मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या अध्यक्षपदी संतोष काणेकर यांची निवड

मुंबई: मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई  या संस्थेची मुदतपूर्व निवडणूक आज झाली. त्यानुसार, पुढील ५ वर्षांसाठी कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. यात संतोष काणेकर यांची अध्यक्ष  म्हणून तर ज्ञानेश महाराव  यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यमान कार्यकारिणी विसर्जित करुन घटनेच्या १६(१) कलमानुसार मुदतपूर्व निवडणूक आज घेण्यात आली.

याशिवाय राहुल भंडारे यांची प्रमुख कार्यवाहपदी, सुशील आंबेकर यांची सह कार्यवाहपदी,  दिनेश पेडणेकर यांची कोषाध्यक्षपदी तर देवेंद्र पेम यांची सह कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. संजीवनी जाधव, ऐश्वर्या नारकर , पद्मजा नलावडे, ऋतुजा चव्हाण, अनुराधा वाघ यांची कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्था स्थापनेच्या ५० व्या वर्षात ५ महिला सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश होणे, ही महत्त्वाची बाब आहे.

अतिवृष्टी असूनही या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नाट्य निर्माता संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली. उपस्थित ज्येष्ठ सदस्यांनी संतोष काणेकर यांचे आणि कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले. या मुदतपूर्व निवडणूक सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य निर्माता प्रदीप कबरे होते. संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून समीर गुप्ते यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याचे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबईचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी कळवले आहे.