शाहरुख खानच्या टीम ट्रिनबागो नाइट राइडर्सवरील लघुपट ‘वी आर टीकेआर’ प्रदर्शित!

या लघुपटाच्या माध्यमातून आपल्या प्रवासाची झलक चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा टीकेआरचा मानस आहे. या माध्यमातून टीकेआरच्या आतापर्यंतच्या प्रवासातील चढउतार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

    बॉलीवूड किंग शाहरुख खानची चॅम्पियन टीम ट्रिनबागो नाइट रायडर्सनं (टीकेआर) नुकताच एक लघुपट प्रदर्शित केला आहे. ‘वुई आर टीकेआर’ हा लघुपट कॅरेबियन प्रीमियर लीग ट्वेंटी२० (सीपीएलटी२०) मधील ट्रिनबागो नाईट रायडर्सचा आजवरचा सर्वात यशस्वी प्रवास प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. टीकेआर ही चार सीपीएल ट्रॉफी पटकावणारी पहिली टीम असून, नाबाद चॅम्पियनशीप सिझन्स जिंकण्याचा बहुमानही या टीमनं मिळवला आहे.

    या लघुपटाच्या माध्यमातून आपल्या प्रवासाची झलक चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा टीकेआरचा मानस आहे. या माध्यमातून टीकेआरच्या आतापर्यंतच्या प्रवासातील चढउतार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. नाईट रायडर्स समूहाचा सहमालक असलेला शाहरुख यासंदर्भात म्हणाला की, वेंकी मैसूर यांनी जेव्हा आपल्याकडे सीपीएलचा हिस्सा बनण्याची तसेच ट्रिनबागो नाईट रायडर्स मिळवण्याची संधी असल्याचं सांगितलं, तेव्हा मी खूप रोमांचित झालो.

    कारण मला संगीताची कल्पना आवडली. ज्याप्रकारे लोक इथं नृत्य करतात आणि खुश होतात ते खेळापेक्षा थोडं अधिक आहे. संपूर्ण समुदाय एकत्र येतो आणि आनंद घेतो. वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटचा इतका मोठा वारसा आहे.