समित कक्कड घेऊन आलाय नऊ भागांची ‘इंदोरी इश्क’!

या मालिकेत अनिर्बंध प्रेमाची संकल्पना अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आली असून, आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळून येणारा निष्ठा आणि व्यभिचाराचा खेळसुद्धा यात आहे.

    चार लक्षवेधी, अफलातून कथा रुपेरी पडद्यावर सादर केल्यानंतर लेखक-दिग्दर्शक-निर्माता समित कक्कडनं खास ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ‘इंदोरी इश्क’ ही नऊ भागांची मालिका तयार केली आहे. यामध्ये आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळणारा निष्ठा आणि व्यभिचार यांचा खेळ अनोख्या रीतीनं गुंफण्यात आला आहे. ही एक अतिशय हटके प्रेमकहाणी आहे. समितचा ट्रेड मार्क म्हणता येईल अशा तऱ्हेनं बनवण्यात आलेल्या या मालिकेत अनिर्बंध प्रेमाची संकल्पना अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आली असून, आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळून येणारा निष्ठा आणि व्यभिचाराचा खेळसुद्धा यात आहे.

    यात कुणालची प्रेमकहाणी, प्रेयसी तारानं केलेला प्रेमभंग आणि त्याचे परिणाम आहेत. समितनं या पूर्वी ‘आश्चर्यचकित’, ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ टिकिट’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. संजय गुप्ता यांच्या कंपनीशी दोन चित्रपटांचा करार केलेला समित म्हणाला की, देशात असा कुणीही लेखक नसेल ज्याला डिजिटल प्लॅटफॉर्मनं आकर्षित केलेलं नाही. माझी आधीची एक फिल्म ‘आश्चर्यचकित’ थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. ‘इंदोरी इश्क’च्या माध्यमातून मी तरुण मुला-मुलींच्या मानसिकतेत डोकावायचा प्रयत्न केला आहे. मुंबई आणि इंदौरमध्ये या मालिकेचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.