जमीन विकून आदिवासी मुलींना शिकवली ‘माऊंटेन हॅाकी’, वाचा डॅाक्युमेंट्रीसाठी केलेला संघर्ष!

मनीष भूषण मिश्रा या तरुण दिग्दर्शकानं 'द माऊंटेन हॅाकी'ची निर्मिती केली आहे. या डॅाक्युमेंट्रीसाठी केलेला संघर्ष मनीषनं 'नवराष्ट्र'शी बोलताना शेअर केला.

  सिनेमांच्या जोडीला वास्तववादी चित्र दाखवणारे काही लघुपट आणि माहितीपटही अनेकांना प्रेरणादायी ठरत असतात. जगभरातील फिल्म फेस्टिव्हल्समध्ये दाखवले जाणारे आशयघन माहितीपट आता ओटीटीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचत आहेत. डिस्ने प्लस हॅाटस्टारवर प्रदर्शित झालेली ‘द माऊंटेन हॅाकी’ डॅाक्युमेंट्री आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिला हॅाकी खेळाडूंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी आहे. आदिवासी मुलींचं हॅाकीवरील प्रेम पाहून ओरीसामधील एका कोचनं चक्क स्वत:ची जमीन विकून त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. मनीष भूषण मिश्रा या तरुण दिग्दर्शकानं ‘द माऊंटेन हॅाकी’ची निर्मिती केली आहे. या डॅाक्युमेंट्रीसाठी केलेला संघर्ष मनीषनं ‘नवराष्ट्र’शी बोलताना शेअर केला.

  मूळचा बनारसचा असलेल्या मनीषनं बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘बडे अच्छे लगते है’साठी असिस्टंट म्हणून काम केलं आहे. दोन इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आणि दोन बंगाली चित्रपटांसाठीही त्यानं असिस्ट केलं. जाहिरातीही दिग्दर्शित केल्या आहेत. २०१८ मध्ये ‘पिरीयड’ नावाची शॅार्टफिल्म बनवली. या लघुपटाचं खूप कौतुक झालं. ‘मेरी मर्जी’ हा लघुपट हॅाटस्टारवर हिट झाला. युरोपमध्ये जाऊन काही गाण्यांचे व्हिडीओ बनवले. तीन गाणी ग्रीसमध्ये, तर एक बँकॅाकमध्ये केलं. ‘द माऊंटेन हॅाकी’बाबत मनीष म्हणाला की, मी नेहमीच रिअॅलिस्टीक कथांवर काही ना काही बनवण्याला प्राधान्य देतो. विशेषत: स्त्रीप्रधान कलाकृतींकडे माझा जास्त कल असतो. ‘द माऊंटेन हॅाकी’ बनवताना या दोन्ही गोष्टी जाणवल्या. या डॅाक्युमेंट्रीद्वारे आदिवासी कुटुंबातील मुलींचा संघर्ष मांडायचा होता. आदिवासी कुटुंबातील मुलींकडे खाण्यासाठी पैसे नाहीत. राहण्यासाठी चांगलं घर नाही. तरीही त्यांच्यामध्ये हॅाकी खेळण्याची उर्मी आहे. ‘माऊंटेन हॅाकी’साठी आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो, तेव्हा ओरीसामधील कोच कशा प्रकारे पैसे एकत्र करतात ते पाहून त्यांचं कौतुक वाटलं. डॅामिनीक टोपो नावाच्या एका कोचनं स्वत:च्या २२ एकर जमिनीपैकी २१ एकर जमीन विकली. आदिवासी मुलींना चांगली उपकरणं मिळावीत, त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी आणि त्यांना चांगलं डाएट मिळावं यासाठी त्यांनी खूप केलं आहे. एका बाजूला आदिवासी मुलींना हॅाकी शिकवण्यासाठी कोचचा संघर्ष सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला सरकारला याबाबत काहीही माहीत नव्हतं. या चित्रानं मनाला केल्यानं या मुलींचा संघर्ष जगासमोर आणण्यासाठी ‘द माऊंटेन हॅाकी’ हा माहितीपट बनवला.

  ‘द माऊंटेन हॅाकी’ बनवण्याच्या कामी मनीषला बऱ्याच लोकांची मदत झाली आहे. याबाबत तो म्हणाला की, राज किशोर होता यांच्या साथीनं मी या डॅाक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. अविनाश प्रधान आणि देबाशीष मोहापात्रा या तरुण दिग्दर्शकांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. काला सिनेमा एन्टरटेन्मेंटच्या सहयोगानं मीच ही डॅाक्युमेंट्री प्रस्तुतही केली आहे. आमलीखामन मिशन स्कूलमधील प्रियांनी मिंझ, गंगा एक्का आणि अंजना बार्ला या दुर्गम भागात राहणाऱ्या तीन आदिवासी मुलींनी ‘द माऊंटेन हॅाकी’मध्ये अॅक्टींगही केली आहे. या डॅाक्युमेंट्रीमध्ये डॅामिनीक टोपो यांनीही आपलं मत मांडलं आहे. बेसिकली हॅाकी हा आज जगातील एक मोठा खेळ असला तरी भारतात मात्र त्याकडं काहीसं दुर्लक्षच होत आहे. क्रिकेटच्या तुलनेत हॅाकीला दुय्यमच वागणूक मिळते. अशा परिस्थितीत महिला हॅाकी आणि त्याही आदिवासी पाड्यात राहणाऱ्या, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? याच विचारांतून ‘द माऊंटेन हॅाकी’ हा माहितीपट तयार झाला.

