Savaniee Ravindrra

'सावनी रविंद्र' ला '६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार जाहीर झाला आहे.

    आजपर्यंत गायिका ‘सावनी रविंद्र’ हीची वेगवेगळ्या स्टाईलची अनेक गाणी प्रेक्षकांनी आहेत. पण सावनीचा खरा सन्मान झाला तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेनंतर. ‘सावनी रविंद्र’ ला ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर सावनीने यापुढे तिची जबाबदारी वाढली असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निमित्ताने सावनीशी साधलेला हा खास संवाद

     

    स्पप्न पुर्ण झालं

    हा पुरस्कार मला मिळाला आहे हे माझ्यासाठी अजूनही स्वप्नवत आहे. अजूनही माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. आयुष्यात किमान एकदा तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. तसेच माझेही हे स्वप्न होते. अखेर तो क्षण माझ्या आयुष्यात आला आहे. खूप समाधान वाटतय की आजपर्यंत मी केलेल्या प्रयत्नांच चिज झालं. कारण हा पुरस्कार बार्डो चित्रपटातील गाण्यासाठी जरी मिळाला असला तरी आत्तापर्यंतचा माझा प्रवास यासाठी निमित्त आहे. कारण या प्रवासात आजपर्यंत केलेले कष्ट असतील किंवा अठवणी असतील हे सगळं आता डोळ्यासमोर येतय.

     

    नवऱ्याने दिली बातमी

    ज्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नावाची घोषणा होत होती. तेव्हा मी एका कार्यक्रमात होते. यावेळी माझा नवरा आशिषचा मला फोन आला की मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुरूवातीला मला हे खरच वाटत नव्हतं. कोणी आपली मस्करी करत नाही ना असही वाटलं. त्यानंतर मोबाईलवर अनेकजणांचे अभिनंदनाचे मेसेज आले.

    रोहन- रोहनने संधी दिली

    या गाण्याचं पुर्ण श्रेय संगीतकार रोहन- रोहनला जातं. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हे गाणं मी आत्तापर्यंत गायलेल्या गाण्यांमध्ये खूप वेगळं आहे. आजपर्यंत गाण्याचा हा टोन मी कधीच वापरला नव्हता. लोकसंगीत गाताना एक वेगळ्या प्रकारचा आवाज लागतो, ताकद लागते ते उच्चारही तितकेच महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर गाणं चित्रपटात ज्या ठिकाणी आहे ते खूपच गंभीर अशा परिस्थितीत आहे. त्यामुळे मला खूप दडपण होतं. त्यामुळे रकॉर्डिंग दरम्यानही मी वेळ घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं. शांत आंधारात मी त्या भूमिकेत शिरायला प्रयत्न केला आणि त्यानंतर हे गाणं रेकॉर्ड झालं. म्हणूनच कदाचीत परिक्षकांनाही हे गाणं जास्त भावलं असेल.

     

    सोहळ्याची मनात तयारी

    मी या पुरस्काराच्या आधी अनेकदा आपल्याला पुरस्कार मिळाला आहे अशी कल्पना केली होती. कारण माझा विश्वास आहे की आपण ज्या चांगल्या गोष्टींच्या आपल्या आयुष्यात विचार करतो त्या गोष्टी वास्तवात आपल्याबरोबर घडत असतात. पुरस्काराची घोषणा होताच माझ्या डोळ्यासमोर सोहळ्याचं चित्र उभं राहिलं. पण मला खात्री आहे तो पुरस्कार घेताना मी थरथरत असेन. कारण अजूनही माझा या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये.

    जबाबदारी वाढली

    पुरस्कार तर मिळाला पण माझ्यावरची जबाबदारी वाढली. पण आता लोकांच्या अपेक्षाही नक्कीच माझ्याकडून जास्त वाढल्या आहेत. त्या अपेक्षांना आता खरं ठरायचं आहे. खूप मेहनत करायची आहे. वेगवेगळे प्रयोग या संगीतक्षेत्रात करायचे आहेत. स्वत:ला चॅलेंज देत पुढे जायचं आहे. जास्त जास्त लाईव्ह कार्यक्रम करून लोकांपर्यंत पोहचायचं आहे. आता प्रत्येक काम जबाबदारीने करायचं आहे.

     

    सावनी ओरिजनल

    सध्या मी ”सावनी ओरिजनल” या यूट्यूब सिरीजवर काम करत आहे. यामध्ये मी बंगाली, गुजराती, तमिळ अशा विविध भाषांमधील गाणी करत आहे. या सीरिजमधील आणखी काही गाणी तयार आहेत आणि त्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ”लताशा” सारखे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभरापासून सांगीतिक कार्यक्रम पूर्णतः बंद आहेत. माझ्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराला रंगमंचावर येण्याची उत्सुकता आहे.