‘सबका साई’ वेबसिरीजमध्ये राज अर्जुन साईरूपात प्रेक्षकांच्या भेटीला!

'सबका साई' या एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये राज यांनी साईबाबा साकारले आहेत. साईरूपात प्रगटण्याचा अनुभव राज यांनी 'नवराष्ट्र'सोबत शेअर केला.

  ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘रावडी राठोड’, ‘सत्याग्रह’, ‘रईस’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ अश एका पेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांमध्येही अभिनय करणारे राज अर्जुन आता साईरूपात प्रगटले आहेत. बॅाबी बेदींची निर्मिती आणि अजित भैरवकरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘सबका साई’ या एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये राज यांनी साईबाबा साकारले आहेत. साईरूपात प्रगटण्याचा अनुभव राज यांनी ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला.

  राज यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये निगेटीव्ह तसंच चरित्र व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याच्या अगदी उलट असलेली साईबाबांची भूमिका साकारण्याबाबत राज म्हणाले की, आपण साईबाबांची भूमिका साकारू असं मी स्वप्नातही कधी पाहिलं नव्हतं. मी रिअॅलिस्टीक काम करत होतो. अभिनयापेक्षा काहीतरी नॅचरल करण्यासाठी धडपडत होतो. ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटामध्ये फारूख साकारताना त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केला. त्याच झोनमधील व्यक्तिरेखा करण्यात बिझी होतो. हाच झोन मी एन्जॅाय आणि एक्सप्लोरही करत होतो. ‘सिक्रेट सुपरस्टार’नंतर तमिळ आणि तेलुगूमध्ये त्याच पठडीतील रोल मिळाले. तीन-चार चित्रपटांमध्ये निगेटीव्ह कॅरेक्टर्स केल्यानं खलनायकी भूमिकांच्याच आॅफर्स येत असल्यानं काहीतरी युनिक करायला मिळावं असं वाटत होतं. माझ्या आत असलेले इतरही भाव प्रेक्षकांसमोर सादर करता येण्याजोगं काहीतरी मिळावं अशी इच्छा होती, पण स्पिरीच्युअल किंवा महापुरुषांचा रोल आॅफर होईल असं कधी वाटलं नव्हतं. खरं तर ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये माझं काम नोटीस केल्यानंतर माझ्याशी डाकूची भूमिका करण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. डाकूची भूमिका साकारणं इझी असल्यानं खुश झालो आणि लगेच होकार दिला. सहा महिन्यांनी पुन्हा भेट झाली, तेव्हा वाटलं की डाकूच्या भूमिकेविषयी बोलणं होईल, पण साईबाबांची भूमिका साकारण्याची आॅफर दिल्यानं नि:शब्द झालो. डाकूसाठी बोलणं झालं होतं आणि आता साईबाबांच्या भूमिकेबाबत बोलत असल्यानं मी स्तब्ध झालो होतो. मागील दोन महिन्यांमध्ये मला वेगवेगळ्या प्लॅटफॅार्मवर साईंच्या भूमिकेची आॅफर आली होती, पण मी नकार दिला होता. कारण साईबाबा साकारणं थट्टा नाही. माझ्या अभिनयाचा स्केल खूप वेगळा आहे. कमी सांगायचं, पण त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला पाहिजे. मायथो शोमध्ये आपल्याकडून काहीही करवून घेतील अशी भीती होती. साईंना आॅब्जर्व्ह करून ते साकारण्याइतकी माझी समज आणि तेवढं ज्ञानही नसल्यानं नकार दिला होता.

  साईंच्या फकीरी जीवनावर फोकस
  साईबाबांबाबत मला खूप कमी माहिती होती. ‘सबका साई’ची मला स्क्रीप्ट दिली. ती वाचताना मी आश्चर्यचकीत झालो. त्यांनी एका फकीराबाबत लिहीलं होतं. साईबाबांना चमत्कारी पुरुष म्हणून सादर केलेलं नव्हतं. एक फकीर कसा शिर्डीत आला, आपलं जीवन कसे जगले, कसे साधेपणाने रहायचे, त्यांची काय फिलॅासॅाफी होती या सर्व स्क्रीप्टमध्ये सांगितलेल्या गोष्टी मला भावल्या. हे वाचल्यावर अॅक्टर म्हणून मला जाणवलं की हे खूप चॅलेंजिंग आहे. कारण आजवर मी याच्या अगदी विरुद्ध रोल केले आहेत. स्पिरीच्युअल काय कधी पॅाझिटीव्ह रोलही केलेले नाहीत. तीन वेळा नाकारल्यानंतर जेव्हा चौथ्यांदा पुन्हा साईंचा रोल आॅफर झाल्यावर हा युनिव्हर्समध्ये खेळ सुरू असल्याचं जाणवलं आणि साईंचा प्रसाद मानून त्याचा स्वीकार केला. या रोलसाठी मी साईंना निवडलं नाही, साईंनी माझी निवड केली आहे.