  सरकारने स्वीकारली जबाबदारी
  ‘द माऊंटेन हॅाकी’चे निर्माते राजकुमार होता ओरीसातीलच आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही ओरीसाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यानंतर आगामी वर्ल्डकपसाठी या मुलींचा खर्च ओरीसा सरकार उचलणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. त्यामुळं आदिवासी मुलींचा संघर्ष जगासमोर येणं गरजेचं वाटलं. भारतात जरी याबाबत उदासीनता असली तरी ‘द माऊंटेन हॅाकी’च्या माध्यमातून भारताबाहेरील लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि आपल्याकडे अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट खेळाडू तयार होत असल्याचं जगाला समजेल. ‘द माऊंटेन हॅाकी’ पाहिल्यानंतर आदिवासी मुलींना शिकवणाऱ्या कोचना भारताबाहेरून फंडही मिळू शकेल. त्यामुळं खेळाडू घडवण्याचं काम ते आणखी चांगल्या प्रकारे आणि जोमानं करू शकतील. ही स्टोरी खेड्यांमध्ये राहूनही दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या मुलींना नवं बळ देणारी ठरेल.

  अनेक अडचणींचा सामना
  कोचच्या माध्यमातून हॅाकी खेळणाऱ्या आदिवासी मुलींची माहिती मिळाली. यासाठी गावागावात जाऊन आम्ही मुलींचा शोध घेतला. यात जवळपास दीड वर्ष गेलं. बऱ्याच अडचणी आल्या. कित्येकदा स्टेडियम बुक केल्यानंतरही शूट होऊ शकलं नव्हतं. कधी मुलीच गैरहजर असायच्या, तर कधी कोचची तब्बेत बिघडायची. सर्वात मोठा प्रश्न रिलीज करण्याचा होता. ‘द माऊंटेन हॅाकी’ बनून तयार होती, पण प्रदर्शित कशी करायची हा प्रश्न होता. सिनेमा नसल्यानं थिएटरमध्ये कोणी पहायला आलं नसतं. युट्युबवरही तितकासा चांगला प्रतिसाद मिळेल याची खात्री नव्हती, पण हॅाटस्टारनं मदतीचा हात पुढे केल्यानं प्रश्न सुटला. हॅाटस्टारवर ‘पिरीयड’ आणि ‘मर्जी’ प्रदर्शित झाल्याचा फायदा ‘द माऊंटेन हॅाकी’ला झाला. त्यांना प्रेझेंटेशन पाठवलं ते आवडल्यानं ‘द माऊंटेन हॅाकी’ हॅाटस्टारवर रिलीज झाली आहे.

  लाकडी दांड्यांनं हॅाकीचा खेळ
  यात काम केलेल्या मुली हॅाकी प्लेअर्स आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. जंगलात जाऊन लाकडं तोडून आणणं, पानं तोडून आणणं, जेवणासाठी केळीची पानं जमवणं, शेतात मजूरी करणं, मासे आणून देणं यांसारखी कामं करून यांचे आई-वडील उदरनिर्वाह करतात. आपल्या मुलींना हॅाकी खरेदी करून देण्याची क्षमता त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळं या मुली लाकडाची दांडी घेऊन हॅाकी खेळायच्या. कोच टोपो यांची जेव्हा त्यांच्यावर नजर पडली, तेव्हा त्यांना त्या मुलींमधील कलागुण जाणवले. त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय टोपोंनी घेतला. सर्व मुलींना जमा केलं आणि ट्रेनिंग दिलं. हे सर्व करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यांनी बऱ्याच लोकांशी संपर्क साधला, पण कोणीही मदत केली नाही. त्यामुळं अखेरीस त्यांनी स्वत:ची जमीन विकली.

  …तेव्हाच भारत नंबर वन बनेल
  ‘द माऊंटेन हॅाकी’मधील मुली जेव्हा स्वत:बद्दल सांगतात किंवा कोच आपली कहाणी सांगतात, तेव्हा पाहणाऱ्याच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावतात. ही मोटीव्हेशनल स्टोरी असल्यामुळं दूरदर्शनच्याही संपर्कात आहोत. आजच्या युथला यातून बरंच शिकण्यासारखं आहे. सर्व उपलब्ध असूनही आपण चांगली हॅाकी खेळू शकत नाही. आपण आपल्या नॅशनल खेळाला विसरलो आहे. या मुली आदिवासी असूनही, दुर्गम भागांत राहूनही या खेळासाठी संघर्ष करत आहेत आणि आपण त्यांना जराही महत्त्व देत नाही याचं वाईट वाटतं. आजच्या काळात मुलींना सानिया मिर्झा, सायना नेहवाल बनायचं आहे, पण फार कमी मुलींना हॅाकी प्लेअर बनायचं आहे. आदिवासी मुलींचं हे स्वप्न भारतातील जास्तीत जास्त मुलींच्या डोळ्यात जेव्हा तरळू लागेल, तेव्हा भारत हॅाकी खेळात नंबर वन बनेल.