‘समांतर’ माध्यमांच्या जाणीवेचा अभाव

‘कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका’, अशी एक म्हण आहे. म्हणजे आयुष्यात तुमचं कर्म, काम याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर त्याचा शेवट वा निकाल चांगलाच येतो. मात्र असे असतानाही अनेकांना त्यांच्या भविष्यात काय लिहून ठेवलं हे जाणून घेण्याची इच्छा असतो. मग यासाठी ज्योतिषाची मदत घेतली जाते. ज्योतिषी नक्षत्र, ग्रह, हातावरुन रेषा बघून भविष्य सांगतो. याच विषयावर ‘एमएक्स प्लेअर’वरील समातंर ही वेब सीरिज अवलंबून आहे. गेल्या आठवड्यात ही वेब सीरिज प्रकाशित झालेली आहे. ही वेब सीरिज रहस्यकथाकार सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कांदबरीवर आधारित  आहे. गेल्या काही दिवसांपासून या सीरिजची मोठी चर्चा सुरू आहे. इतर सीरिजच्या तुलनेत या सीरिजची प्रसिद्धीही चांगली झाली आहे. नऊ मालिकांमध्ये विभागलेल्या या सीरिजमध्ये स्वप्निल जोशी, कृष्णा भारद्वाज यांसारख्या मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. मात्र असे असतानाही ही वेब सीरिज फार मोठा करिष्मा दाखवू शकली नाही.

समांतर ही वेब सीरिज कुमार महाजनी या मुख्य पात्राच्या भोवती फिरत राहते. कुमारची आर्थिक परिस्थितीत हलाखीची असते. घरात पत्नी आणि मुलाला सुख देऊ शकत नाही याबद्दल मनात खदखदही असते. मात्र यानंतरही आपल्या भविष्यात चांगले दिवस येणार का? या आशेने नास्तिक असलेला कुमार शेवटचा उपाय म्हणून मित्रासोबत एका ज्योतिषाकडे जातो. मात्र ज्योतिषी त्याला भविष्य सांगायला नकार देतो. ज्योतिषानुसार त्याने कुमारचा हात यापूर्वीही पाहिलेला असतो आणि एकाच व्यक्तीचे भविष्य तो दोनदा सांगत नाही. कुमारचे आयुष्य आधीच कोणीतरी भोगून गेलं आहे. तो व्यक्ती असतो सुदर्शन चक्रपाणी. चक्रपाणीचा भूतकाळ हा कुमारचा भविष्यकाळ असतो. ज्योतिषाने कुमारला भविष्य सांगण्यास नकार दिल्याने तो चक्रपाणीचा शोध सुरू करतो. या सीरिजमध्ये हाच शोध दाखविण्यात आला आहे.

 स्वप्निल जोशी, कृष्णा भारद्वाज यांसारखे मोठे कलाकार असून ही सीरिज प्रेक्षकांना धरून ठेवू शकत नाही. या सीरिजचा विषय व कथा वेगळी आहे. ज्या प्रकारचा आशय वेब सीरिजला अपेक्षित आहे, तशा स्वरुपाचे कथानक असतानाही त्याचं सादरीकरण चोख झालेलं नसल्याने ही सीरिज प्रेक्षकांना जोडून ठेवू शकलेली नाही. कुमार महाजन हा आर्थिक संकटात आहे किंवा तो आपल्या जीवनाशी अत्यंत नाखूष आहे ही पार्श्वभूमी या सीरिजमध्ये तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना त्यातील पात्रांशी जोडता येत नाही. दुसरीकडे भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेने तो आपल्या वर्तमानाकडे अनुशंगाने त्याला पैसे व समाधान मिळवून देणाऱ्या नोकरीकडे दुर्लक्ष करतो. कदाचित दिग्दर्शकाला हेच दाखवायचे असू शकते. मात्र किमान त्याचं नोकरीकडे होत असलेले दुर्लक्ष या ना त्या प्रकारे सीरिजमध्ये दाखविणे अपेक्षित होते. दुसरीकडे सीरिजमध्ये मध्ये ‘सिनेमॅटिक एरर’ आहेत.     

या सीरिजमध्ये स्वप्निल जोशी (कुमार महाजनी), कृष्णा भारद्वाज (सुदर्शन चक्रपाणी), तेजस्वीनी पंडित (नीमा महाजन, कुमारची पत्नी), गणेश रेवडेकर (शरद, कुमारचा मित्र), जयंत सावरकर (ज्योतिषी) कलाकारांनी भूमिका बजावल्या आहेत. मात्र एकाही कलाकाराचा अभिनय फार भावत नाही वा लक्षातही राहत नाही. स्वप्निल जोशी हा कुमार महाजनी या मुख्य भूमिकत आहे. मात्र त्याचा अभिनय रटाळ वाटत राहतो. अनेक दृश्यांमध्ये तर त्याचा अभिनय अतिरंजीत वाटतो. दिग्दर्शक सतिश राजवाडे यांनी मुंबई-पुणे-मुंबई सारखा हिट चित्रपट दिला असला तरी वेब सीरिजसाठी आवश्यक असलेला अभ्यास त्यांनी केला नसल्याचे दिसून येते. वेब सीरिजचा प्रेक्षक हा चित्रपटांच्या प्रेक्षकापेक्षा वेगळा आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयासोबत खेळता येते. येथील प्रेक्षकाला मसालेदार चित्रपटांपेक्षा संशोधनातून तयार केलेला, दर्जेदार अभिनय असलेला, अभ्यासपूर्ण, विषयाची  सविस्तर मांडणी केलाली दृश्यात्मक कलामांडणी पाहायला आवडते. अन्यथा अशा वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तग  धरू शकत नाही.

मात्र काही गोष्टींसाठी ही सीरिज चांगली वाटते. पहिलं म्हणजे उत्कृष्ट सिनेमेटॉग्राफी. या सीरिजमध्ये ज्या पद्धतीने कॅमेराचा वापर केला आहे तो लाजवाब आहे. अनेक ठिकाणी ड्रोनची दृश्य आहेत. शिवाय अनेक सिन्स खूप चांगल्या प्रकारे शूट करण्यात आले आहेत. या कथानकाला थरारपटाची बाजू असल्याने संगीताचा वापरही चांगल्या प्रकारे केला आहे. रहस्यमय व थरारपटासाठी आवश्यक असलेलं संगीत असल्याने सीरिजमध्ये काही दृश्य भीती निर्माण करतात. लोकेशनही चांगलं घेण्यात आलं आहे. सुहास शिरवळकर हे मराठी साहित्यातील नावाजलेलं नाव आहे. त्यांच्या रहस्यमय कथा, कादंबरी वाचकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यातही समांतर हा थरारपटाबरोबरच हळूच एक संदेश देऊन जातो. ही कथा जरी कुमार महाजनची असली तरी आपल्या रोजच्या जीवनात अनेकांचा भूतकाळ हा अनेकांचा भविष्यकाळ असतो. मात्र भविष्याचा वेध घेत असताना आपण वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो. समांतर या कादंबरीचं कथानक हे वाचकाला  भावणारं आहे. ही कादंबरी वाचताना जितकं यातील पात्रांशी जोडता येतं तितकं (दृश्यात्मक माध्यम असूनही) या सीरिजशी जोडता येत नाही.  

– मीनसा