‘समांतर २’मध्ये स्वप्नील उलगडणार कुमारचं रहस्य!

एमएक्स प्लेअरवर १ जुलैपासून 'समांतर २' विनामूल्य पाहता येणार आहे. 'समांतर २'बद्दल बोलताना स्वप्नीलनं 'नवराष्ट्र'शी मनमोकळा संवाद साधला.

  स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘समांतर’ या मराठी वेब सिरीजनं मोठमोठया चित्रपटांचे रेकॅार्डस मोडले असल्याचं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. व्यावसायिक पातळीवर जर ‘समांतर’चं मूल्यमापन करायचं ठरलं आणि एका प्रेक्षकाला कमीत कमी ५० रुपये जरी तिकीट लावलं व १०० मिलियन्स डाऊनलोडसचा ५० रुपयांप्रमाणे गुणाकार केला तर कितीशे कोटी रुपयांचं कलेक्शन झालं असतं याचं गणित बहुधा कोणी केलं नसेल. ५००० मिलियन्स हा आकडा कोणत्याही मराठी माणसाचा उर अभिमानानं भरून यावा इतका मोठा नक्कीच आहे. मराठी काँटेंट जर चांगला बनला, उत्तमरीत्या सादर केला, योग्य प्रमोशन केलं आणि उचित मार्केटींग स्ट्रॅटेजी ठरवली तर काय कमाल करू शकतो याचं ‘समांतर’ हे ज्वलंत उदाहरण आहे. एमएक्स प्लेअरवर १ जुलैपासून ‘समांतर २’ विनामूल्य पाहता येणार आहे. ‘समांतर २’बद्दल बोलताना स्वप्नीलनं ‘नवराष्ट्र’शी मनमोकळा संवाद साधला.

  ‘समांतर २’ मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ज्या वेब शोची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती तो ‘समांतर २’ अखेर प्रदर्शित होणार आहे. याबाबत स्वप्नील म्हणाला की, सुहास शिरवळकरांच्या पुस्तकाचेच दोन भाग आहेत. पहिला भाग होता पुस्तकाचा पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध आहे. पहिल्या भागानं ओटीटीवर धुमाकूळ घातला. महाराष्ट्रातील डाऊनलोडचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यामुळं दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ट्रेलरला खूप कडक रिस्पाँस मिळालाय. हा ट्रेलर मागील २४ तासांमध्ये भारतात आॅरगॅनिकली युट्यूबवर अकराव्या नंबरवर ट्रेंडींग आहे. याचा अर्थ लोकांचा प्रतिसाद अचाट आहे. तेच कथानक पुढे जाणार आहे. पहिल्या भागात असं दाखवण्यात आलं होतं की, कुमारला त्याच्या भविष्याच्या डायऱ्या मिळाल्या. आता त्याचं भविष्य त्याला दररोज दिसत आहे. भविष्य पाहिल्यानंतर तो हा फेरा मोडू शकेल का? हा दुसरा भाग आहे. आपल्या आयुष्यात रोज काय घडणार हे त्याला आता कळणार आहे. हे समजणं चांगलं की वाईट? हा प्रश्न दुसऱ्या भागात कळीचा मुद्दा असेल. एखाद्याला जर त्याचं भविष्य समजलं, तर त्या व्यक्तीचं भलं व्हायला हवं, पण खरंच तसं होतं का? आधी भविष्य न सांगून देवानं योग्य केलंय? ही रेस ‘समांतर २’मध्ये पहायला मिळेल.

  ‘समांतर’च्या माध्यमातूनच डिजिटलवर पदार्पण करण्याबाबत स्वप्नील म्हणाला की, ‘समांतर’ची आॅफर येण्यापूर्वी मला दोन-तीन वेळा वेब शो करण्याची संधी आली होती, पण माझा स्वत:ला एक सिंपल प्रश्न होता. ज्या रूपात किंवा गोष्टींमधून मला लोकं चित्रपटांमध्ये किंवा टेलिव्हीजनवर पहात होते तसंच जर मला ओटीटीवर पाहणार असतील तर मी वेब शो का करावा? ‘समांतर’ या वेब शोनं मला माझ्यातील अभिनेत्याला चॅलेंज करण्याची संधी दिली. या मालिकेनं मला ओटीटीची बलस्थानं टॅप करण्याची संधी दिली. ‘समांतर’सारख्या वेब शोनं मला सुहास शिरवळकरांचा नायक पुन्हा एकदा रेखाटण्याचा चान्स दिला. इतकंच नाही तर सतिश राजवाडे आणि समीर विद्वांससारख्या दिग्दर्शकांसोबत कोलॅब्रेशन करण्याची संधी मला या वेब शोनं दिली. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून कुमार महाजननं माझं भलं केल्याचं मी मानतो. त्याचं किती भलं होतं ते ठाऊक नाही.

