‘राधाकृष्ण’ मालिकेचा ७०० भागांचा टप्पा, कृष्णाने व्यक्त केल्या भावना!

या आश्चर्यकारक यशासह, निर्मात्यांनी या कठीण काळात प्रेक्षकांचं मनोरंजन आणि त्यांचं ज्ञान समृद्ध करण्यासाठी 'राधाकृष्ण'मध्ये पौराणिक ट्रॅक आणला आहे

    २०१८ मध्ये स्टार भारत वाहिनीवर सुरू झालेल्या ‘राधाकृष्ण’ या पौराणिक मालिकेनं रसिकांची मनं जिंकली आहेत. कथानकाला सादरीकरणाला सुमधूर संगीताची किनार जोडल्यानं यातील राधा आणि कृष्णाची लीला रसिकांना भावल्या आहेत. सिद्धार्थ कुमार तिवारी यांची निर्मिती असलेल्या या मालिकेत सुमेध मुद्गलकर आणि मल्लिका सिंग मुख्य भूमिकेत रसिकांना मोहीत करीत आहेत. या शोमध्ये राधा आणि भगवान कृष्ण यांच्याबद्दल विविध अज्ञात पैलू समोर आले आहेत. ‘राधाकृष्ण’ ही मालिका या महिन्यात ७०० भागांचा टप्पा गाठणार आहे.

    या आश्चर्यकारक यशासह, निर्मात्यांनी या कठीण काळात प्रेक्षकांचं मनोरंजन आणि त्यांचं ज्ञान समृद्ध करण्यासाठी ‘राधाकृष्ण’मध्ये पौराणिक ट्रॅक आणला आहे. या ट्रॅकमध्ये देवी अलक्ष्मी जी ऐश्वर्य आणि धनाची देवी लक्ष्मी हिची लहान बहीण असून, गरिबी आणि दारिद्र्य यांचं प्रतीक आहे. त्या अलक्ष्मीची कहाणी शोमध्ये पाहायला मिळेल. लवकरच या नवीन पेचकारक ट्रॅकसह ‘राधाकृष्ण’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

    ७०० भागांच्या यशाबद्दल सुमेध म्हणाला की, ‘राधाकृष्ण’मध्ये कृष्णाची भूमिका वठवण्याची संधी मिळणं, हे मी माझं भाग्य समजतो. मालिकेचे  चाहते, माझं कुटुंब, मित्र आणि उद्योगातील सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळं आणि आशीर्वादामुळं हे शिवधनुष्य पेलणं शक्य झालं आहे. राधेच्या भूमिकेतील मल्लिका म्हणाली की, या कलियुगात राधाकृष्णाच्या चरित्राचा भाग बनण्याची संधी मिळाल्याचं समाधान आहे. शोच्या विस्तृत स्टारकास्ट आणि निर्मात्यांसोबत काम करणं खरोखर एक आशीर्वाद आहे.