रणबीर-इम्तियाजची हॅटट्रीक, ‘या’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा येणार एकत्र!

इम्तियाज सध्या दोन चित्रपटांवर काम करतोय. यापैकी एक संगीतकार अमर सिंग चमकीलांचा बायोपीक आहे, तर दुसरा चित्रपट आत्महत्येसारख्या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा असल्याचं समजतं.

    काही दिग्दर्शक आणि कलाकारांची अशी काही जोडी जमते की ती पुन: पुन्हा समोर येते. प्रेक्षकांनाही एखादी जोडी भावली की त्याची पुनरावृत्ती होत जाते, किंबहुना एखाद्या दिग्दर्शकाची एखाद्या कलाकारासोबत सूर जुळले की, तो नेहमी त्याच कलाकाराला आपल्या चित्रपटासाठी निवडतो. अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांचं नातंही असंच काहीसं झालं आहे.

    ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॅाक्स आॅफिसवर कमाल दाखवू न शकल्यानं इम्तियाजला पुन्हा आपल्या फेव्हरेट अॅक्टरची आठवण झाली आहे. इम्तियाज आपला आगामी प्रोजेक्ट रणबीरसोबत बनवणार असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इम्तियाज सध्या दोन चित्रपटांवर काम करतोय. यापैकी एक संगीतकार अमर सिंग चमकीलांचा बायोपीक आहे, तर दुसरा चित्रपट आत्महत्येसारख्या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा असल्याचं समजतं.

    यापूर्वी रणबीरनं इम्तियाजच्या ‘रॅाकस्टार’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोन्ही चित्रपटांनी तिकीट खिडकीवर चांगली कमाई केली आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज होत आहे.