स्पर्धकांचे ताई-दादा बनून त्यांना ग्रूम करू – मुग्धा वैशंपायन

एक तपाच्या या काळामध्ये मुग्धानं बरंच काही आत्मसात केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गायनातही ती पारंगत झाली आहे.

    १२ वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंचरत्नांपैकी सगळ्यात लहान चिमुरडी म्हणजे मुग्धा वैशंपायन. आता मुग्धा ज्युरी रूपात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या नवीन पर्वामध्ये दिसणार आहे. हे नवीन पर्व २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एक तपाच्या या काळामध्ये मुग्धानं बरंच काही आत्मसात केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गायनातही ती पारंगत झाली आहे.

    सारेगमप लिटिल चॅम्प्सचे जुनं आणि नवीन पर्व आणि नवीन पर्वातील टॅलेंट बद्दल बोलताना मुग्धा म्हणाली, “आम्ही पंचरत्न या नावानं शंभरहून अधिक कार्यक्रम केल्यानं एकमेकांना चांगले ओळखतो. प्रत्येकाचं गाणं, जॅानर आम्हाला ठाऊक आहे. आमची छान मैत्री आहे. या पर्वाच्या निमित्तानं पूर्वी घडलेलं रिकॅाल होणार आहे. खूप मोठी जबाबदारी असल्यानं किंचित दडपण आहे. टीमवर्कमुळं दडपण जाईल आणि चांगलं काम होईल याची खात्री आहे. २००८-०९च्या पर्वात मी स्पर्धक होते. आता जज बनून येतेय. हा १२-१३ वर्षांचा प्रवास खूप कमालीचा असल्यानं खूप आनंद होतोय.

    आम्ही टेक्नोसॅव्ही नव्हतो. त्यामुळं एखादा कलाकार स्वत:ला कसा प्रेझेंट करू शकतो याबाबत काही ठाऊक नव्हतं. सारेगमपनंतर जे काही केलं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे आम्हाला समजत नव्हतं. आताची जनरेशन टेक्नोसॅव्ही आहे. त्यांना स्वत:ला प्रमोट कसं करायचं, कसं प्रेझेंट करायचं हे माहित आहे. हे करताना त्यांचा गाण्यावरचा फोकस कमी होता कामा नये याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. यासाठी त्यांना ग्रूम करण्याचा प्रयत्न करू. त्यांचे ताई-दादा बनून त्यांना समजावू. जज या भूमिकेत असलो, तरी ताई-दादाच्या नजरेतून आम्ही त्यांना जज करणार आहोत ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते.”