रणवीर दाखवणार ‘दि बिग पिक्चर’, नक्की काय आहे हे जाणून घ्या!

या कार्यक्रमाद्वारे ज्ञान आणि दृश्य स्मरणशक्ती यांचा खास संयोग घडवण्यात येणार आहे. प्रेक्षकांना सहभागी करून घेऊन चालवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमातून भारतातील गेम शोजची संकल्पना बदलेल.

    युथ फेव्हरेट रणवीर सिंग आता लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण करताना दिसणार आहे. कलर्सनं जगातील सर्वात मोठ्या प्रश्नमंजुषा स्पर्धा बायजूज प्रस्तुत ‘दि बिग पिक्चर’चे हक्क मिळवले आहेत. ‘दि बिग पिक्चर’साठी रणवीरला साइन करण्यात आलं आहे. तो एक निवेदक म्हणून टीव्हीवर प्रथमच दिसणार आहे. एक पुरस्कार विजेता अभिनेता आणि तरूणांचा आदर्श असलेल्या रणवीरचे असंख्य चाहते आहेत.

    या कार्यक्रमाद्वारे ज्ञान आणि दृश्य स्मरणशक्ती यांचा खास संयोग घडवण्यात येणार आहे. प्रेक्षकांना सहभागी करून घेऊन चालवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमातून भारतातील गेम शोजची संकल्पना बदलेल. रणवीर लोकांना भरपूर पैसे कमावण्याची संधी देईल. तीन लाइफलाइन्सच्या मदतीनं या स्पर्धकांना ग्रँड प्राइज पैसे घेऊन जाण्यासाठी १२ दृश्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज पडेल. ‘दि बिग पिक्चर’च्या संवादात्मक स्वरूपामुळं प्रेक्षकांना घरबसल्या पारितोषिकं जिंकण्याची संधी मिळेल.

    टीव्हीवरील एंट्रीबाबत रणवीर म्हणाला की, एक कलाकार म्हणून माझ्या प्रवासात प्रयोग आणि शोधाची इच्छा सातत्यपूर्ण राहिली आहे. भारतीय सिनेमानं मला निश्चितच प्रत्येक गोष्ट दिली आहे. एक कलाकार म्हणून मला प्रावीण्य मिळवण्यासाठी आणि माझी कौशल्यं दाखवण्यासाठीचं हे एक व्यासपीठ आहे. मला मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आभारी आहे. आता या नव्या रूपातही प्रेक्षक मला स्वीकारतील याची खात्री आहे.