मुलगा की मुलगी कोण करणार जावेद अख्तर यांच्या डॉक्यू-ड्रामाचं दिग्दर्शन?

आपल्या जादुई लेखणीच्या बळावर सलीम-जावेद ही जोडी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी सलीम-जावेद यांच्या कारकिर्दीवर डॉक्यू-ड्रामा बनवण्याची योजना आखली आहे.

    महान व्यक्तींच्या कथा नेहमीच चित्रपट, मालिका, वेब सिरीज किंवा डॉक्यू-ड्रामाच्या माध्यमातून समोर येत असतात. हिंदी सिनेसृष्टीच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान आणि जावेद अख्तर यांचा जीवनप्रवासही डॉक्यू-ड्रामाच्या माध्यमातून जगासमोर येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे.

    १९७०-८०च्या दशकात सलीम-जावेद या जोडीनं हिंदी सिनेसृष्टीत माईल स्टोन ठरणाऱ्या काही चित्रपटांचं लेखन केलं आहे. यापैकी ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘डॉन’, ‘मि. इंडीया’, ‘शक्ती’, ‘त्रिशूल’ हे चित्रपट एव्हरग्रीन ठरले आहेत. आपल्या जादुई लेखणीच्या बळावर सलीम-जावेद ही जोडी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी सलीम-जावेद यांच्या कारकिर्दीवर डॉक्यू-ड्रामा बनवण्याची योजना आखली आहे, पण या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कोणाकडे सोपवण्यात येणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

    खरं तर फरहान एक उत्तम दिग्दर्शक आहे. याखेरीज त्याची बहिण झोया अख्तरही एक चांगली दिग्दर्शिका म्हणून नावारूपाला आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणीतरी या डॉक्यू-ड्रामाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा सुरू होती, पण या केवळ अफवा ठरल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी नव्या दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे.