Saurabh Gokhale

आजवर छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, स्वातंत्र्यवीर सावरकर, चिमाजी अप्पांसारख्या ऐतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखांच्या जोडीला कधी पोलीस, तर कधी गुंड अशा विविधांगी भूमिकांमध्ये दिसलेला सौरभ गोखले पुन्हा नव्या रूपात समोर येणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर सुरू असलेल्या ‘मेरे साईं’ या दशमी क्रिएशन्सच्या बहुचर्चित मालिकेत सौरभ स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या निमित्तानं सौरभशी(Saurabh Gokhale Interview) ‘नवराष्ट्र’शी खास बातचित केली.

  आध्यात्मिक मालिका आणि ‘मेरे साईं’मध्ये काम करण्याच्या योगायोगाबाबत सौरभ म्हणाला की, यापूर्वी मी कलर्स मराठीसाठी ‘संत ज्ञानेश्वर’ ही १० भागांची शॅार्ट सिरीयल केली होती. त्यात मी ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका साकारली होती. शॅार्ट सिरीज असल्यानं मी ती खूप आवडीनं केली होती. ही सिरीज पुढे एडीट करून तीन तासांचा चित्रपटही बनवण्यात आला आहे. माऊलींचं ते रूप प्रेक्षकांना खूप भावलं आणि त्याचं कौतुकही झालं. त्यानंतर फार आध्यात्मिक प्रोजेक्टस माझ्याकडे आले नाहीत. खरं तर आध्यात्मिक मालिका स्वीकारताना मी खूप विचार करतो. कारण त्यात टाईपकास्ट होण्याची भीती असते. आपण साकारलेल्या व्यक्तिरेखेकडे प्रेक्षक आयडॅाल म्हणून पाहू लागल्यावर काम करणं थोडं अवघड होतं. त्यामुळं मी पौराणिक किंवा आध्यात्मिक मालिका निवडताना खूप काळजी घेतो. मला हिस्टॅारीकल प्रोजेक्टस करायला आवडतात. मला जेव्हा या मालिकेसाठी कॅाल आला, तेव्हा मी थोडा कचरलो होतोच, पण त्यांनी सांगितलं की ही स्टोरी सत्य घटनांवर आधारीत असून, एका क्रांतीकारकाची गोष्ट आहे. ते ऐकून माझी उत्सुकता वाढली. अशा प्रकारची इन्स्पायरींग कॅरेक्टर्स करायला मला खूप आवडतात. मला दिलेलं नॅरेशनही खूप आवडल्यानं मी होकार दिला. याशिवाय ‘अदृश्य’ हा चित्रपट लवकरच रिलीज होईल. ‘बॅक टू स्कूल’ नुकताच शूट केलाय. रोहित शेट्टींसोबत ‘सर्कस’ चित्रपट करतोय.

  क्रांतिकारी मानसिंग
  यात मी मानसिंग नावाचा क्रांतीकारक साकारला आहे. ही कथा सत्य घटनांवर आधारीत आहे. मानसिंग एका इंग्रज अधिकाऱ्याला गोळी मारून आला आहे. शिर्डीत आलेल्या या मानसिंगचा साईबाबा शरण देतात आणि बचाव करतात हे मला खूप इंटरेस्टींग वाटलं. ‘मेरे साईं’ ही मालिका स्वीकारण्यामागंही हेच कारण आहे. यापूर्वी मी ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाईंचा भाऊ गोपाळ साकारला होता. तो क्रांतीकारक होता. त्यामुळं क्रांतीकारकाची व्यक्तिरेखा यापूर्वीही साकारली आहे, पण त्यातील क्रांतीकारकाचा भाग खूप आक्रमक नव्हता. फक्त क्रांतीकारी विचारांचं असं ते कॅरेक्टर होतं, पण मानसिंग हा प्रत्यक्षात देशासाठी लढत असल्याचं पहायला मिळेल. हि व्यक्तिरेखा खूप छान लिहिली आहे. कॅरेक्टरायजेशन आणि लुकवाईज खूप चांगलं काम केलं असल्यानं मला फार काही रिसर्च किंवा फार भर टाकावी लागत नाही. कारण माझ्याकडे जेव्हा हे कॅरेक्टर आलं, तेव्हा त्याचा ऑलमोस्ट काँटेंट रेडी होता. त्यामुळं थोडं आणखी काय करता येईल हा विचार करतच मी ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

  बाजारीकरणावर नाराजी
  मी देवाला मानणारा आहे. माझ्या घरी सर्व प्रकारचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. देवा-धर्माचं करायला मला आवडतं. मंदिरामध्ये मी आवडीनं जातो. आपली भारतीय परंपरा मनापासून पाळायला आवडतं. पूर्वीपासून आमच्या घरात ती संस्कृती असल्यानं मी डेफिनेटली ती फॅालो करतो. आता जे देवस्थानांचं बाजारीकरण झालेलं मला आवडत नाही. अशा ठिकाणी जाणं मी टाळतो, पण जी मंदिरं शांत असतात, जिथं गेल्यावर शांत वाटतं अशा ठिकाणी मी आवर्जून जातो. मी शंकराचा भक्त आहे. शंकराच्या मंदिरात जायला मला आवडतं. तिथे जी शांतता मिळते ती वेगळीच असते.

  लोक त्यांना संत मानायचे
  साईबाबांबद्दल खूप अप्रूप आहे. साईबाबांचे निस्सीम भक्त असलेले किंवा त्यांना फॅालो करणारी बरीच माणसं मला माहित आहेत. मी साईबाबांबद्दल फार वाचलेलं नाही, पण त्यांच्याबद्दल जे लोकांकडून ऐकलंय ते खूप इंटरेस्टींग आहे. मध्यंतरी मी पोस्टसुद्धा लिहीत होतो की, साईबाबा हे खूप वेगळं संत व्यक्तिमत्त्व होतं. आता आपल्याला बरेच स्वयंघोषित गॅाडमॅन पहायला मिळतात, जे अचानक प्रतिष्ठीत होतात आणि नंतर त्यांच्याबाबतची कॅान्ट्रोव्हर्सी समोर येते. साईबाबांच्या बाबतीत मात्र उलटं चित्र होतं. लोकं त्यांना संत मानायचे, पण त्यांनी स्वत:ला कधीच कोणत्याही प्रकारे त्या प्रतिमेत अडकवून घेतलं नाही. केवळ मनोभावे ते लोकांची सेवा केली. त्यांचं दु:ख निवारण केलं. ही साईबाबांची गोष्ट भावणारी असून, त्याच अनुषंगानं ती सादर केली जात असल्यानं लोकांनी ती इतकी पसंत पडत आहे.

  प्रत्यक्ष आचरणात कोण आणतं?
  कोणतीही गोष्ट शांततेनं आणि विचारपूर्वक करायची हे सर्वच संतांनी केलं आहे. संत ज्ञानेश्वरांची व्यक्तिरेखा साकारतानाही मला ते जाणवलं. श्रद्धा आणि सबूरी हा विचार पूर्वापार चालत आलेला आहे. साईबाबांनी हा विचार सांगूनही आज तो प्रत्यक्ष फॅालो करणारी लोकं किती आहेत? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साईबाबांच्या संदेशाचा आजही लोकं केवळ टॅगलाईन म्हणून वापर करताना दिसतात. प्रत्यक्ष आचरणात किती लोकं आणतात याबाबत शंकाच आहे.

  तोच यासाठी परफेक्ट आहे
  तुषारदादासोबत मी ‘राधा ही बावरी’मध्ये काम केलं होतं. त्यात त्याचा रोल खूप वेगळा होता. त्यामुळं साईबाबांच्या लुकमध्ये त्याला पहिल्यावर तोच या रोलसाठी परफेक्ट कास्टिंग असल्याचं जाणवलं. त्याची शांत, संयमी अशी प्रतिमा या कॅरेक्टरसाठी अतिशय पोषक आहे. तो ओव्हरऑल साईबाबांची भूमिका सुंदर पद्धतीनं कॅरी करतोय. मग डायलॅाग डिलिव्हरी असो, वा डोळ्यांतून भाव सादर करणं हे तुषारदादा खूप चांगल्या पद्धतीनं करतोय.

  दशमीचं कौतुक
  साईबाबा आणि अहिल्याबाई होळकर या दोन महान व्यक्तिरेखा हिंदीसारख्या मोठ्या कॅनव्हासवर यशस्वीपणे सादर केल्याबद्दल दशमी क्रिएशन्स आणि निर्माते नितीन वैद्य यांचं खूप कौतुक वाटतं. इनफॅक्ट इतकं सुंदर तुम्ही करताय तर तुमच्यासोबत कधी काम करायला नक्की आवडेल, असं मी मध्यंतरी नितीनसरांना म्हणालो होतो. कदाचित त्यांनी तेच आठवणीत ठेवून मला या रोलसाठी विचारलं असावं. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’साठीही त्यांनी संपर्क साधला होता, पण त्यावेळी सिनेमा करत असल्यानं जमलं नव्हतं. मालिका म्हणजे लव्हस्टोरी असं समीकरण बनलेलं असताना हिस्टॅारिकल आणि पौराणिक कथांमध्ये दशमी क्रिएशन्सनं यश मिळवलं आहे. आजही या कथा लोकांना खूप काही शिकवू शकतात.