सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ ला ओटीटीवर डिमांड, ६० ते ६५ कोटी रूपयांना झाली विक्री!

सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला 'भूत पोलीस' हा चित्रपटही बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

    कोरोनानं मनोरंजन विश्वाची अपरिमीत हानी केली आहे. अनेकांना देशोधडीला लावलं आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहं उघडलेली नसल्यानं निर्मात्यांना बरंच नुकसान सहन करावं लागत आहे. यातच काहीजण ओटीटीवर चित्रपट रिलीज करून आपले पैसे सेफ करण्याचा गेम खेळत आहेत. या खेळात काहींना नुकसान तर काहींना थोडा फार का होईना फायदा होत आहे.

    सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला ‘भूत पोलीस’ हा चित्रपटही बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. आता या चित्रपटानंही सिनेमागृहं उघडण्याची वाट न पहाता ओटीटीची वाट धरली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार निर्माते रमेश तौरानी आणि त्यांच्या टीमनं डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत हातमिळवणी केली आहे.

    ६० ते ६५ कोटी रुपयांच्या दरम्यान या चित्रपटाची विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे. या सौद्यातूनही निर्मात्यांना २० कोटींहून अधिक प्रॉफीट होणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर संगीत आणि इतर हक्क विकूनही तौरानींच्या खात्यावर काही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळं तौरानींसाठी हा सौदा फायद्याचा ठरल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोठे कलाकार असल्याचा फायदा ‘भूत पोलीस’ला झाल्याचं बोललं जात आहे.