‘कौन बनेगा करोडपती’ वर ‘सम्मान’ नावाची शॉर्टफिल्म!

मध्य प्रदेशातील बेरचा येथे चित्रीत करण्यात आलेल्या 'सम्मान'मध्ये 'पीपली लाइव्ह' फेम ओंकार दास मणिपुरीनं अभिनय केला आहे.

    ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३व्या सीझनच्या लाँच कम्युनिकेशनचं रुपांतर जाहिरात कॅम्पेनवरून ब्रँडेड एन्टरटेन्मेंटमध्ये करण्यात आलं आहे. तसं पाहिलं तर ‘कौन बनेगा करोडपती’ला आज कोणत्याही प्रमोशनची गरज नाही. तरीही घरोघरी पोहोचल्या या लोकप्रिय शोच्या १३व्या पर्वाचं निमित्त साधत चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘सम्मान’ नावाची शॅार्टफिल्म बनवली आहे.

    याची संकल्पना तिवारींचीच असून, लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या लघुपटाचा पहिला भाग रिलीज करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बेरचा येथे चित्रीत करण्यात आलेल्या ‘सम्मान’मध्ये ‘पीपली लाइव्ह’ फेम ओंकार दास मणिपुरीनं अभिनय केला आहे. कथानकात स्थानिक प्रतिभेची जोड मिळाल्यानं चित्रपटाला अधिक सिनेमॅटिक अनुभव लाभला आहे.

    बेरचासारख्या खऱ्याखुऱ्या खेड्यात ही फिल्म चित्रीत करण्यामागील कल्पना म्हणजे, केबीसी देशातील अगदी दुर्गम भागातील लोकांनाही कसं आपलंसं करतो, हे त्यातून दाखवायचं आहे. तिवारी यांनी तीन भागांतील ‘सम्मान’ शॉर्ट फिल्मच्या माध्यामातून मानवी भावना आणि महत्त्वाकांक्षा अधोरेखित केल्या आहेत.