नाटकाची ‘सेकंड इनिंग’

‘रसिकांनी आपले मोबाईल फोन बंद करावेत किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत!’ अशी सूचना ही नाट्यगृहात पडदा उघडण्यापूर्वी दिली जाते. पण आज दुर्दैवाने नाटकच ‘सायलेंट मोड’ वर तिस­ऱ्या घंटेच्या प्रतिक्षेत केविलवाणं, प्रश्नार्थक नजरेत उभं आहे.

मराठी रंगभूमीने पावणे दोनशे वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. तसेच २०२० हे वर्ष नाट्य संमेलनाचे शताब्दी वर्ष आहे. या विक्रमी वळणावर कोरोनााच्या संकटाने जबरदस्त फटका दिल्याने उभी नाट्यसृष्टी आता ठप्प झाली आहे. गेले ३ महिने कोट्यवधी रुपयांचे अर्थचक्र थांबले आहे. बेेकारी वाढली आहे. अनेकांच्या जीवनमरणाचा प्रश्न गंभीर रूप घेत आहे. बंद पडदा कधी उघडणार याकडे सारे जण आशा ठेवून आहेत. पण नाटकवाले आणि रसिकराजा यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र गायब झालीत… संभ्रमाचा साराच ‘घोळात घोळ’चा प्रयोग जसा रंगलाय…

कोरोनाची दहशत एवढी आहे की नाटकासाठी रसिक येतील काय? हा पहिला मूलभूत प्रश्न आणि आलेच तर दोन खुर्च्या सोडून अंतरावरल्या खुर्चीवर त्यांना कैद्याप्रमाणे बसावे लागेल. हसणे-रडणे, शिंकणे-खाेकणे किंवा कुठलीही उत्स्फर्त प्रतिक्रिया देणे शक्य होणार नाही. तोंडावर मास्क घातला असल्याने सारा मुक प्रतिसाद! रंगमंचावरल्या कलाकारांना रसिकांची नेमकी ‘दाद’ मिळणार नाही. दोघांमध्ये कुठलाही सुसंवाद अशक्यच बनेल. नाटक रंगण्यावर भट्टी जमण्यावर त्याचा परिणाम होईल. नाट्य आस्वाद शून्य!

दाेन अंकांच्या मध्यंतरामध्ये प्रसाधगृहाचा वापर तसच तिथली स्वच्छता. हा आणखीन एक प्रश्न आहेच. कारण मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या शहरातल्या नाट्यगृहातील प्रसाधनगृहाच्या गलिच्छ अवस्थेवर वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते आणि आता तर रांगा, अंतर,स्वच्छता. अशा टप्प्याटप्प्याने वापर तिथे करावा लागेल. परिणामी मध्यंतराची वेळ वाढवावी लागेल किंवा दोन अंकाऐवजी तीन अंकी नाटक करणे भाग पडेल. नाट्यगृहातील प्रयोगापुर्वी आणि प्रयोगानंतर पूर्ण निर्जंतुकीकरण हे पूर्ण दक्षता घेऊन करणे शक्य आहे काय? कमी प्रेक्षक आणि सुरक्षा, आरोग्य यासाठी तुलनेने होणारा जादा खर्च याचे गणित नाट्यगृहाचे व्यवस्थापक कसे काय साधणार? आधीच तिकीटांचे दर वाढले. त्याची ओरड आहे. आता कोरोना खर्च त्यावर लादला तर थेट तिकीट विक्रीवर त्याचा परिणाम होणे स्वाभाविक आहे.

आता प्रयोगाबद्दल. ज्या नाटकांचे प्रयोग सुरू होते त्याचे प्रयोग करता येतील पण ज्यांच्या तालमी सुरू होत्या अशा किमान आठ नाटकांचे भवितव्य अंधारात आहे. अनेकांनी तर नाटकाच्या तालमीचाच धसका घेतला आहे. दोन कलाकारांमध्ये सुरक्षित अंतर हे रंगमंचावर शक्य नाही. हात मिळविणे, जवळ घेणे, खोकणे, रडणे, मिठीत घेणे, उड्या मारणे, ओरडणे हे रंगमंचावर तसेच नाट्यगृहातही अशक्य आहे. एकूणच सुरक्षेसाठी आज तयार असलेल्या नियमांचा तोल सांभाळावा लागेल. सारी तशी तारेवरच सर्कस!

