seema deo suffering alzheimer ajinkya deo tweet
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने त्रस्त, प्रकृती खालावली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव. अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सीमा देव यांना सध्या एका दुर्लभ आजाराने ग्रासले आहे. अल्झायमर या आजाराने त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे.

  • मुलगा अजिंक्य देवने ट्विट करून दिली माहिती

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव. अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सीमा देव यांना सध्या एका दुर्लभ आजाराने ग्रासले आहे. अल्झायमर या आजाराने त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी स्वत: ही माहिती दिली.

‘माझी आई श्रीमती सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांनी देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करावी,’ असे ट्विट अजिंक्य देव यांनी केले आहे.

 

अल्झायमर हा प्रामुख्याने वार्धक्यामध्ये होणारा आजार आहे. सोप्या भाषेत स्मृतीभ्रंश वा विसरभोळेपणा असा याचा अर्थ होतो. या आजाराच्या रूग्णाच्या विपरित परिणाम होऊन हळूहळू पूर्ण स्मृतिभ्रंश होतो. अगदी आपल्या जवळच्या लोकांचे नाव विरण्यापासून जेवण खाणे विसरणे इथपर्यंत हा आजार बळावतो.

सीमा देव यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमातही यादगार भूमिका साकारल्या आहेत. ‘जगाच्या पाठीवर’ या सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर घरखर्चाला हातभार म्हणून सीमा या बॅले आर्टिस्ट म्हणून काम करत. एकदा सुरेश फाळके त्यांचा बॅले शो बघायला गेले होते. याच ठिकाणी त्यांनी सीमा यांना सिनेमात काम करशील का म्हणून विचारले.

सीमा यांच्या आईचा मुलीने चित्रपटात काम करण्यास विरोध होता. मात्र सीमा यांनी त्यांचे मन वळवले. प्रत्येक कामाच्या ठिकाणी मी सोबत येईन, या अटीवर आईने सीमा यांना चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली. यानंतर उण्यापु-या १५ वर्षांच्या सीमा यांना अभिनय प्रवास सुरु झाला. सुवासिनी, आनंद अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. १ जुलै १९६३ रोजी सीमा व रमेश देव यांचा विवाह झाला.