सावनी रविंद्रच्या नव्या अनप्लग्ड सीरिजची झाली सुरूवात,‘इतना शोर शराबा क्यु हैं’ गझल प्रदर्शित

गायिका सावनी रविंद्रने जागतिक संगीत दिनी आपल्या ‘सावनी अनप्लग्ड’ युट्यूब सीरिजचे तिसरे पर्व सुरु केले आहे. ‘इतना शोर शराबा क्यु हैं’ या गझलने तिसऱ्या पर्वाची सुरूवात

 गायिका सावनी रविंद्रने जागतिक संगीत दिनी आपल्या ‘सावनी अनप्लग्ड’ युट्यूब सीरिजचे तिसरे पर्व सुरु केले आहे. ‘इतना शोर शराबा क्यु हैं’ या गझलने तिसऱ्या पर्वाची सुरूवात झाली आहे.

वैभव जोशी यांनी लिहीलेल्या गझलला दत्तप्रसाद रानडेंनी संगीतबद्ध केले आहे. सावनी रविंद्रच्या गोड आवाजाला निनाद सोलापूरकरने पियानोव्दारे श्रवणीय साथ दिली आहे. तर मयुर धांडेचे गाण्यात पेटिंग आकाराला येताना रसिकांना पाहायला मिळते आहे. मयुरने अगोदर सावनीच्या ‘माहिया’ गाण्यामध्ये  अशाच पध्दतीने सुंदर पेंटिंग साकारत साथ दिली होती. सावनीच्या आवाजाला मिळालेली पियानोच्या सुरांची योग्य साथ आणि त्याला साजेशा पेंटिंगची दृश्य, हा दृक-श्राव्य परिणाम गाण्याची गोडी अधिकच वाढवतो.  

गायिका सावनी रविंद्र म्हणते, सावनी अनप्लग्डची दोन्ही पर्व एवढी गाजली की, सातत्याने मला सावनी अनप्लग्ड तिसऱ्या पर्वाची विचारणा होत होती. म्हणून जागतिक संगीत दिनाचे निमीत्त साधून तिसरे पर्व घेऊन यावे असे वाटले. माझ्याच ‘मेरे हिस्से का चांद’ या अल्बममधलं हे ‘इतना शोर शराबा क्युँ हैं’ गाणं आहे. या गाण्याची जादू जागतिक संगीत दिनी रसिकांनी अनुभवावी म्हणून या गाण्याने नवे पर्व सुरू केले आहे. आता दर आठवड्याला तिसऱ्या पर्वातली अनप्लग्ड गाण्यांची  सीरिज घेऊन यायचा मानस आहे.”