एक उदाहरण. हजार क्षमता असलेल्या नाट्यगृहात दोन खुर्च्या सोडून तिकीटे दिली तर फक्त सहाशे तिकीटे विकता येतील. प्रयोग हाऊसफुल्ल झाला तरी ४०० तिकीटांचा तोटा निर्मात्याला सहन करावा लागणार आहे. एका प्रयोगासाठी अंदाजे एक लाख खर्च असतो. नव्या गणितात उत्पन्न कमी, खर्च जादा असेल! कलाकार, तंत्रज्ञ यांचे मानधन, जाहिराती, टेम्पो, बस आणि नाट्यगृहाचे भाडे, मुंबई बाहेरच्या टोलनाक्यांचे शुल्क. यात तशी कुठेही कपात करता येणार नाही. आवश्यक खर्चाला कात्री लावणे एकंदर अशक्य आहे. नाटकाच्या प्रयोगांची जमवाजमव ही कित्येक महिने आधीपासून केली जाते. गेल्या तीन महिन्यातले नियोजित दौरे आणि खास करून परदेश दौरे हे रद्द झाले. त्याचा मोठा आर्थिक फटका निर्मात्यांना बसला. तीन महिन्यांच्या शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवसांच्या तारखा ‘वारेमाप किमंत’ मोजून उचलल्यामुळे तोही डाव फसलाय. प्रशांत दामले याचा दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्द झाला. पण त्याने नाटकातील रंगकर्मींना मदत केली, ही बाब नोंद घेण्याजोगी आहे. एका नाटकावर किमान पन्नास जणांचे कुटुंब हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून असते. मानधनाच्या पाकीटावरच घर चालतं. चालणाऱ्या नाटकाचे दिवसाला किमान दोन प्रयोग तरी होतात. पण्ा गेले तीन महिने तेही बंदच. कुटुंबावरच आर्थिक कुऱ्हाड कोसळली. उपासमारीची वेळ अनेकांवर आली आहे. त्यातूनच अनेक जण हे भाजी विक्री, मासे विक्री, घरपोच जेवण, ऑनलाईन शिकवण्या हे करताना दिसतात.

गेले तीन महीने नाट्यगृहे पूर्णपणे बंद आहेत. दैनंदिन साफसफाई तसेच एसी यंत्रणा, प्रकाश ध्वनी व्यवस्था या सा­ऱ्यावर धूळ बसली आहे. त्याची देखरेख व दुरूस्ती करणे आवश्यक आहे. प्रत्येक खुर्चीवर, नाटयगृह परिसरात फवारणी करावी लागेल. उंदीर, घुशी, ढेकूण, पाली, मांजरे यांचा मुक्त संचार या मध्यंतरात वाढला असेल एकूणच नाट्यगृह सज्जतेसाठी काही वेळ आणि पैसा हा खर्च होईल. त्याची तरतूद करणे भाग पडेल. ‘कोरोनामुक्त नाट्यगृहा’शिवाय प्रेक्षक नाट्यगृहाची पायरी चढणार नाहीत. मनोरंजनाचे अनेक पर्याय जरी नसले तरी नाटकांचा खास रसिकवर्ग होता पण या बंद काळात त्यांची अभिरुची ही बदलली आहे काय, याचा अंदाज घेणे उचित ठरेल. घरातच अधिक सुरक्षित पर्याय त्याला जबरदस्तीने मिळाला आहे. नाटकांच्या कॅसेटही आहेत. आता त्यात नव्या नाटकांचे चित्रीकरण करून जर नाटक मिळालं तर नाट्यगृहाकडे प्रेक्षक का म्हणून वळेल? जुनी नाटके प्रसारित झाली तर त्याला विरोध होणार नाही. कारण त्यांचे पुन्हा प्रयोग होणे शक्य नाहीत. पण घरबसल्या नवी नाटके जर आली तर उभ्या नाट्यसृष्टीला धोक्याची घंटा आहे. निर्माता एकाच प्रयोगाचा खर्च करून चित्रीकरण करेल. पुढे त्या नाटकाचे प्रयोगच करणार नाहीत. परिणामी कलाकारांपासून ते तंत्रज्ञापर्यंत आणि नाट्यगृहापासून ते जाहिरातीपर्यंत अर्थचक्रच थांबेल. त्यावर नाट्य परिषदेचा व सरकारचा अंकुश ठेवावा लागेल. 

