गदर सिनेमाचा सिक्वल लवकरच, लिड रोलमध्ये असणार हे कलाकार

गदर सिनेमाचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र अनेक वर्षांपासून ही बाब केवळ चर्चेच्या पातळीवर होती. आता मात्र गदरचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चांना आधार मिळायला सुरुवात झालीय. या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मौन सोडत गदरच्या सिक्वलबाबत आपलं मत व्यक्त केलंय. 

    सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर-एक प्रेमकथा हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासातला एक महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. २००१ साली रिलीज झालेल्या या सिनेमानं कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडत नवा विक्रम प्रस्थापित केला होता.

    गदर सिनेमाचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र अनेक वर्षांपासून ही बाब केवळ चर्चेच्या पातळीवर होती. आता मात्र गदरचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चांना आधार मिळायला सुरुवात झालीय. या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मौन सोडत गदरच्या सिक्वलबाबत आपलं मत व्यक्त केलंय.

    गदर सिनेमाची कथा डोक्यात ठेऊन नवी कथा लिहिली जात असल्याचे संकेत अनिल शर्मा यांनी दिलेत. या सिनेमातही सनी देओल आणि अमिषा पटेल हेच मुख्य भूमिकेत असणार असून अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्ष हादेखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

    उत्कर्षने गदर सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुलाचा रोल केला होता. आता या सिनेमाला २० वर्ष उलटली असून उत्कर्ष मोठा झाला आहे. आता उत्कर्षला केंद्रस्थानी ठेऊन हा सिनेमा लिहिला जात असल्याची चर्चा आहे. मुख्य कथानक उत्कर्षभोवती गुंफलेलं असून सनी देओल आणि अमिषा पटेल हे त्याच्या आईवडिलांच्या भूमिकेत असतील, अशी चर्चा आहे.

    मात्र, गदरच्या सिक्वलची औपचारिक घोषणा व्हायला अद्याप वेळ असल्याचं शर्मा यांनी म्हटलंय. सध्या दिग्दर्शक शर्मा हे वेगळ्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त असून त्यानंतर या प्रकल्पाचा विचार होऊ शकतो, असं सांगितलं जातंय.