वेड्या बहिणीला भाऊ मिळाला…

या रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ-बहिणीच्या आॅनस्क्रीन नात्यावर टाकलेली एक नजर...

    भारतीय चित्रपटांचं सणांशी नातं अतूट आहे. मराठी चित्रपटांमध्येही भारतीय सणांचं प्रतिबिंब उमटल्याचं आपण पाहिलं आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन हा सण बऱ्याच दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांमध्येही साजरा केला आहे. या रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ-बहिणीच्या आॅनस्क्रीन नात्यावर टाकलेली एक नजर…

    भारतीय मनोरंजन विश्वातील गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतलेले दिलीप कुमार यांच्यातील भाऊ-बहिणीचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. मनोरंजन विश्वातील या दोन महान व्यक्तींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत बऱ्याच कलाकार, तंत्रज्ञांनी आॅफस्क्रीन भाऊ-बहिणीचं नातं जपलं आहे, पण रक्षाबंधनाचा सण आला की, चित्रपटांमध्ये गाजलेली भाऊ-बहिणीच्या नात्यावरील गाणी मनात आपसुकच रुंजी घालू लागतात. बहिण-भावाच्या नात्यावरील गाण्यांची अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली परंपरा आजही भारतीय सिनेमांमध्ये अबाधित आहे. सध्या फिल्ममेकर आनंद एल. राय अक्षय कुमारला घेऊन ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातही प्रेक्षकांना बहिण-भावाच्या नात्यातील आणखी काही वेगळे पैलू पहायला मिळतील अशी आशा आहे.

    रक्षाबंधन किंवा भाऊबीज आला किंवा याचा उल्लेख जरी निघाला तरी ‘सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती… ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया…’ हे गाणं अगदी सहजपणं ओठांवर येतं. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भाऊबीज’ या चित्रपटातील आशा भोसले यांच्या आवाजातील हे भाऊबीजेच्या सणाचं गाणं अजरामर झालं आहे. यासारख्या आणखी काही चित्रपटांनीही भाऊ-बहिणीचं रेशमी नातं अधोरेखित करत काळ कितीही बदलला तरी या नात्यातील गोडवा कायम अबाधित राहणारा असल्याचं पटवून दिलं आहे. रंगीत चित्रपटांच्या विश्वातील विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ या चित्रपटात अलका कुबल आणि अजिंक्य देव यांनी साकारलेली भाऊ-बहिणीची भूमिका आणि ‘भावासाठी धावा करते पाठीशी राही…’ हे गाणं चांगलंच गाजलं. यात किशोरी शहाणे, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, रमेश भाटकर, आशालता वाबगावकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. मात्र ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातही हे नातं रुपेरी पडद्यानं अधिक चांगल्याप्रकारे फुलवलं होतं हे विसरता येणार नाही.

    राजदत्तांची ‘धाकटी बहिण’
    ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी १९७० मध्ये कृष्णधवल चित्रपटांच्या युगात ‘धाकटी बहीण’ या चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं एका वेगळ्या शैलीत सादर केलं होतं. या चित्रपटातील ‘धागा जुळला, जीव फुलला, वेड्या बहिणीला भाऊ मिळाला…’ हे चित्रपटातील गाणं रक्षाबंधनाच्या सणासाठी अगदी समर्पक आहे. या चित्रपटात अरुण सरनाईक यांनी साकारलेल्या भावाची रक्षाबंधनासाठी वाट पाहणारी बहिण आणि तिच्या मनात ओतप्रोत भरलेला भाव या गाण्यात पहायला मिळतो. सरनाईक यांच्यासोबत या चित्रपटात अनुपमा, कमलाकर टाकळकर, राजा मयेकर, हेलन यांच्या भूमिका आहेत. हे गाणं आशा भोसले यांनी गायलं असून, दिवंगत संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी आपल्या अनोख्या शैलीत संगीतबद्ध केलं आहे.

    माडगूळकरांची ‘ओवाळणी’
    १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओवाळणी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं आहे. या चित्रपटातही बहिण-भावाचं नातं अखोरेखित केलं गेलं आहे. कथा, पटकथा, संवादलेखन ग. दि. माडगूळकर यांचं आहे. सुलोचना, राजा परांजपे, चित्रा, विवेक, इंदिरा चिटणीस, धुमाळ, बाळकोबा गोखले, आल्हाद अशी त्या काळातील आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत. २००२ मध्ये पुन्हा ‘ओवाळणी’ याच शीर्षकाचा चित्रपट दिग्दर्शक डॅा. बाबासाहेब पोवार यांनी बनवला. या चित्रपटात अलका कुबल, राजशेखर, उषा नाईक, चेतन दळवी, अलग इनामदार आदी कलाकारांना घेऊन बनवला. पोवार यांनी आपल्या चित्रपटात सैन्य दलातील अधिकारी भाऊ आणि त्याच्या बहिणीची कथा मांडली.

