मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे, शाहरूख खानने दिलं ‘हे’ उत्तर!

शाहरुखने चाहत्यांसोबत संवाद साधत त्यांच्याशी नातं घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या सेशनमधून शाहरूख येत्या काळात ‘पठाण’ सोबत इतरही सिनेमात झळकणार असल्याचं लक्षात येतंय.

    शाहरूखने नुकताच ट्विटरवरुन त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. #AskSRK या सेशनमधून त्याने चाहत्यांशी संवाद साधला. शाहरूखने १५ मिनिट चाहत्यांशी संवाद साधणार असल्याचं ट्विटरवरून सांगितलं होतं.

    तर एका युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत शाहरुखने त्याची बोलती बंद केली. या युजरने शाहरुखला विचारलं,”मुली पटवण्यासाठी एक दोन टिप्स दे.” यावर शाहरुख त्या युजरला म्हणाला,” पहिले तर मुलीसाठी ‘पटाना’ हा शब्दप्रयोग करु नको. मुलींसाठी जास्त सन्मान आणि आदर दाखवं”. अशा शब्दात त्याने युजरला उत्तर दिलं.

    शाहरूखच्या या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये अनेक चाहत्यांनी शाहरुखला विचित्र प्रश्न विचारले. तर शाहरुखने देखील चाहत्यांच्या प्रश्नाला मिश्किल उत्तरं दिली आहेत. एका युजरने शाहरुखला विचारलं “तुमचा आगामी सिनेमा कधी येतोय आणि त्याची घोषणा कधी होणार” यावर शाहरूखने मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, ” घोषणा तर एअरपोर्ट आणि रल्वे स्टेशनवर होते. सिनेमांची तर हवा होतेच.” अनेक युजर्सनी शाहरुखला त्याच्या आगामी सिनेमाबद्दल विचारलं यावेळी नवा सिनेमा करत असल्याचं तो म्हणाला.