‘मिर्झापूर’च्या दुसऱ्या पर्वाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई: अमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांची सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित सीरिज ‘मिर्झापूर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सीरिजचा दुसरा भाग याचवर्षी २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सीरिजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे ‘मिर्झापूर’चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा अॅक्शन पॅक प्रेक्षकांना आता अॅक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. ‘मिर्झापुर’च्या दुसऱ्या सीरिजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.

रितेश साधवानी, एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते या सीरिजबद्दल बोलताना म्हणाले की, “मिर्झापूर हा आमच्या कामाचा पुढचा टप्पा होता. भारतीय प्रेक्षकांना आम्ही अशा काही कथा दिल्यात ज्या खूप वेगळ्या आणि नवीन होत्या. भारतातील लहान सहान गावांमधून कधीही समोर न येणाऱ्या कथांना लोकांपर्यंत त्याचा अस्सलपणा टिकवून पोहचवणे हे आमच्यासाठी आव्हान होते मात्र आम्ही ते यशस्वीरीत्या पार पाडले. या सीरिजला भारतातच नव्हे जगभरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळेच आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

या सीरीजचे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट असून पुनीत कृष्णा यांनी ही सीरिज बनवली असून गुरमीत सिंग आणि मिहीर देसाई यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांची ही आवडती अमेझॉन ओरिजिनल सीरिज अमेझॉन प्राईम व्हिडीओवर २०० पेक्षा जास्त देशात आणि प्रदेशात प्रदर्शित होणार आहे.