जे कलाकार वयाने साठ वर्षांपुढले आहेत त्यांना राज्य सरकारने सिनेमा, सिरियल आणि जाहिरातपट यांच्या चित्रीकरणापासून रोखले आहे. हाच नियम नाटकांनाही लागू होईल, अशी शक्यता दिसतेे. ज्येष्ठ कलाकारांची कोरोनापासून सुरक्षा, हा त्यामागला हेतू आहे कबूल. पण सिनेमा किंवा नाटक यात हे शक्य नाही. तरुणांनीच सर्व वस्तुस्थितीला धरून होणार नाही. आज ज्यांच्या नावावर बुकींग आहे, त्यातले ७५ टक्के रंगकर्मी हे साठीच्या पुढचे आहेत. त्याला काय करणार? म्हणजे पुन्हा बुकींगवर विपरीत परिणाम!

नाटकांचे दौरे म्हणजे सर्वांना आधार असतो. तोटा भरून काढून पुन्हा तयारीने उभं राहण्याची शक्ती मिळते. झंझावाती दौऱ्याने आर्थिक बळकटी मिळते. आता गावागावातले दौरे म्हणजे कोरोनाशी लपंडाव खेळावा लागेल. कदाचित प्रेक्षकच त्याला प्रतिासद देणार नाहीत. अर्थात हा सारा ‘जर-तर’चा अंदाज आहे. 

दरम्यान श्रेयस तळपदे याने ऑनलाईन नाट्यगृहाची एक अनोखी संकल्पना मांडली आहे. ऑनलाईन तिकीट विक्री करून नाटकाच्या लाईव्ह प्रयोगाची ही कल्पना. कुठेतरी यात कोंडी फोडण्याचा प्रयत्न दिसतो. कल्पना हटके जरी असली तरी त्याला कितपत प्रतिसाद मिळेल याचं उत्तर येणारे दिवसच देतील. आणखीन एक उपक्रम. कोकणातील दशावतारी नाटकांचा. शुटींग करून ही नाटके यूट्यूबवर प्रसारित करण्यात येत आहेत. कोरोना आणि चक्रीवादळ यात अडकलेल्या रंगकर्मींना चांगली आर्थिक मदत त्यातून मिळतेय. दुसरीकडे निर्माते संतोष कणेकर यांनी तर त्यांचे नवे नाटक ‘सेकंड इनिंग’ रंगभूमीवर आणण्याची घोषणा केली आहे. अभिनय-लेखन-दिग्दर्शन हे सबकुछ संजय मोने यांचे आहे. परिस्थिती जर रूळावर आली की नाटकही ‘सेकंड इनिंग’साठी सज्ज असेल, असाा विश्वास त्यांना आहे.

अशा विचित्र, बिकट परिस्थितीत आर्थिक तोटा सहन करून कुणीही व्यवहारी निर्माता धंदा पटकन सुरू करणार नाही. कारण नाटक चालू करण्याची खात्री नसेल तर कितीकाळ हे सोंग करता येईल? कोरोनाने नाट्यसृष्टीपुढे कोंडी उभी केलीय, हेच खरे. सर्वांपुढे अनेक प्रश्न आहेत, पण प्रश्नांना नेमकी उत्तरे मिळत नाहीत. 

येत्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा नाट्यगृहे उघडण्याची शक्यता बोलली जात आहे. राज्य सरकार, नाट्य परिषद आणि प्रेक्षक यांना सर्वमान्य होईल, अशी आदर्श नियमावली तयार करणे आज गरेजचे आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी स्वच्छता-सुरक्षा आवश्यक आहे. कोरोनाची साेबत यापुढे कायम राहणारच, असे भय प्रत्येकाच्या मनात पक्के बसलंय. ते दूर करावे लागेल. प्रेक्षक आणि रंगकर्मी यांच्यातल्या विश्वासानेच पुन्हा एकदा तिसरी घंटा होईल! सारे पूर्वपदावर येईल, अशी आशा करणेच आता आपल्या हाती आहे.

असे म्हटले जातं, जोवर एका माणसाला दुसऱ्या माणसाशी संवादाची गरज आहे तोवर नाटका ही कला जिवंत राहील! हे खरंय पण आता ती कला कोणत्या स्वरूपात आकाराला येईल, हाच एक वादाचा, चिंतेचा, अस्तित्वाचा आणि धोरणाचा विषय ठरू शकतो! कोरोना नंतरच्या ‘सेकंड इनिंग’साठी नाट्यसृष्टीने सज्ज राहावे!

– संजय डहाळे

sanjaydahale33@gmail.com