अंमली पदार्थविरोधी एनसीबीच्या पथकाकडून रिया चक्रवर्तीला समन्स

रियाचीही ड्रग्ज डीलप्रकरणात चौकशी होणार असून एनसीबीचे पथक मुंबई पोलिसांसह रियाच्या घरी दाखल झाले आहेत. एनसीबीच्या पथकात महिला अधिकारी व महिला पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे, रियाच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थांबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. काल शनिवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच आज लगेचच रिया चक्रवर्तीला एनसीबीने समन्स धाडण्याची तयारी सुरु केली असून तिच्याही अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच, पुढील तपासासाठी एनसीबीची टीम रियाच्या मुंबईतील घरी पोहचली आहे. त्यामुळे, आता रियाला अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समन्स बजावताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला दोन पर्याय दिले. यामध्ये रियाला चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन करताना तिने स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी यावं किंवा तीनं आत्ता आमच्या टीमसोबत चौकशीसाठी चलावं. एनसीबीचे सहसंचालक समीर वानखेडे म्हणाले, रियाला समन्स देण्यात आलं आहे. यावेळी ती स्वतः घरी हजर होती.

शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडाने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना एनसीबीने त्यास अटक केली. आता, रियाचीही ड्रग्ज डीलप्रकरणात चौकशी होणार असून एनसीबीचे पथक मुंबई पोलिसांसह रियाच्या घरी दाखल झाले आहेत. एनसीबीच्या पथकात महिला अधिकारी व महिला पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे, रियाच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.