  ‘समांतर’ केल्याचा सार्थ अभिमान
  मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की ‘समांतर’ ही आता मराठी वेब सिरीज राहिलीच नाही. याचे डाऊनलोडस १०० मिलियन्सपेक्षा जास्त आहेत. मेन स्ट्रीम मालिकांचे डाऊनलोड जसे असतात तसे ‘समांतर’चे आहेत. महाराष्ट्रात तर हिंदी मालिकांपेक्षा जास्त डाऊनलोड्स आहेत. तुम्ही मराठीसाठी काय केलं असं जर कोणी विचारलं तर अभिमानानं सांगेन की मी मराठीसाठी ‘समांतर’ नावाची वेब सिरीज केली. लाखो अमराठी लोकांनी मराठी काँटेंट पाहिलं आहे. मराठी लेखकानं लिहिलेली गोष्ट लाखो अमराठी रसिकांपर्यंत पोहोचली आहे.

  एक व्यक्तिरेखा आणि दोन कलाकारांचं कनेक्शन
  यापूर्वी मी आणि नितीश भारद्वाज आम्ही दोघांनीही कृष्णाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांना ती खूप भावली. ‘समांतर’साठी माझं आणि नितीशसरांचं कास्टिंग करण्यामागे एक उद्देश होता. मी ‘समांतर’मध्ये कुमार महाजन साकारावा ही सतिशची फार पूर्वीपासूनची इच्छा होती. नितीशसरांनी सुदर्शन चक्रपाणी साकारावा हे कास्टिंग यामुळेच डोक्यात आलं की या दोघांना एक जुनं कनेक्शन मिळेल. त्यामुळं कास्टिंगमध्ये एक गंमत येईल. मी देखील कृष्ण केलाय, नितीशसरांनीही कृष्ण साकारलाय. त्यांनी आधी केला, मी नंतर केला. गोष्टसुद्धा तशीच आहे. त्यांनी आधी जगलेलं आयुष्य कुमार पुन्हा जगतोय. हा कनेक्ट लोकांना आवडेल आणि भावेल याची खात्री होती. यासेबतच नितीशसरांनी खूप वर्षं मराठीत काही केलं नव्हतं. ओळखीचा आणि प्रभावी चेहरा असूनही खूप दिवस मराठीत दिसला नव्हता. हा चेहरा पुन्हा एकदा दिसणं ‘समांतर’साठी प्लस पॅाइंट होता. गोष्ट बनतानाच स्वप्नील पाहिजे हे सतिशच्या डोक्यात फिट्ट होतंच, पण नितीशसरांना कास्ट करण्यामागची हिच गंमत आहे.

  सईमुळे ‘समांतर’चं वजन वाढलं…
  सईच्या कॅरेक्टरबाबत आता काहीच सांगणार नाही. ती नेमकी कोण आहे? ती काय करतेय? ही तिच बाई आहे की दुसरी कोणी तरी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मुद्दाम ट्रेलरमध्ये दिलेली नाहीत. कारण ती कथानकाची गरज आहे. जर ही उत्तरं आता दिली तर सस्पेंस कमी होईल. त्यामुळं सईच्या कॅरेक्टरबाबतची उत्तरं आता देता येणार नाहीत, पण इतकंच सांगेन की सई दुसऱ्या भागात एका मोठ्या भूमिकेत आहे. सईचा आपला एक आॅडीयन्स आहे. तिचा एक डेडीकेटेड फॅन फॅालोईंग आहे. इतकंच नव्हे तर माझं आणि सईचं जोडी म्हणून वेगळा चाहता वर्ग आहे. ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ यांसारखे मराठीतील बहुचर्चित चित्रपट आमच्या जोडीच्या नावावर आहेत. अशात सईसोबत पुन्हा एकदा काम करायला मिळाल्यानं निश्चितच ‘समांतर’चं वजन वाढलं आहे.

  समीर-सतिशची अनोखी दिग्दर्शनशैली
  समीर आणि मला मागील काही वर्षांपासून एकमेकांसोबत काम करायचं होतं. ‘समांतर’मुळे योग जुळून आला. प्रत्येक दिग्दर्शक आपल्या कामाद्वारे एक वेगळं म्हणणं मांडत असतो. जसा सतिशनं पहिल्या सीझनला चार चांद लावले, तसंच समीरनंही दुसऱ्या सीझनचं सोनं केलंय. अत्यंत हुषार आणि प्रभावी दिग्दर्शक आहे. गोष्ट सांगण्याची खूप सुंदर कला समीरकडे आहे. ‘समांतर २’च्या निमित्तानं प्रथमच समीरसोबत काम करताना खूप मजा आली. भविष्याबाबत बोलायचं तर भविष्य पाहण्याची आवड असणाऱ्यांनी कायम ते पहात रहावं असं मला वाटतं. आपल्या भविष्याबद्दल प्रत्येकाला कुतूहल असतं. एखाद्या समोर भविष्याचं पान आल्यावर एकदाही भविष्यावर नजर टाकत नाही असा माझ्या माहितीत एकही माणूस नाही. पुढे काय घडणार हे जाणून घेणं हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. भविष्यात काय घडणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. कोणी काहीही म्हणो, पण हे खरं आहे. वरवर जरी कोणी दाखवत नसलं तरी प्रत्येकाच्या आत ते कुतूहल असतं. आपलं भविष्य समजलं तर मजा येईल असं प्रत्येकाला वाटत असतं.