  कॅरेक्टरचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न
  भोपाळमध्ये थिएटरमध्ये काम करायचो तेव्हापासून व्यक्तिरेखेशी एकरूप व्हायला शिकलो. स्वत:ची एक प्रोसेस बनवून कॅरेक्टरशी एकरूप होऊ लागलो. कॅरेक्टरनुसार माझा अॅप्रोच बदलतो. कॅरेक्टरचा सोल, सायकोलॅाजी, थॅाट प्रोसेस आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. कॅरेक्टरचा आत्मा गवसल्यानंतर हावभाव, बॅाडीलँग्वेज, कॅास्च्युम, उठणं-बसणं आपोआप बदलतं. साईबाबांचा रोल साकारतानाही मी याच प्रोसेसचा वापर केला. साईंचे कपडे घालून वावरणं, त्यांचे फोटो घरभर लावणं, त्यांच्याबाबत वाचन करणं ही माझी बेसिक एक्सरसाईज केली. याचा ती व्यक्तिरेखा साकारण्यासाठी थेट फायदा होईल याची खात्री नसते, पण मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या व्यक्तिरेखेत शिरण्याचा प्रयत्न करत असतो. तेच साईबाबा साकारताना केलं आहे. मेडिटेशन नेहमीच करतो. त्यामुळं विचारांमध्ये ठेहराव येतो. साईंचं व्यक्तिमत्त्व हे लोकसेवा करणारं होतं. त्यांच्या मनात स्वत:बद्दल काही प्रश्नच नव्हते. साई करण्यासाठी मी मेडिटेशनसाठी जास्त वेळ देऊ लागलो.


  अवघं जीवन प्रभावित झालं
  ‘सबका साई’ या वेब सिरीजची आॅफर येण्यापूर्वी मला साईबाबांबाबत बेसिक माहिती होती. माझ्या पत्नीची बाबांवर खूप श्रद्धा आहे. माझं काम चांगलं चाललं की शिर्डीला येईन असा नवस तिनं केला होता. नवस फेडण्याकरता पहिल्यांदा शिर्डीत जाणं झालं होतं. माझ्यासाठी भगवान एकच आहे. दुसरं म्हणजे शिर्डी एक पवित्र तीर्थस्थान असल्यानं मित्रांसोबत कधीतरी दर्शनाला जाणं व्हायचं. सबका मालिक एक व श्रद्धा आणि सबूरी हे त्यांचे मूळ मंत्र माहित होते, पण ते जीवनावर इतका प्रभाव टाकतील, इतकी मोठी जबाबदारी सोपवतील, साईचरित्राचं वाचन करावं लागेल, स्क्रीप्ट वारंवार वाचावी लागेल किंवा ते ज्या फिलॅासॅाफीला फॅालो करतात ती जाणते-अजाणतेपणी हळूहळू समजत जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. धर्म, भगवान, अल्लाबाबत बाबा काय विचार करायचे हे वाचणं माझ्या ज्ञानात भर टाकणारं ठरेल असंही कधी वाटलं नव्हतं.

  फकीरबाबांचे वारसदार
  साईंनी मानवाप्रमाणेच पशू आणि जनावरांवरही प्रेम केलं आहे. ते सर्वांनाच एक मानायचे. त्यांच्यासोबतही बोलायचे. आठ वर्षे साईंचं पालणपोषण फकीरबाबांनी केल्यानं त्यांनी आपल्या फकीरीचा वारसा साईंकडे सोपवला असं मला वाटतं. त्यांना मोह नव्हता. फकीरासाठी दाग-दागिने काय उपयोगाचे असं साई म्हणायचे. प्रेम ही खरी संपत्ती ही त्यांची शिकवण. सर्वांवर प्रेम करा, सर्वांमध्ये ईश्वराला पहा असं ते सांगायचे. कारण त्यांनी आत्म्याचं सौंदर्य पाहिलं होतं. जात-पात, उंच-नीच, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा हा भेद त्यांच्या ठायी नव्हता. शत्रूंकडेही ते दयाभावनेनं पहायचे. कायम परोपकार करायचे.

  ओटीटीची इमेजब्रेक
  ‘सबका साई’सारखी वेब सिरीज ओटीटीवरील बदलांचे संकेत देणारी आहे. ओटीटी हे बोल्ड दृश्यांचं भंडार असलं तरी अशा प्रकारची नैतिकतेची शिकवण देणाऱ्या वेब सिरीज येत असल्यानं ओटीटीकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. वाईट काँटेंट आल्यावर जशी नाकं मुरडली जातात, तसं चांगल्या विषयाचं कौतुक होईल. साईबाबांवर वेब सिरीज तयार करणं हे धाडसी काम आहे. कारण साईंना जे सांगायचं होतं ते त्यांनी आपल्या अवतारात सांगितलं आहे. ही मालिका अतिशय प्रामाणिकपणे आणि साधेपणानं बनवली आहे. कुठेही दिखावेपणा नाही. आजचा युथ साईबाबांवर पुस्तक वाचणार नाही, पण त्यांचं चरीत्र वेब सिरीजच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकेल.

  प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी अजित
  अजितसोबत पहिल्यांदा काम करत असल्यानं त्याला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. अजित आपलं अॅप्रुव्हल आणि डिसअॅप्रुव्हल ताबडतोब देतो. स्पष्ट बोलतो. मनात काहीही ठेवत नाही. तो प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी असल्यानं त्याचा राग, दु:ख, वेदना, आनंद त्याचवेळी समोर येतो. मनाप्रमाणे काम झालं नाही तर मनातील अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. कारण त्यानं त्या प्रोजेक्टमध्ये तन-मनानं स्वत:ला झोकून दिलेलं असतं. ड्राफ्ट पक्का असल्यानं त्याला त्याप्रमाणंच काम करायचं असतं. मनात रेखाटलेलं चित्र त्याला जसंच्या तसं सादर करण्याचा त्याचा ध्यास असतो. साईंच्या कृपेनं आमची छान केमिस्ट्री जमली.