ज्ञानाची साथ देत सचिन बनवणार करोडपती

सचिन या शोच्या माध्यमातून ज्ञानाची साथ देत स्पर्धकांना करोडपती बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या शोच्या निमित्तानं सचिन यांनी 'नवराष्ट्र'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

  सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पुन्हा एकदा मराठीतील आघाडीचे अभिनेते सचिन खेडेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी दोन पर्वांचं यशस्वी सूत्रसंचालन केलेले सचिन या शोच्या माध्यमातून ज्ञानाची साथ देत स्पर्धकांना करोडपती बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या शोच्या निमित्तानं सचिन यांनी ‘नवराष्ट्र’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

  अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या शैलीमुळं ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो भारतीय टेलिव्हिजच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. हाच शो मराठीमध्ये ‘कोण होणार करोडपती’ या नावानं सुरू आहे. या पर्वासाठी पुन्हा होस्ट बनण्याबाबत सचिन म्हणाले की, हा शो १२० पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि देशांमध्ये सुरू आहे. आपल्याकडे याची ओळख अमिताभ बच्चन यांच्यापासून सुरू होते. त्यामुळं ते खूपच मोठं दडपण आहे. हा एक साचेबद्ध कार्यक्रम असला तरी अमिताभ यांनी या शोला इतकं मोठं ग्लॅमर मिळवून दिलंय की, ती जबाबदारी खरं खूप घाबरवणारी आहे. माझ्या पद्धतीनं मी पूर्ण प्रयत्न केला आहे. दोन सीझन्स मी आॅलरेडी होस्ट केले आहेत. या पर्वात तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. हा माझा खूप आवडीचा शो आहे. ही पिढी तंत्रज्ञानानं अवगत आहे. सहा-सात वर्षांपूर्वी जेव्हा मी दुस्यांदा होस्ट केलं होतं, तेव्हा डिजिटलचा वापर जास्त होत नव्हता. आमच्या मिस कॅालवर आज साडे सहा लाख कॅाल्स आले. इतक्या मोठ्या प्रतिसादामुळं आम्ही भारावून गेलो. निवडलेल्या स्पर्धकांची तयारी करून घेणं, जनरल नॅालेजची टेस्ट घेणं, झूमवर मुलाखती घेणं या गोष्टी कराव्या लागल्या. या पर्वात आलेले स्पर्धक डिजिटली खूप तयार आहेत. टायमर आणि कॅाम्प्युटरला सरावलेले आहेत. आपण ज्यांना गेमर म्हणतो, ते गेमर यावेळी सहभागी झाल्याचं चित्र पहायला मिळेल.

  या पर्वाच्या ‘ज्ञानाची साथ’ या टॅगलाईन बाबत सचिन म्हणाले की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ’, असं आम्ही ‘कोण होणार करोडपती’च्या ट्रेलरमध्ये म्हटलं आहे. ज्ञानाची साथ असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकता. तुमचं ज्ञान मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतं, ज्ञानाच्या साथीनं तुम्ही पुढं जाऊ शकता. घरावर दरोडा पडू शकतो, बँकेतील पैसेही बुडतील, पण ज्ञानाची चोरी कोणी करू शकत नाही. महाराष्ट्राला आपण बुद्धीचं माहेरघर म्हटलं जातं. महाराष्ट्रातून निवडलेले उत्तम स्पर्धक या कार्यक्रमात पहायला मिळेल. हा पैसे मिळवून देणारा शो असला तरी आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती बनण्याची ही संधी आहे. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी सामान्य माणसाकडे चालून आली आहे. माझ्या दृष्टिकोनातून सांगायचं तर प्रत्येक स्पर्धक ही माझ्यासाठी वेगळी जबाबदारी असेल. हॅाट सीटवरच्या प्रत्येक स्पर्धकाला दिलासा देऊन त्याला रिलॅक्स करण्याचं काम मला करायचं आहे. या सर्व सामान्य माणसांना भेटता येतंय आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. कलाकार म्हणून आम्ही आमच्या सर्कलमध्ये फिरत असतो, पण अशा सामान्य माणसांची भेट कधी होत नाही. त्यांची स्वप्नं आणि आयुष्याचा संघर्ष ऐकता ऐकता अनेक गोष्टी नकळत समजतात. हा माझा मागील दोन सीझन्सचा अनुभव असून, हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. त्यांची स्वप्नं, कथा, ध्येय, धाडस ऐकल्यानंतर त्याचा गुण नाही तर वाण आपल्याला लागतोच. ही माझ्यासाठी एक मोठी मिळकत आहे.

  एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार
  ‘कोण होणार करोडपती’ हा शो तांत्रिकदृष्ट्या खूप स्ट्राँग आहे. केवळ अगोदर मॅाक रिहर्सल्स केल्या जातात. सर्व शो टेक्निकली प्रोग्रॅम्ड आहे. पहिला प्रश्न आल्यानंतर येणारं म्युझिक, कॅमेरा वगैरेची तालीम करावी लागते. या टेक्निकल गोष्टी आहेत, पण स्पर्धकांना हॅाट सीटवर बसल्यावर मानसिक दडपण येतं. त्यातून बाहेर काढून खेळासाठी तयार करणं किंवा त्यांच्या आयुष्याबाबत, ध्येयाबाबत, जिंकल्यावर काय करणार या गोष्टी जाणून घेत रिलॅक्स करण्याचं काम माझ्या दृष्टिनं खूप महत्त्वाचं आहे. यंदा माझ्या कॅास्च्युम आणि लुकवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. सोनी मराठी वाहिनी, अजय भालवणकर, अमित फाळके, स्टुडिओ नेक्स्टच्या सुजाता संघमित्रा या सर्वांनी होस्टच्या लुकच्या बाह्यांगाचाही खूप विचार केला आहे. त्यामुळं काहीशा नव्या लुकमध्ये मी प्रेक्षकांना शोमध्ये दिसणार आहे.

  फ्रेंड, फिलॅासॅाफर आणि गाईड…
  ‘बापजन्म’, ‘मोरंबा’, ‘कच्चा लिंबू’, ‘टेक केअर गुड नाईट’ या सर्व चित्रपटांमध्ये मी वयाला साजेसे असे आजच्या काळातील रोल्स केले आहेत. त्यामुळं कधी पाठीवर हात ठेवायचा, कधी समजावून सांगायचं, कधी प्रेमानं दटावायचं या लहान-लहान गोष्टी आता माझ्याकडे माझ्या जगण्यातून आलेल्या आहेत. त्या या शोमध्ये पुरेपूर वापरण्याचा प्रयत्न मी करत आहे. माझ्या समोर आलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला खरं तर मी उपदेश देऊ शकणार नाही, पण माझ्यापेक्षा तरुण असलेल्यांना समजुतीच्या गोष्टी सांगण्याकडे कल असेल. फ्रेंड, फिलॅासॅाफर आणि गाईड अशी साधारण ही भूमिका आहे. हा देखील एक परफॅार्मंसच आहे. माझ्या वैयक्तिक भावनांसह इथं माझा कस लागतोय. इतर ठिकाणी लेखकांची वाक्य असतात, पण इथं माझीच वाक्यं माझ्यात बसवायची आहेत.

  …तर अमिताभही नक्कीच येतील
  ज्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाखाली ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो आला, तेव्हा भविष्यात मराठीत हा शो निघेल आणि त्याचे होस्ट आपण असू असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. हा शो आपल्या भाषेत आल्याचा मला अभिमान आहे. त्याहूनही या शोच्या होस्टची जबाबदारी माझ्याकडं येणं ही मला समाधान देणारी गोष्ट आहे. माझं नाव या शोसोबत जोडलं गेलं हे स्वप्नवत नक्कीच आहे. पहिल्या दोन सीझनमध्ये सहभागी झालेल्या माणसांनी दिलेली श्रीमंती मला आजवर पुरलेली आहे. जर मराठीत हा शो येऊ शकतो, माझ्या वाट्याला होस्ट करण्याची संधी येऊ शकते, ही स्वप्न जशी साकार झाली तशी या मराठमोळ्या शोमध्ये अमिताभ बच्चनही येऊ शकतात हे स्वप्नही पूर्ण होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे. अमिताभ यांनी येऊन जरी आशिर्वाद दिला, तरी आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट होईल.

  घरबसल्या लखपती होण्याची संधी
  या शोमध्ये हॅाटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकांसाठी फिफ्टी-फिफ्टी, व्हिडीओ अ फ्रेंड आणि बहुमताचा कौल या तीन लाईफलाईन्स आहेत. प्ले अलाँगद्वारे घरबसल्या लखपती होण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सोनी लिव्ह अॅपवर स्पर्धक खेळत असताना प्रेक्षकांनाही खेळता येणार आहे. त्यांना लाइफलाईन्ससुद्धा वापरता येणार आहेत. यात प्रेक्षक रोज लखपती होणारच आहेत, पण त्यांनाही हॅाटसीटवर येण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या नवीन गोष्टी आहेत. सोमवार ते शनिवारी ‘कोण होणार करोडपती’ प्रसारीत होणार आहे. दर शनिवारी कर्मवीर एपिसोड असेल, ज्यात समाज कल्याणासाठी झटणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांची भेट घडणार आहे.