गुन्ह्यांची चाहूल ओळखायला शिकवणार ‘क्रिमिनल्स’ : राकेश सारंग

राकेश सारंग यांची निर्मिती असल्यानं 'क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची'कडून अपेक्षा वाढल्या आहेत. मराठीमध्ये सध्या अशा प्रकारचा शो नसल्यानं 'क्रिमिनल्स'ची निर्मिती केल्याचं राकेश यांनी 'नवराष्ट्र'शी बोलताना सांगितलं.

  गुन्हेकथा हा नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीचा विषय राहिला आहे. त्यामुळंच गुन्हेकथांवर आधारीत असणाऱ्या शोचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. प्रेक्षकांची हीच आवड ओळखून सोनी मराठी वाहिनीवर ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ हा नवीन शो सुरू करण्यात आला आहे. अभिजीत खांडकेकरचं सूत्रसंचालन आणि ‘क्राइम पट्रोल’सारखा हिंदीत गाजलेला शो बनवणाऱ्या राकेश सारंग यांची निर्मिती असल्यानं ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’कडून अपेक्षा वाढल्या आहेत. मराठीमध्ये सध्या अशा प्रकारचा शो नसल्यानं ‘क्रिमिनल्स’ची निर्मिती केल्याचं राकेश यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.

  ‘वारस’, ‘रणांगण’ या मराठी चित्रपटांसोबतच ‘हॅार्न ओके प्लीज’ हा हिंदी चित्रपट आणि ‘जावई विकत घेणे आहे’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या मराठी मालिका, तसंच ‘सात फेरे…’, ‘सीआयडी’, ‘आंधी’, ‘सरहदें’, ‘क्राइम पट्रोल’ या हिंदी मालिका बनवणारे लेखक-दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर-निर्माते-क्रिएटीव्ह दिग्दर्शक अशी चतुरस्र कामगिरी करणाऱ्या राकेश सारंग यांनी ‘क्रिमिनल्स’ या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा लक्ष वेधून घेतलं आहे. मराठीसोबतच हिंदीतही निर्मिती करण्याचा ताळमेळ साधणारे राकेश ‘क्रिमिनल्स’बाबत म्हणाले की, ‘क्रिमिनल्स’च्या माध्यामतून मराठी प्रेक्षकांसमोर गुन्हेकथांवर आधारीत असलेला नवीन शो आला आहे. आजवर मराठी प्रेक्षक अशा प्रकारच्या शोपासून काहीसे दूरच होते. मराठी प्रेक्षकांना अशा प्रकारचा शो फक्त हिंदीतच पहायला मिळत होता. मराठीत नेहमीच काहीतरी वेगवेगळं करत रहाण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यामागं मराठी प्रेक्षकांचंही वेगळ्या प्रकारे मनोरंजन व्हावं हा हेतू असतो. जेव्हा आम्ही हिंदीमध्ये एखादा क्राइम शो करतो, तेव्हा तो देशभरातील गुन्ह्यांवर आधारीत असतो. त्यातील काही गोष्टी मराठी प्रेक्षकांपासून थोड्या लांब जातात. काही क्राइम युपू, दिल्ली किंवा नॅार्थन भारातील असतात. ते पाहताना मराठी आॅडीयन्सला थोडा वेगळेपणा जाणवतो. याच्याशी आपलं काही देणंघेणं नाही असं त्यांना वाटतं, पण या शोमध्ये तसं घडणार नाही. ‘क्रिमिनल्स’द्वारे महाराष्ट्रात घडलेले गुन्हे त्यांच्यासमोर आणायचे आहेत. ते आणण्यामागे लोकांना सावध करणं हाच आमचा हेतू आहे. एखादा क्राइम दाखवताना तो कसा घडला नसता, काय केलं असतं तर ते थांबवता आलं असतं हे त्यात दाखवण्यात येणार आहे. एखाद्या गुन्हेगाराला पोलिसांनी कसं पकडलं हा या शोमधील मुख्य घटक असला तरी काय केलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं हे दाखवण्याचा प्रयत्न ‘क्रिमिनल्स’मध्ये करण्यात येणार आहे. हा शो अलर्ट रहायला शिकवणार आहे. असे गुन्हे का घडतात, त्यामागची सायकॅालॅाजी काय असते, क्राइम करणारा असं का करतो, गुन्हेगार हे करायला का धजावला त्या मागची कारणं काय आहेत या गोष्टींचा अंदाज प्रेक्षकांना यावा हा यामागील बेसिक उद्देश आहे. हा शो सावधानतेचा इशारा देईल. आपल्या आयुष्यात असं घडलं तर काय करायला हवं ते सांगेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  सूत्रसंचालक शैलीदार नसेल
  या शोमध्ये अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालकाची भूमिका बजवत आहे, पण यात तो कोणत्याही प्रकारची शैली किंवा आविर्भाव आणणार नाही. एखादा रिअॅलिटी शो, पुरस्कार सोहळा किंवा एखादी व्यक्तिरेखा साकारताना वेगळी शैली आवश्यक असते. इथं मात्र तो सामान्य माणसाला सामान्य माणसाप्रमाणेच समजावून सांगणार आहे. माझ्या घरातील, माझा मित्र किंवा माझा जवळचा कोणीतरी मला गुन्ह्यांपासून साधव रहायला समजावून सांगतोय हा फिल येणं आवश्यक आहे. तो जर त्रयस्थ, प्रेक्षकांपासून लांब जाणारा, खोटा किंवा शैलीदार वाटला तर शोचा उद्देश साध्य होणार नाही. लोकं त्याचं ऐकणार नाहीत. तो उपदेश देणारा नव्हे, तर सल्ला देणारा असेल तरच लोकं त्याचं ऐकतील. हे माझ्याही बाबतीत घडू शकतं आणि तुमच्याही बाबतीत घडू शकतं हे सांगणारा अभिषेक प्रेक्षकांपैकीच एक असेल. या शोची योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनच अभिजीत डोळ्यांसमोर होता. त्यामुळं दुसऱ्या कोणत्या कलाकाराचा विचार करण्याची गरज पडली नाहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  क्रिएटीव्ह दिग्दर्शकाच्या भूमिकेत…
  मागील सहा वर्षे ‘क्राइम पट्रोल’ करतो आहे. यात आजवर ज्या केसेस आल्या त्यातील जवळपास २५ टक्के केसेस महाराष्ट्रातील आहेत. त्या खूप भयानक आणि हृदयद्रावक आहेत. सध्या मी कॅम्पस क्लब स्टुडिओ प्रा. लि.खाली बनणाऱ्या प्रोजेक्टसवर लक्ष केंद्रित केलं आहे. यात ‘क्राइम पट्रोल’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकांसोबत आता ‘क्रिमिनल्स’ ही मालिकाही सुरू झाली आहे. त्यामुळं सध्या केवळ क्रिएटीव्ह दिग्दर्शकाच्याच भूमिकेत वावरतोय. या सर्व प्रोजेक्ट्सवर क्रएटिव्हली नजर ठेवण्याचं काम करतोय. या प्रोजेक्टसवर कोणाचा तरी एकाचा अंकुष असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जातीनं लक्ष घालणारी व्यक्ती तिथे लागते. एखादी गोष्ट सुरू कशी झाली आणि नेमकी पडद्यावर कशी दिसणार याचा चौकसकडे पाहणाऱ्या माणसाची भूमिका घेतली आहे. मी जर आता फिल्डवर करू लागलो, तर एका सिरीयलच्या उपयोगी पडू शकतो. अशावेळी इतर मालिकांचं काय? हा प्रश्न पडू शकतो. त्यामुळं सर्वच मालिकांवर लक्ष ठेवावं लागत आहे.

