राधेनंतर सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ ही ओटीटीच्या मार्गावर!

 सिनेमागृहांची कवाडं उघडण्याची चिन्हं दिसत नसल्यानं अखेर निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं. 'भूत पोलीस'चा प्रीमियर डिस्नी प्लस हॅाटस्टारवर करण्यात येणार आहे.

    महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर हळूहळू कमी होत असला तरी भविष्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्यानं सध्या अनिश्चिततेचंच वातावरण आहे. याच कारणामुळं मोठ्या चित्रपटांनीही ओटीटीचा मार्ग अवलंबला आहे. ‘राधे’ मागोमाग सैफ अली खान, यामी गौतम, अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांची भूमिका असलेला ‘भूत पोलीस’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

     सिनेमागृहांची कवाडं उघडण्याची चिन्हं दिसत नसल्यानं अखेर निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं. ‘भूत पोलीस’चा प्रीमियर डिस्नी प्लस हॅाटस्टारवर करण्यात येणार आहे. सध्या याबाबतची बोलणी सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.

    जानेवारीमध्ये या चित्रपटाचं शूट संपवण्यात आलं होतं. त्यावेळी ‘भूत पोलीस’ १० सप्टेंबरमध्ये रिलीज करण्याची योजना आखण्यात आली होती, पण आता ते शक्य नसल्याची परिस्थिती आहे. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी यांनी केली आहे.