समितच्या ‘इंदोरी इश्क’चा वास्तववादी खेळ!

'इंदोरी इश्क'च्या निमित्तानं 'नवराष्ट्र'शी बातचित करताना समितनं आपल्या नव्या वेब सिरीजबाबत सांगितलं.

  ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’, ‘आश्चर्यचकीत’ ते तिनही वेगळ्या पार्श्वभूमीवरील, भिन्न विषयांवरील चित्रपट बनवल्यानंतर लेखक-दिग्दर्शक-निर्माता समित कक्कड सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टसमध्ये बिझी आहे. अशातच समीतच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ‘इंदोरी इश्क’ ही वेब सिरीज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. समितचा ट्रेड मार्क म्हणता येईल अशा ‘इंदोरी इश्क’मध्ये अनिर्बंध प्रेमाची संकल्पना सादर करताना आधुनिक काळातील प्रेमकथांमध्ये आढळणारा निष्ठा आणि व्यभिचाराचा खेळही सादर केला आहे. ‘इंदोरी इश्क’च्या निमित्तानं ‘नवराष्ट्र’शी बातचित करताना समितनं आपल्या नव्या वेब सिरीजबाबत सांगितलं.

  समित लवकरच संजय गुप्तांच्या दोन आगामी हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमांचं टायटल अद्याप ठरलेलं नसलं, तरी सध्या लेखन सुरू आहे. आजवर नेहमीच नवीन्यपूर्ण विषय हाताळण्याबाबत समित म्हणाला की, नवनवीन प्रयोग करत रहायला हवे, नाहीतर कामात तोचतोचपणा येतो असं मला वाटतं. त्यामुळंच मला नेहमी काहीतरी नवीन करत रहायला आवडतं. जे काही माझ्या मनाला भावतं, मी फिल करतो ते लोकांना दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. डोक्यात आलेला विचार कागदावर उतरवला गेला म्हणजे तो शूटही करू शकतो असं मला वाटतं. कामाबाबत प्रामाणिकपणा, नावीन्याचा शोध, लोकांपर्यंत स्टोरी पोहोचवण्याची शैली आणि पॅशन या गोष्टींच्या आधारे इथपर्यंत पोहोचलो आहे. आजवर काहीही करताना लोकांची आवड आणि व्यावसायिकता यात बॅलन्स ठेवला आहे. हे खूप गरजेचं असल्याचं मला वाटतं. सिनेमा इज अॅन आर्ट असल्यानं त्यात नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘इंदोरी इश्क’ची स्क्रीप्ट जेव्हा मी पहिल्यांदा वाचली, तेव्हा मला वाटलं की ही तर प्रत्येक मुलाची किंवा मुलीच्या फर्स्ट लव्हची कहाणी आहे. हे केलंच पाहिजे.

  ‘इंदोरी इश्क’मध्ये नेमकं काय दडलंय हे सांगताना समित म्हणाला की, काहींचं प्रेम यशस्वी होतं, पण कित्येकांचं अशस्वीही होतं. त्यामुळं प्रेमाचे वेगळे पैलू ‘इंदोरी इश्क’मध्ये सादर करण्याचा विचार मनात आला. माझ्या शालेय जीवनात, महाविद्यालनीय जीवनात मुलांना अशा प्रकारं प्रेम करताना पाहिलं आहे. काहींना प्रेमामुळं यशस्वी झालेलं, तर कोणाला देशोधडीला लागलेलंही पाहिलं आहे. जीवनातील हे सत्य आहे. प्रेमाचे हे दोन खरे रंग आहेत. त्यामुळं जेव्हा पटकथा वाचली तेव्हा आतापर्यंत अशा प्रकारचं काही केलं नसल्याची जाणीव झाली. ‘आयना का बायना’मध्ये क्राइम आणि डान्स केला. ‘हाफ तिकीट’मध्ये आठ वर्षांच्या मुलाचा फॅमिली ड्रामा दाखवला. मुंबईतील सत्य घटनांवर आधारीत ‘आश्चर्यचकीत’ बनवला. आता ‘इंदोरी इश्क’मध्येही खरी स्टोरी सांगितली आहे. या वेब सिरीजचा लेखक कुणाल मराठेची ही सत्य कथा आहे. ती ऐकल्यानंतर ही वेब सिरीज आपण करायचीच असा निर्णय घेतला.