    रमेश-सीमा देवांचा ‘ओवाळीते भाऊराया’
    ‘भाऊबीज’ या शीर्षकाअंतर्गत दोन मराठी चित्रपट बनले आहेत. १९५५ नंतर २००३ मध्ये पुन्हा ‘भाऊबीज’ प्रदर्शित झाला. हिंदू-मुस्लीम लहान बहिण-भावाच्या प्रेमाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात अशोक शिंदे, निशिगंधा वाड, अलका कुबल, सीमा देव, कुलदीप पवार हे कलाकार आहेत. ‘ओवाळणी’ आणि ‘भाऊबीज’प्रमाणे ‘ओवाळीते भाऊराया’ या शीर्षकाचेही दोन चित्रपट बनले आहेत. १९७५ मध्ये दिग्दर्शन दत्ता केशव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या चित्रपटात रमेश देव, सीमा देव, रविराज, रुही, गणेश सोळंकी, नीलम, विवेक, मोहन कोठीवान, राजा नेणे, वत्सला देशमुख, मंदा देसाई, रवी आनंद आदी कलाकार आहेत. यातील ‘ओवाळीते मी लाडक्या भाऊराया…’ हे जगदीश खेबूडकरांच्या लेखणीतून अवतरलेलं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं शुभांगी आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. दिग्दर्शक सुभाष फडके यांनी २००७ मध्ये पुन्हा ‘ओवाळीते भाऊराया’ याच शीर्षकाचा चित्रपट बनवला. या चित्रपटामध्ये सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी, प्रिया बेर्डे, स्मिता तळवलकर, तृप्ती भोईर, कुशल बद्रीके आदी कलाकारांनी अभिनय केला आहे.

    बेर्डेंचा ‘हाच सूनबाईचा भाऊ’
    १९६२ मध्ये आलेल्या ‘बायकोचा भाऊ’मध्ये दिग्दर्शक माधव भोईटे यांनी भावा-बहिणीच्या नात्यावर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून प्रकाश टाकला आहे. राजा परांजपे, रंजना (जुनी), सूर्यकांत, दादा साळवी, इंदिरा चिटणीस यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील लतादीदींच्या आवाजातील ‘आली दिवाळी…’ हे गाणं लोकप्रिय आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचा ‘हाच सूनबाईचा भाऊ’ सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात नीना कुलकर्णी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या भाऊ-बहिणीची कहाणी प्रेक्षकांनी पाहिली. या चित्रपटाद्वारे रेणुका शहाणेची सिनेसृष्टीत एंट्री झाली होती. या चित्रपटात मधुकर तोरडमल, मोहन जोशी, सुलभा देशपांडे, शमा देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. ‘भाऊचा धक्का’ असं शीर्षक असलेलाही एक मराठी चित्रपट आला आहे.

    लक्ष्मीकांत-सोनाली भाऊ-बहिण
    गिरीश घाणेकरांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘रंगत संगत’ या चित्रपटातही भावा-बहिणीचं रेशमी नातं खुलवलं आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या कौटुंबिक चित्रपटात अर्चना जोगळेकरनं कॅन्सरग्रस्त बहिणीची भूमिका साकारली असून, लक्ष्मीकांत बेर्डेनं तिच्या भावाचा रोल केला आहे. लक्ष्मीकांतसह रमेश भाटकर, उदय टिकेकर आणि अशोक शिंदे या चार मित्रांची कथा या चित्रपटात आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या सुपरहिट ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सोनाली अधिकारी यांनी भाऊ-बहिण साकारले आहेत. यात सोनालीनं अपंग बहिणीची भूमिका साकारली असून, अशोक शिंदे तिच्याशी विवाह करतो असं दाखवण्यात आलं आहे. वर्षा उसगावकर, वैशाली दांडेकर, निळू फुले, सुधीर जोशी, विजय पाटकर, रवींद्र बेर्डे, जयवंत वाडकर, शांता इनामदार, चेतन दळवी, अशोक हांडे, आदेश बांदेकर, किशोर नांदलस्कर, नंदू माधव यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

    मिलिंदचा ‘भावाची लक्ष्मी’
    २००६ मध्ये दिग्दर्शक संजय झनकर यांनी ‘भाऊ माझा पाठीराखा’ या चित्रपटात बहिण-भावाची काहीशी अनोखी कथा सादर केली. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद प्रवीण शांताराम यांनी लिहिले असून, अशोक शिंदे, गिरीश ओक, सुरेखा कुडची, योगेश महाजन, शुभदा पाटणकर, जयवंत वाडकर, अनिल गवस, कल्पना साठे, वृशाली गंधे आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. संदीप नवरेनं २००७ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘भावाची लक्ष्मी’ या चित्रपटात एका भावानं बहिणीला दिलेल्या आगळ्यावेगळ्या भेटीची कहाणी आहे. या चित्रपटात मिलींद गवळी, उषा नाईक, डॉ. विलास उजवणे, सुधीर दळवी, सुरेश ओहाळ, स्वप्नील राजशेखर आदी कलाकार आहेत. दिग्दर्शक अशोक कार्लेकर यांनी ‘अशी ही भाऊबीज’ या चित्रपटात अ‍ॅड. प्रशांत भेलांडे, बाळ धुरी, सुहासीनी देशपांडे, शरद पोंक्षे, शशांक उदापूरकर, मोहीनी पोतदार या कलाकारांच्या साथीनं या नात्याचा एक वेगळा पैलू सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

    अतुलची बहिण प्रिया
    ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटात दिग्दर्शक परेश मोकाशीनं सादर केलेलं भाऊ-बहिणीचं नातं आजच्या काळातील प्रेक्षकांना ठाऊक असेल. मधुगंधा कुलकर्णीसोबत परेशनं या चित्रपटाची पटकथा लिहीली असून, श्रीरंग महाजननं साकारलेला ज्ञानेश आणि सायली भांडारकवठेकरनं साकारेल्या मुक्ताच्या माध्यमातून भाऊ-बहिण सादर केले. दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटात मृत्यूपश्चातही बहिण-भावाचं नातं कसं अबाधित राहतं त्याची कथा सादर केली. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी यांनी बहिण-भावाची भूमिका साकारली आहे. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपल्या परीनं भाऊ-बहिणीच्या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही हे नातं काळानुरूप बदलांचा स्वीकार करत रसिकांसमोर येतच राहील हे वेगळं सांगण्याची गरज नाही