचे सीन्स रंगले असं सर्वांचं म्हणणं आहे.