  आजही तो तिची वाट पहातोय…

  ‘इंदोरी इश्क’मध्ये जे काही दाखवलं आहे, ते कुणालसोबत खरोखर घडलं आहे. तो मुंबईत राहिला होता. त्यानं वेटरची नोकरी केली आहे. कुणालला पहिल्यांदा भेटल्यावर मी रात्री झोपलो नाही. मला माझे कॅालेजमधील दिवस आठवले. प्रेमात अपयशी झालेल्या मित्रांना दारू पिताना, रडताना, वेडं होताना, रात्रभर जागं राहताना, हात कापून घेताना पाहिलं आहे. मला माझं पूर्ण कॅालेजजीवन आठवलं. हे मुलींसोबतही ही घडतं. कुणाल इंदोरचा असल्यानं ‘इंदोरी इश्क’ टायटल ठेवलं आहे. या वेब सिरीजची कथा कुणालच्या ‘थर्की’ नावाच्या पुस्तकावर आधारीत आहे. कुणालसोबत मी सहा दिवस राहिलो. त्याच्यासोबत बोलताना त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट जाणून घेतली. फर्स्ट टाईम मुलीला कसा भेटला, पहिलं वाक्य काय बोलला, दुसऱ्या दिवशी काय घडलं, तिसऱ्या दिवशी पुढे काय झालं, तो मुंबईत कसा पोहोचला या सर्व गोष्टींचा बारकाईनं अभ्यास केला. आजही तो त्याच मुलीची वाट पहातोय. ही प्रेमकथा २००८-११ मध्ये घडलेली आहे. त्याच्या डोळ्यात मी तो खरेपणा पाहिला होता. आजही त्याच्या हृदयात जे दु:ख आहे, ते मला पडद्यावर सादर करायचं होतं.

  वडील माझे गुरू आणि शिक्षकही

  वडील निर्माते अमर कक्कड हे माझे सर्वात मोठे क्रिटीक आहेत. तेच माझे गुरूही आहेत. मला आज या लाईनमधलं जे काही ठाऊक आहे ते त्यांच्यामुळेच. कॅमेऱ्यापासून लेन्सेसपर्यंतच्या सर्व गोष्टी त्यांच्यामुळे शिकलो आहे. इमोशन कसं असायला हवं, परफॅार्मंस काय असतो, एखाद्या लोकेशनला कॅरेक्टर कसं बनवायचं या सर्व लहानसहान गोष्टी वडीलांकडून शिकलो आहे. कॅरेक्टर्सच्या आजूबाजूचं वातावरण कसं असायला हवं हे देखील मी त्यांच्याकडून शिकलो. आजही आम्ही रात्री एका चित्रपटावर चर्चा करतो. काय चांगलं आणि काय वाईट यावर बोलतो. त्यातून मला चांगल्या गोष्टींचं ज्ञान मिळतं. आज माझ्या वडीलांना माझा अभिमान वाटतो. कारण ही वेब सिरीज मी प्रोड्युससुद्धा केली आहे. लाईफमध्ये जे काही करायचं ते प्रामाणिकपणे आणि फुल पॅावरनं करायचं, आपल्या क्रूलाही प्रेमानं वागवायचं आणि सतत हसतमुख रहायचं ही त्यांची शिकवण आहे.

  हृत्विक-वेदिकाची जोडी

  स्टोरी वाचल्यावर माझ्या डोक्यात एकच नाव होतं ते म्हणजे हृत्विक साहोर. यानं ‘फरारी की सवारी’मध्ये लहान मुलाची भूमिका साकारली आहे. योगायोग म्हणजे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापूसकरच्या मनातही हृत्विकचंच नाव होतं. त्यामुळं आम्ही एकमतानं हृत्विकलाच निवडलं. हृत्विक फास्ट लर्नर आहे. आपल्याला काय सांगायचंय ते ऐकून घेऊन त्यात आपले इनपुट्स टाकून कॅरेक्टर दमदार बनवतो. मुलीसाठी आम्ही बऱ्याच आॅडीशन्स घेतल्या. कारण ताराची भूमिका खूप वेगळी आहे. या रोलमध्ये वेदिका भंडारी एकदम चपखल बसली आहे. तिचा लुक या कॅरेक्टरसाठी परफेक्ट असून, प्रामाणिकपणे परफॅार्म करते. आपल्या डोळ्यांचा अभिनयासाठी कसा वापर करायचा हे तिला ठाऊक आहे. खरं तर हे कॅरेक्टर खूप डिफीकल्ट आहे. कारण ती पूर्णत: निगेटीव्हही होते आणि नॅार्मलही होते. मी पहिल्यांदा तिला जेव्हा लांबूनच पाहिलं तेव्हाच ताराच्या भूमिकेसाठी निवडण्याचं मनोमन पक्कं केलं. प्रेमात पडा, प्रेम खूप सुंदर आहे, पण फर्स्ट लव्हच यशस्वी होतं असं नाही. सेकंड लव्हसुद्धा खरं ठरू शकतो. त्यामुळे प्रेमात धोका झाला तरी थांबू नका. स्वत:ला इजा होईल असं काही करू नका. पुढे जात रहा. कदाचित प्रेमाच्या या वाटेवर अन्य कोणीतरी तुमची वाट पहात असेल.