  प्रामाणिकणे पैसे दिल्यानं टिकून आहोत
  मध्यंतरी पैसे न देण्याबद्दल जे आरोप केले गेले त्याबद्दल काही माहीत नाही. जवळजवळ २० वर्षांपासून आमची कंपनी सुरू आहे. नेहमी प्रामाणिकपणे काम केलं आहे. तितक्याच प्रामाणिकणे लोकांचे पैसेही दिले आहेत, म्हणूनच इतकी वर्ष आम्ही तग धरून आहोत. आमचा एक व्यावसायिक दृष्टिकोन आहे. काही वेळेला उश्रृंखलपणा होतो आणि त्याचे परिणामही भोगावे लागतात. ती प्रत्येकाची फितरत असते. आमच्या प्रोडक्शनमध्ये कधीच पैसे थकणार नाहीत याची खात्री काही दिग्गज कलाकारांना आहे. त्यामुळं आमच्याकडे काम करणं म्हणजे जणू फिक्स डिपॅाझीट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही प्रतिमा जपणं आम्हाला गरजेचं आहे. काही लोकांना ती जपावीशी वाटत नाही. काही लोकांचा चुकीच्या ठिकाणी हात ढीला होता. शेवटी हा व्यवसाय आहे. प्रत्येकजण तो आपल्या पद्धतीनं करतो.

  गुन्ह्याची चाहूल ओळखा
  राकेश यांनी ‘क्राइम पट्रोल’मध्ये चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, सोनाली कुलकर्णी यांसारख्या बऱ्याच हरहुन्नरी कलाकारांना ब्रेक दिला आहे. ‘क्रिमिनल्स’बाबत थोडक्यात ते म्हणाले की, गुन्हा बघता बघता गुन्हा घडणं कसा टाळता आलं असतं हे ही ‘क्रिमिनल्स’ पाहिल्यावर समजेल. त्यामुळं मनोरंजनासोबतच समाजात घडणाऱ्या इतर चार गोष्टीही लोकांना समजायला हव्यात हे आम्हाला वाटतं. हा शो संपूर्ण फॅमिली पहाणार असल्यानं कुटुंबानं कसं सावध रहायला पाहिजे हेदेखील सांगेल. यासाठीच ‘चाहूल गुन्हेगाराची’ अशी टॅगलाईन दिली आहे. प्रत्येक गुन्हा होण्यापूर्वी चाहूल देतो. तुम्ही ती चाहूल ऐकली की नाही हे महत्त्वाचं आहे. गुन्हा घडण्यापूर्वी त्याची चाहूल कशी ऐकायला हवी होती हे प्रेक्षकांना सांगणार आहोत. या शोशिवाय एक मराठी आणि दोन हिंदी वेब सिरीजचं प्लॅनिंग आहे