सलमान-मांजेरकरांचा ‘अंतिम’ पूर्ण

अक्शन-थ्रीलर असलेल्या ‘अंतिम – द फायनल ट्रूथ’ या मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती सलमान खान प्रोड्कशन्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

    सुपरस्टार महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात मांजरेकर असायला हवेत असं सलमानला नेहमी वाटत असतं. याच कारणामुळं ‘दबंग’मध्ये निधन झाल्याचं दाखवण्यात आलेल्या मांजरेकरांना सलमाननं ‘दबंग २’मध्ये एका वेगळ्या पद्धतीनं का होईना पण पुन्हा दाखवलंच. हेच प्रेम या दोन मित्रांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे.

    अक्शन-थ्रीलर असलेल्या ‘अंतिम – द फायनल ट्रूथ’ या मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती सलमान खान प्रोड्कशन्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटात तो भावोजी आयुष शर्मासोबत दिसणार आहे. यांच्या जोडीला प्रज्ञा जैस्वालही आहेच. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

    सध्या चित्रपटगृहं बंद असल्यानं हा चित्रपट ऑक्टोबरनंतरच प्रदर्शित होण्याची चिन्हं दिसत असल्याचं सूत्रांकडून समजतं. सलमाननं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये या चित्रपटाचा टीझर आपल्या सोशल मीडियावर रिलीज केला होता.